Search This Blog

Thursday, 27 November 2025

मृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी


मृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी

Ø ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत शासन निर्णय जारी, 1 डिसेंबर रोजी कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 20 नोव्हेंबर 2025 अन्वये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत खुन प्रकरणामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना गट-क य गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर शैक्षणिक अहतेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात 1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर  या कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील वारसांनी नियोजित कार्यशाळेला उपस्थित राहून, अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, विनोद मोहतुरे यांनी केले  आहे.

००००००

इरई नदीच्या पूरबाधित क्षेत्राची पाहणी व आखणी

 इरई नदीच्या पूरबाधित क्षेत्राची पाहणी व आखणी

Ø पाटबंधारे विभागाच्या फिरते पथकाला माहिती देण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 27 : इरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील गावांमध्ये पूर बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व आखणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहे. यात कढोली, चिंचोली. वढोली, पायली, किटाळी, मिनगांव, चांदसुर्ला, लोहनविचोडा, अंबोरा, विचोडी  बु., नेरी, पडोली, लखमापूर, वडगांव, चांदा रै. कोसरा, रहमत नगर, बालाजी वार्ड, नगिनाबाग, सिस्टर कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर, दाताळा, देवाडा, बोररिठ, आरवट, चारवट, नांदगाव पोडे, हडस्ती गावे व वस्तींचा समावेश आहे.

            1 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत विभागाचे फिरते पथक नदीकाठच्या भागात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधेल व पूरस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करेल. नागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी,  असे कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

००००००


Wednesday, 26 November 2025

जिल्हाधिका-यांकडून घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी

 





जिल्हाधिका-यांकडून घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी

चंद्रपूर, दि. 26 : नगर परिषद / नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 26) घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी करून सुचना दिल्या.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी नगर परिषद, घुगुस येथील ईव्हीएम मशीन ठेवायचा सुरक्षा कक्ष व जनता विद्यालय घुगुस येथील आठ मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वयसेवकांची नेमणूक, आवश्यक त्या सोयीसुविधा तसेच मतदान पथकांना जास्तीत जास्त व अचूक प्रशिक्षण देण्यासंबंधी सूचना केल्या.

यावेळी चंद्रपुरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, घुग्गुस न.प. चे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपुरचे तहसीलदार चंद्रपूर विजय पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश रांजणकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.

            भद्रावती येथे जिल्हाधिका-यांची भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती नगर परिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथील स्ट्राँग रुमला भेट दिली तसेच मतमोजणी कक्षाची देखील पाहणी केली व आवश्यक सूचना केल्यात. निवडणुकीची पुढील  प्रक्रिया साहित्य वाटप, मतमोजणी प्रकिया ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे होणार आहेत.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी  प्रभाग 11 चे मतदान केंद्र जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती तसेच यशवंतराव शिंदे (प्रभाग 7) येथील मतदान केंद्रांना भेट दिली.  या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अतूल जटाले, भद्रावतीचे तहसीलदार बालाजी  कदम,  न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकी, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, नायब तहसीलदार श्री. काळे, समीर वाटेकर, राकेश महकुलकर, राजू काळे इत्यादी उपस्थित होते. भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या 52572 असून स्त्री मतदार 26557, पुरुष मतदार 26015 आहेत. एकूण मतदार केंद्राची संख्या 63 आहे.

०००००

चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम

 


चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 26 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व बालविवाह प्रतिबंध अभियान अंतर्गत चांदा पब्लिक स्कूल येथे चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चांदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य आम्रपाली पडोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर व चांदा पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी ही उपस्थित होते.

याप्रसंगी अभिषेक मोहुर्ले यांनी युट्युबवर असलेली गुड टच व बॅड टच स्टोरी विद्यार्थ्यांना दाखविली. यावेळी ते म्हणाले, आजचे बालक सुरक्षित असले पाहिजे. बालकांना कुठेही शारिरीक, मानसिक सामाजिक समस्या येत असेल अशावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ही यंत्रणा बालकांचे संरक्षण करण्याचे कार्य करित असते. बालकांनी फ्रेंड्स बनविले पाहिजेत, आपल्या भावना शेअर केल्या पाहिजेत, परंतु बार्डर लाईन कधीही क्रॉस करू नये. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. सोशल मिडियाचा वापर जपून करावा, अथवा करू नये.

मार्गदर्शन करतांना सखी वन स्टॉप सेंटरच्या राणी खडसे यांनी बालकांशी हितगुज करित सखी वन स्टॉप सेंटर व महिला हेल्पलाईन 181 कार्याबाबत बालकांना माहिती दिली.  सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूरद्वारे करण्यात आले, यावेळी कार्यक्रम आयोजनाचे प्रभारी म्हणून फहिम शेख आणि रूहिना तबस्सूम यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी चिकटे व अंतरा पारखी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार तनिष्का बुरण या विद्यार्थीनीने मानले.

०००००००

विशेष लेख : श्री गुरु तेग बहादुर – 'हिंद दी चादर'

 

विशेष लेख                                                                                                                       दि.26/11/2025

श्री गुरु तेग बहादुर – 'हिंद दी चादर'

चंद्रपूर, दि. 26 : श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना 'हिंद दी चादर' या नावाने गौरविले जात. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे.

श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा, यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिब जी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

एप्रिल 1621 मध्ये अमृतसरमध्ये श्री गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरु हरगोबिंद आणि माता  नानकी देवी  यांच्या कुटुंबात झाला. 1664 मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरु तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारीसारखा धैर्यवान हे नाव दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती. मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले.

धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदनी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले. मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना गुरू तेग बहादुर शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मुल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने 2022 मध्ये त्यांची 400 वी जयंती देशभर साजरी केली होती

त्यांनी देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले व सुमारे 57 शबद (भक्तिगीते) आणि 57 सलोक (उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत.

'जो नर दुःख में दुःख नहीं मानें,

सुख सनेहु अरू भय नहीं जा कै, कांचन माटी मानै,

लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै

जो नर दुःख में दुःख नहीं मानै'

म्हणजेच जो मनुष्य दुःखात असला तरी दुःखी होत नाही, जो सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ, मोह, अभिमान, आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत.

त्यांच्या शहिद समागमास 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अल्पसंख्यांक विभाग आणि श्री गुरू तेग बहादुर साहिब जी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नुकत्याच या कार्यक्रमांच्या आयोजनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी 'हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यशाळेनिमित्त शीख, सिकलिगर, बंजारा, लबाना, मोडियाल, सिंधी हे सहा समाज एकत्र आले होते आणि हा कार्यक्रम जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती आणि शासन एकत्रितरित्या काम करीत आहे. त्यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात गुरू तेग बहादुरांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

                                                                                                            श्रध्दा मेश्राम

विभागीय संपर्क अधिकारी, मुंबई

०००००