Search This Blog

Tuesday, 9 June 2026

तूर बियाणे घटकाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा


तूर बियाणे घटकाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा

चंद्रपूर, दि. 09 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षक अंतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत शेतकऱ्यांनी  राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान सन 2026-27 अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तूर 50 टक्के अनुदानावर तसेच तूर मिनीकिट 100 टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली अर्ज करावा

अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे करीता अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

००००००

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू

 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू

चंद्रपूर, दि. 09 : कौशल्य विकास व उद्योजकता नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 या सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू झाले आहे.

ऋषी अगस्त्य शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना  21 मे पासून नि:शुल्क मार्गदर्शन सत्र सुरू करण्यात आले आहे. तसेच अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जून आहे. उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती आणि निश्चिती या केंद्रावर करू शकतील. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती व प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. ऑनलाईन प्रवेशाकरिता http://admission.dvet.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच संस्थेत प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऋषी अगस्त्य शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे डिझेल मेकॅनिक, ट्रक्टर मेकॅनिक, कारपेंटर, स्टेनो, कोपा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅन्ड इलेक्ट्रानिक्स, मेसन स्युईंग टेक्नॉलॉजी, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, फिटर, मोटर मॅकेनिक, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रानिक्स मेकॅनिक, आर.ए.सी., वायरमन, आयसीटीएस, इत्यादी व्यवसायात प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.

पात्रताधारक उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे (10 वी ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर) व इतर शालेय प्रमाणपत्रासह प्रवेश अर्ज भरण्याकरिता व अधिक माहितीसाठी संस्थेमध्ये सकाळी 10 ते  सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य जी. यु. राजुरकर यांनी  केले आहे.

०००००

12 जून रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

12 जून रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूर, दि. 09 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडल करिअर सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने 12 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 32 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून वी. आर इंटरप्रायजेस, चंद्रपूर यांच्याकडे तांत्रिक पदे तसेच जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 10 उमेदवार भरावयाचे असल्याचे कार्यालयास कळविण्यात आले आहे.

तरी मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या 2 प्रतीसह उपस्थित राहावे. तरी अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक 0717- 252295 येथे संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

००००००

Monday, 8 June 2026

इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी





इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चंद्रपूर, दि. 8 : चंद्रपूर शहराला समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची कामे सध्या वेगाने सुरू असून, या कामांची जिल्हाधिकारी  वसुमना पंत यांनी सोमवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली.

इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला २८ मार्च २०२६ पासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात आतापर्यंत चोराळा पुलापासून माना टेकडीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठल मंदिर प्रभागातील श्री वैभवलक्ष्मी माता मंदिर परिसर, इरई-झरपट नदी संगम तसेच हडस्ती पुलाजवळील कामांची तपासणी केली.

यावेळी त्यांनी नदीपात्रातून काढण्यात येणारा गाळ नदीकाठावर न ठेवता निश्चित डम्पिंग स्थळी साठविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गाळ काढण्याची प्रक्रिया, वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि कामाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली. नदीपात्रातून निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पाहणीवेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, तहसीलदार विजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार , शहर अभियंता रवींद्र हजारे, सीटीपीएसचे अभियंता श्री. हजारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंग, उपअभियंता श्री. सय्यद, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सलीम शेख, उपअभियंता रवींद्र कळंबे, उपअभियंता आशिष भारती तसेच कंत्राटदार जुनेजा उपस्थित होते.

इरई नदीचे वहनक्षमता वाढविणे, पूरस्थितीचा धोका कमी करणे आणि नदीचे पुनरुज्जीवन करणे या उद्देशाने ही गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर काम अधिक गतीने व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

०००००००

जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा



जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा मातृत्व व बालसंगोपन अधिकारी स्नेहल कसारे, डॉ.राजेंद्र सुरपामा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, महानगर पालिका चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल चटकी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, एआरटी वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करण्याच्या सूचना वसुमना पंत यांनी दिल्या. तसेच एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजना असून त्याचा लाभ प्रत्येक एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला सहामाही पास योजना, एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांसाठी बाल संगोपन योजना व मिशन वात्सल्य योजना, तसेच विमा कवच साठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबधित विभागाला सूचना देण्यात आल्या.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे 2026 ते 2027 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या "मिशन एड्स सुरक्षा" संदर्भात माहिती दिली.

तसेच अतिजोखीम गटात असणाऱ्या टीजी, एमएसएम, एफएसडब्ल्यु यांना राशन कार्ड मध्ये अंत्योदय, आधार कार्ड, मतदान कार्ड, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा पाठपुरावा  व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा समुदाय संसाधन समूह स्थापन करण्यात आले आहे.

आढावा बैठकीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात या वर्षात राबविण्यात  ग्राम पंचायत स्तरावर बैठका, 15 संवेदनशील गावांमध्ये पथनाट्य, प्लॅश मौब, महाविद्यालय स्तरावरील रेड रिबन क्लब स्थापना व एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांना पौष्टिक आहार वाटप या बद्दल सविस्तर माहिती दिली.            बैठकीला संबोधन ट्रस्ट , संकल्प बहुउध्येशिय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, क्राईस्ट हॉस्पीटल, प्लॅन इंडिया आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

oooooooo