Search This Blog

Friday, 29 November 2024

रब्बी हंगाम 2024 अंतर्गत अन्नधान्य, कडधान्य पिकांच्या पीकस्पर्धा

 

रब्बी हंगाम 2024 अंतर्गत अन्नधान्य, कडधान्य पिकांच्या पीकस्पर्धा

चंद्रपूर, दि. : पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

            रब्बी हंगाम 2024 मध्येही तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पीक स्पर्धा राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या पाच पिकासाठी पिकस्पर्धेंचे आयोजन करण्यात येत आहे.

1) पीकस्पर्धेतील पीके :  रब्बी पीके - ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस

2) पात्रता निकष :  स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावेजमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच  वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

3) अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन 7/12, 8- अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास ) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12  वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

4) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीकस्पर्धेचा अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

5) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क  : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये राहील व  आदिवासी गटासाठी 150 रुपये राहील.

बक्षिसाचे स्वरुप : तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे बक्षीस 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार आणि तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दूसरे 40 हजार आणि तिसरे बक्षीस 30 हजार रुपये आाहे.

येथे करा संपर्क : पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

उपरोक्त नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

००००००

Wednesday, 27 November 2024

विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून 100 टक्के बालविवाह मुक्त जिल्हा करू – सीईओ विवेक जॉन्सन





 

विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून 100 टक्के बालविवाह मुक्त जिल्हा करू – सीईओ विवेक जॉन्सन

Ø बालविवाह मुक्त भारत अभियानचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 27 : आपल्या देशात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. भविष्यात आपल्या जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे. यात नवीन पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक आहे. नवीन पिढीच ही परिस्थिती बदलवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा 100 टक्के बालविवाह मुक्त करू, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.

भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे बालविवाह मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या भावना देशमुख, रुदय संस्थेचे संचालक काशिनाथ देवगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्ष व असेस्ट टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्प या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, बालविवाहाचे प्रमाण शहरी भागात कमी असून ग्रामीण भागात जास्त असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करून बालविवाह प्रतिबंधासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्य मार्गदर्शक सुमित जोशी यांनी बालविवाहाचे भारतातील वय व त्यासंदर्भात असलेल्या कायद्यांबाबत माहिती दिली..   

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत पथसंचालन करून रॅली काढली. रॅलीची  सांगता शाळेच्या पटांगणात करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश बारसागडे यांनी तर आभार शशिकांत मोकाशे यांनी मानले. कार्यक्रमाला परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, मोरेश्वर झोडे, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे, गीता चौधरी, शाळेचे प्राचार्य  सी.डी. तन्नीरवार, उपमुख्याध्यापक जे.एम टोंगे, पर्यवेक्षक श्रीमती मुप्पिडवार, डी. एल कुरेकार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

मतदानाचा सेल्फी अपलोड स्पर्धेचे विजेते घोषित





 मतदानाचा सेल्फी अपलोड स्पर्धेचे विजेते घोषित

Ø लकी ड्रा द्वारे तीन भाग्यवंतांना मिळाले आकर्षक बक्षीसे

चंद्रपूर, दि. 27 : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने मतदान केल्यानंतर सेल्फी अपलोड करण्याच्या स्पर्धेत 8080 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लकी ड्रॉ द्वारे या स्पर्धेचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांच्या उपस्थितीत आज (दि. 27) घोषित करण्यात आला.

 

लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आलेल्या या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस (बुलेट मोटारसायकल) ब्रम्हपूरी तालुक्यातील शंकर धर्मा भर्रे यांना, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (15 ग्रॅम सोन्याचे नाणे) सिंदेवाही तालुक्यातील सोनल श्यामराव गभने व तृतीय क्रमांकाचे बक्षीस (मोबाईल फोन) चिमुर तालुक्यातील गितेश मदनकर यांना घोषित करण्यात आले.

जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप उपक्रमांतर्गत सायकल रॅली, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, टॅगलाईन, रिल्स तयार करणे, सेल्फी अपलोड करणे इ. स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

००००००

Monday, 25 November 2024

दत्तक प्रक्रियेकरीता संपर्क करा

 

दत्तक प्रक्रियेकरीता संपर्क करा

Ø महिला व बालविकास कार्यालयाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 25 : ज्यांना नैसर्गिक पालकत्वापासून वंचित राहावे लागते, अशा नागरिकांसाठी आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. पालकत्व मिळण्याकरीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी आहे प्रक्रिया.

