Search This Blog

Friday, 24 February 2023

वीर बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र सर्वत्र ऐकू यावा

 




वीर बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र सर्वत्र ऐकू यावा  

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Ø ‘धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा

चंद्रपूर, दि. 24 : वीर बिरसा मुंडा यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. शूरता आणि वीरतेचे प्रतिक म्हणजे बिरसा मुंडा होय. त्यांचे कार्य जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहचावे, हाच उद्देश्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित नाटकामागे आहे. नाटकाच्या रुपाने वीर बिरसा मुंडा हे घराघरापर्यंत तर पोहोचतील परंतु त्यांची शूरता आणि वीरता यांचे अनुकरण करणेही गरजेचे आहे. वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनगाथेच्या माध्यमातून सर्वांनी सकारात्मक शक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक विभागाच्यावतीने पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) येथे आयोजित व अनिरुद्ध वनकर अभीनित क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्यावर आधारित ‘धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आशिष देवतळे, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, आदिवासी मोर्चाचे प्रकाश गेडाम, अल्का आत्राम, धनराज कोवे, उपविभागीय अधिकारी ढवळे, गटविकास अधिकारी मरसकोल्हे, तहसीलदार कनवाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष घोडे, अनिरुद्ध वनकर उपस्थित होते.

देशाचा सन्मान वाढविण्यासाठी जे जे काही समर्पित भावनेने देता येईल, ते ते देण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने केले. पोंभूर्णाच्या भूमिमध्ये मोठी शक्ती आहे. या गावाला ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा आहे. त्यामुळे वीर बिरसा मुंडा यांच्यावरील नाटक येथे होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार झटत आहे. पोंभूर्णाच्या एमआयडीसीत ‘प्लग अँड प्ले’ अशा पद्धतीने अल्प भांडवलावर आधारित उद्योग उभारणीचे काम सुरू आहे. यापूर्वी मिशन शौर्यच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी मदत करण्याची संधी प्राप्त झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख श्री. मुनगंटीवार यांनी केला.

चंद्रपुरातील आदिवासी तरुण-तरुणींसाठी ‘स्किल डेव्हलपमेंट’चे उपक्रम राबिवण्यात येत आहेत. बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर एसएनडीटीच्या माध्यमातून भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. येथे 62 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील सिम्बॉयसिसपेक्षाही दर्जेदार असे हे केंद्र राहणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ उपलब्ध आहे. ‘फ्लाइंग क्लब’च्या माध्यमातून येथे तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे.

या उपक्रमात चंद्रपूर, गडचिरोलीतील आदिवासींना 50 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा श्री. मुनगंटीवार यांनी केली. देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील आदिवासी बांधवांचा नेहमीच गौरव केला आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची मान गौरवाने उंचावली आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

०००००००

राज कपूर, व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार

                                


 राज कपूर, व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारासह

विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई / चंद्रपूर, दि. 24 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.  या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते. आता यापुढे या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असेल. याशिवाय राज कपूर आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप यापूर्वी 3 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते. आता या पुरस्काराचे स्वरुप 6 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एका आयोजित कार्यक्रमात लवकरच 2020, 2021 आणि 2022 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत केले जातील, अशी माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची बैठक नुकतीच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह दोन्ही पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक मधुर भांडारकर, राजदत्त, चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी उपस्थित होते.

००००००



6 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 6 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 24: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 6 मार्च  रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. असे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000

28 फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 28 फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय

रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 24: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये इलेव्हेंट रिअल इस्टेट चंद्रपूर, अॅलेक्सी मुच्युअल फंड निधी लिमी. अंतर्गत सेल्स ऑफीसर, सेल्स मॅनेजर, बँच मॅनेजर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे, वैभव एंटरप्रायजेस नागपूर, परम स्किल ट्रेनिंग इंडिया औरंगाबाद, जयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपुरी, एसबीआय लाइफ, उषा कन्सल्टन्सी नागपूर, नवकिसान बायोप्लॅटिक लिमीटेड, एल.अँड.टी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट पनवेल मुंबई, उत्कर्ष स्मॉल फायनास बँक नागपूर, स्पाटलाइट कन्सल्टन्सी ठाणे आदी कंपन्या सहभागी होणार आहे. या कंपनीमार्फत 748 जागा कंपनीमार्फत भरल्या जाणार आहे.

उमेदवारांनी मेळाव्याकरीता आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rajgar mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन ऑनलाईन अप्लाय करावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे,

00000

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पार्श्वभुमीवर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

 उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पार्श्वभुमीवर परीक्षा                            केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

चंद्रपूर, दि. 24: जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.  उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2023 मधील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 100 मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परीसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत/ क्षेत्रातंर्गत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, लॅपटॉप, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील उपरोक्त परीक्षेच्या सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील. हा आदेश उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केलेल्या आदेशित नमुद आहे.

00000