Search This Blog

Friday, 6 December 2024

नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा

 

नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा

Ø नागपूर – अमरावती विभागासाठी मोहीम

चंद्रपूर, दि. 6 : नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत ‘विशेष अभय योजना 2024-25’ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे –प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, अशा जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा तसेच आपल्या नझुल जमिनी वर्ग ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

16 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत विशेष अभय योजना सन 2024-25 च्या तरतुदी खालीलप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत.

1) ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, त्यांनाच सदर योजना लागू राहील. 2) अभय योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठीच लागू राहील. 3) नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या आहेत, त्यांनाच फ्री होल्ड करण्याकरीता (भोगवटदार – 1) अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील येणा-या बाजारमुल्याच्या 2 टक्के एवढे अधिमुल्य आकारण्यात यावे. फ्री होल्ड करण्याकरीता पुर्वीचा भाडेपट्टा नियमित करणे, शर्तभंग नियमानुकूल करणे संदर्भात पूर्वीच्या अटी कायम राहतील. अभय योजनेत थकीत भाडेपट्ट्याची रक्कम 0.02 टक्के दराने आकारणी करण्यात येईल.

4) निवासी प्रयोजनार्थ प्रिमियम लिलावाद्वारे अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीचे वार्षिक भु-भाडे आकारणी 0.02 टक्के दराने व 31 जुलै 2025 या कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. 31 जुलै 2025 पर्यंत प्रलंबित भु-भाडे न भरल्यास थकीत भू-भाडे व त्यावर वार्षिक 10 टक्के दंडनीय व्याज आकारणी करण्यात येईल. 5) विशेष अभय योजना समाप्तीनंतर 1 ऑगस्ट 2025 पासून शासन निर्णय 23.12.2015 व शासन निर्णय 2.3.2019 च्या तरतुदी लागू राहतील. त्यानंतर भु-भाडे अथवा फ्री होल्ड करण्यास अभय योजनेमध्ये मिळणारे फायदे मिळणार नाहीत. त्यानंतर फ्री होल्ड करण्याकरीता प्रयोजन परत्वे 2 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये निवासी प्रयोजनाकरीता 5 टक्के तर वाणिज्यिक / औद्योगिक प्रयोजनाकरीता 10 टक्के रुपांतरण अधिमुल्य आकारून नझुल जमीन फ्री होल्ड केली जाईल.

त्यामुळे जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजना 2024-25 चा लाभ घ्यावा व आपल्या नझुल जमिनी सत्ताप्रकार ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

इतर मागासवर्गीय मुले/मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करा

 

इतर मागासवर्गीय मुले/मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करा

Ø अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत

चंद्रपूर, दि. 6 : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहता यावे, यासाठी शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षासाठी व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असावा. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मुले/ मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

असे आहेत प्रवेशाचे निकष व नियमावली : विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा मात्र चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच शिक्षण घेणारा असावा, वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारांच्या आत असावे. वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलेअर व कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे.

असा करा अर्ज : जाहिरात काळजीपूर्वक वाचून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. अर्जात नमुद संर्पूण कागदपत्रे जोडून सदर अर्ज वसतीगृहात जमा करावा.  अधिक माहितीकरीता सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर चंद्रपूर येथे संपर्क करावा.

०००००

अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

 

अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन   

चंद्रपूर, दि.  6  : वरोरा रेल्वे स्टेशन येथे दक्षिण एक्सप्रेस मधून एका अनोळखी पुरुषाला खाली उतरवून सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे बल्लारशहा ड्यूटी रेल्वे स्टेशन उपप्रबंधक यांनी लेखी मेमोद्वारे पोलिसांना कळविले. त्यानुसार अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसम बेवारस असल्याने अनोळखी पुरुषाची आजपावेतो ओळख पटलेली नसून नाव, पत्ता किंवा नातेवाईकाबाबत माहिती मिळालेली नाही.

मृतकाचे वर्णन : अनोळखी पुरुष, रंग -सावळा, बांधा - सडपातळ , उंची – 5 फुट 2 इंच, केस – काळे, समोर टक्कल, चेहरा – लांब, नाक – सरळ. उजव्या हातावर इंग्रजीत एस.एम असे नाव लिहिलेले व मनगटात शेंदरी रंगाचा धागा. अंगात पांढ-या रंगाची सॅन्डो बनियान, काळ्या रंगाचे जॅकेट आणि हिरव्या रंगचा लोअर घातला आहे.

सदर अनोळखी मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास तपासी अंमलदार धनराज नेवारे (मो. 9823442292) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

०००००

Thursday, 5 December 2024

जिल्हा माहिती कार्यालय येथील वृत्तपत्राच्या रद्दी विक्रीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

 जिल्हा माहिती कार्यालय येथील वृत्तपत्राच्या रद्दी विक्रीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 5 : जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय, रुम नं 20, पहिला माळा, प्रशासकीय भवन, येथील दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्राची रद्दी विकावयाची आहे. त्यासाठी स्थानिक दुकानदारांकडून खरेदीबाबतचे दरपत्रक (निविदा) जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात सिलबंद पाकिटात दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचतील, या बेताने पाठवावीत. पाकिटावर रद्दी विक्रीसाठी दरपत्रक असे ठळक अक्षरात नमुद करावे.

प्राप्त झालेले दरपत्रक (निविदा ) त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता उघडण्यात येईल. निविदा उघडतांना आपण स्वत: किंवा आपला प्रतिनिधी उपस्थित राहू शकेल. रद्दी विकण्याबाबतचे दरपत्रक (निविदा) मंजूर करण्याचे अथवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांनी राखून ठेवले आहेत. रद्दी विक्री कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, रुम नं 20, पहिला माळा, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे संबंधितांना पाहता येईल.

००००००

‘त्या’ प्लॉटधारकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

 ‘त्या’ प्लॉटधारकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

Ø ताडोबा येथे कुटीचे बांधकाम न करता आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण

चंद्रपूर, दि. 5 : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्ट प्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे प्रलोभन दिल्याप्रकरणी तसेच कुटीचे बांधकाम न करता 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्सचा मालक भरत नानाजी धोटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत धोटे याने मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतिश पोद्दार यांच्या ले-आऊटवर तसेच चांदा रयतवारी येथील ले-आऊट वरील गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याने संबंधित प्लॉटधारकांनी या संदर्भातील कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोपी भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या माध्यमातून मौजा पद्मापूर, अजयपूर, तळोधी (तुकूम), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करून सदर कुटी युनिव्हर्स ॲग्रो टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा करण्याचे आमिष दाखविले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह 7083 रुपये देण्याचे प्रलोभन दाखवून प्रत्येक गुंतवणूकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सर्व पिडीत अन्यायग्रस्तांतर्फे अशोक पांडूरंग भटवलकर, रा. म्हाडा कॉलनी, दाताळा यांच्या लेखी रिपोर्टवरून 19 डिसेंबर 2022 रोजी भरत धोटेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून या तपासात आरोपी भरत नानाजी धोटे याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतीश पोद्दार यांचे सर्व्हे क्रमांक 76/3 आणि 76/4 तसेच मौजा चांदा रयतवारी भुमापन क्रमांक 415/1 व 416 येथे सुध्दा ले-आऊट तयार करून प्लॉटच्या विक्रीकरीता सदर ग्राहकांसोबत 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर विसारपत्र केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित ले-आऊटमधील प्लॉट घेण्याकरीता विसारपत्र करणा-या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले संबंधित प्लॉटचे विसारपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे बातमी प्रकाशित झाल्यापासून 8 दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी केले आहे.

००००००