1) अनाथ बालक दत्तक घेणे  : यामध्ये अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेल्या  बालकांचा समावेश होतो. अशा बालकाचे संरक्षण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून केले जाते. अशा बालकाचे संरक्षण, पालन पोषणकरिता किलबिल दत्तक योजना संस्था कार्यरत असून बालकल्याण समिती, चंद्रपूर, यांच्या आदेशाने दाखल करण्यात येते. यानंतर सदर बालकांना, बालकल्याण समिती चंद्रपूर द्वारे दत्तक मुक्त केले जाते. दत्तक इच्छुक पालक CARA (Central Adoption Resource Authority)  cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात.

2) नात्याअंतर्गत (रक्तातील नाती )/सावत्र दत्तक : बाल न्याय बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015  चे कलम  2(52)  नुसार दत्तक जाणाऱ्या मुलाचे काका- काकू, मामा- मामी, मावसा -मावशी, आजी – आजोबा (आईकडील / वडीलांकडील) हे नात्यांतर्गत दत्तक  घेण्यास पात्र असतात. सावत्र दत्तक यामध्ये पती/ पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यास, तसेच पती /पत्नी यापैकी एकाचे  मृत्यू झाल्यास, सदर व्यक्ती दुसरे  लग्न  करत असल्यास व त्याचे मुल/ मुली असतील, त्या मुलांना लग्न झालेल्या व्यक्तीचे नाव जोडण्याकरीता सावत्र दत्तक केल्या जाते. अशा दत्तक इच्छुक पालकांनी CARA (Central Adoption Resource Authority)  यांचे cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात.

 3)  प्रतिपालकत्व दत्तक घेणे : काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके बालकल्याण समिती चंद्रपुर यांच्या आदेशान्वये बालगृहात दाखल होतात. अशा बालकांना त्यांचे पालक बालकांचे पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते. किंवा बालकांना 6 महिन्यापासून  भेटायला आले नाही, अशा बालकांना बाल कल्याण समिती द्वारे प्रतिपालकत्व तत्वावर पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते. किंवा इच्छुक पालकांना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व  कुटुंबाचे प्रेम मिळण्यासाठी दत्तक देण्यास येते. यासाठी इच्छुक पालकांनी https://fcdcommpune.com/admin  या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी.

यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती SFCAC (Sponcership and Fostercare ApprovalCommittee) द्वारे पात्र ठरविल्यानंतर बालकल्याण समिती मार्फत बालकाचा ताबा देान वर्षकरीता पालन पोषण करण्यासाठी पात्र कुटुंबाकडे देण्यात येतो. बालकाचे नाव / आडनाव बदलण्याचा अधिकार पात्र कुटुंबाला राहत नाही व दोन वर्षानंतर बालक जर त्या कुटुंबात रुळले तर अशा बालकाला दत्तक घेण्याची प्रक्रिया पालक  कोर्टामार्फत करु शकतो.

दत्तक प्रक्रिया जाणून घेणे व दत्तक प्रक्रियेकरिता नोंदणी विषयी जाणून घेण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला  भेट देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालाविकास अधिकारी दीपक बानाईत आणि जिल्हा  बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.

००००

एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल प्रवेशाकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन

 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल प्रवेशाकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Ø 25 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 25 : सन 2025-26 या शैक्षणिक  वर्षात  एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुल, देवाडा मध्ये इयत्ता 6 वी, 7 वी व 9 वी च्या वर्गातील अनुशेष भरून काढण्याकरीता सद्यस्थितीत 5 वी, तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पालकांचे उत्पन्न 6 लक्ष रुपयांपेक्षा कमी असलेल्या अनुसुचित जमातीचे / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत तसेच इयत्ता 6 वी, इयत्ता 7 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांकरीता 11 ते  2 या वेळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील एकलव्य मॉडेल रेसिडिेंशिअल स्कूल, देवाडा ता. राजुरा येथे स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी सदर प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेकरिता विहित अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, सिव्हिल लाईन, जिल्हा क्रिडा  संकुलाच्या मागे, चंद्रपूर येथे व या प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेले सर्व शासकीय आश्रमशाळा व शासकीय आदिवासी मुला/ मुलींचे वसतीगृह येथून प्राप्त  करून घ्यावे. तसेच अद्यावत माहिती भरलेले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसोबत वरिलप्रमाणे नमुद ठिकाणी  25 जानेवारी  2025 पर्यंत सादर करावे. नमुद दिनांकानंतर अर्ज स्विकारले जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

००००००