Search This Blog

Wednesday 3 February 2021

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

 

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

चंद्रपूर, दि. 3 फेब्रुवारी :  पुढील पाच दिवसात दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आंशिक ढगाळ ते निरभ्र हवामान राहून कमाल तापमान 31.8 ते 32.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13.8 ते 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे.

उन्हाळी भुईमूंग-पेरणी –

१.भुईमूंग पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे टिएजी-२४, टिजी-२६ किंवा एसबी-११ या वाणांचा वापर करावा.

२.पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेनडेंझीम किंवा मँकोझेब ३ ते ५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे लावून बीजप्रक्रिया करावी. तसेच रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे. जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.

३.पेरणी ३०X१० किंवा ३०X१५ सें.मी. किंवा ४५X१० सें.मी. अंतरावर वानपरत्वे एका ठिकाणी एकच बी टाकून करावे. बियाणे ५ ते ६ सें.मी. खोल पेरावे.

४.पेरणीच्या वेळेस नत्र २५ किलो/हे. (युरिया ५५ किलो किंवा अमोनिअम सल्फेट १२५ किलो) अधिक स्फुरद ५० किलो/हे. (सिंगल सुपर फास्फेट ३०० किलो) दयावे.

हरभरा –फुल ते घाटे

१.घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे.

२.घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली किंवा इमामेक्टीन बॅझोएट ५ टक्के एस.जी. ३ ग्रम किंवा क्लोरॉनट्रीनीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी धान –नर्सरी ते रोपांची पुर्नलागवड

१.  धान रोपवाटीकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी तण/कचरा काढून टाकावे व नंतर दर गुंठयास एक किलो युरिया दयावा.

२.धान रोपांचे वय २१ ते २५ दिवसाचे झाल्यावर रोवणी करावी. त्यासाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफयातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे काढण्यास मदत होते. पूर्वमशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलणी करावी. चिखलणी नंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाटी (फळी) फिरवावी.

३.चिखलणी करताना स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा

(५० किलो स्फुरद म्हणजेच डीएपी ११० किलो + ५० किलो पालाश म्हणजेच एमओपी ८५ किलो प्रति हेक्टरी) ० नत्रयुक्त् खताची निम्मी मात्रा (५० किलो नत्र म्हणजेच ६६ किलो युरिया प्रति हेक्टरी) शेतात मिसळावी व शेतातील पाणी बांधून ठेवावे.

तूर –शेंगा पक्वता ते मळणी    

१.तूर पिकाची पक्वतेनुसार काढणी/कापणी करून उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले बियाणे स्वच्छा करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

२.शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी पिक ५० टक्के फुलावर आल्याबरोबर पहिली फवारणी  क्विनॉलफॉस २५ टक्के इसी १६ मि.ली. त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

गहु- वाढीची अवस्था

१.ढगाळ हवामानामूळे गव्हावरील मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी थायोमिथाक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी  १० ते १५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी ४० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२.उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पाण्याच्या उपलब्ध साठयानुसार पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आवश्यकतेनुसार एक ते दोन निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

३.गहु पिकाला पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी नत्र खताची दुसरी मात्रा (५० ते ६० किलो प्रती हेक्टरी) पहिल्या पाणी देतांना दयावी.

करडई –फुल ते बोन्डे

१.पेरणीनंतर ३०, ५० आणि ६५ दिवसांनी ओलिताच्या तीन पाळया दयाव्या. जेथे एकाच ओलिताची सोय आहे तेथे ५० दिवसांनी, दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी ओलीत करावे. ओलीत करतांना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

२.मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३०  टक्के प्रवाही १३ मि. ली. किंवा असिफेट ७५ टक्के भुकटी १५ ग्रम प्रती १०  लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

लाखोळी-फुल ते शेंगा

मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि. ली. किंवा असिफेट ७५ टक्के भुकटी १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

उन्हाळी तीळ- पेरणी

उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी चांगला निचरा होणा-या जमिनीची निवड करावी. उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी ३ ते ४ किलो पीकेव्ही एनटी -११ जातीचे बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी कार्बेनडेंझीम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रायकेाडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे पेरणी करतांना त्यात समप्रमाणात वाळू मिसळावी. पेरणीच्या वेळेत १२.५ कि/हे.अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद २५ कि/हे.देऊन उरलेला नत्राचा दुसरा हप्तता १२.५ कि/हे. पेरणीनंतर ३० दिवसांनी दयावा. पेरणीनंतर लगेच ओलीत करावे.

वांगी-फुले ते फळ

    वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी इमामेक्टीन बॅझोएट ५% एस.जी. ४ ग्राम किंवा अझाडीराक्टीन १% २० मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५% प्रवाही ६ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन फवारणी करावी.

रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा. वरील माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी कळविले आहे.

0 0 0 0

No comments:

Post a Comment