Search This Blog

Tuesday 16 February 2021

मोहरी हे रब्बी हंगामासाठी उत्तम पीक

 


मोहरी हे रब्बी हंगामासाठी उत्तम पीक

मोहरी  शेतीदीन कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

डॉ. उदय पाटील यांचे प्रतिपादन

 

चंद्रपूर दि.16,: 'मोहरी' हे रब्बी हंगामातील एक उत्तम पीक असून शेतकऱ्यांनी पुढील येणाऱ्या रब्बी हंगामात मोहरीची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.

अखिल भारतीय सम्नवित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषि महाविद्यालय, नागपूर अंतर्गत  मु. वढा, ता. जि. चंद्रपूर येथील रमेश गोहोकर यांचे शेतात 9 फेब्रुवारी रोजी मोहरी शेतीदिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.

यावेळी वरोरा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, डॉ. बिना नायर प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी मार्गदर्शन करतांना मोहरी या पिकास वन्यप्राणी कमी प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे तसेच कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे असल्यामुळे या पिकाची लागवड करावी असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. बिना नायर, जवस पैदासकार  यांनी शेतकऱ्यांना जवस व मोहरी तेलाचे आहारातील महत्व आणि पि. के. व्ही. एन .एल 260 या जवस पिकाच्या वाणाबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहरी पैदासकार, डॉ. संदिप कामडी यांनी केले. त्यांनी मोहरी पिकाकरिता विदर्भातील थंड हवामान कशाप्रकारे उपयुक्त आहे, मोहरी कमी खर्चात कशाप्रकारे जास्त उत्पादन देते, मोहरी विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या बाजार पेठा तसेच टी.ए. एम. 108-1 आणि शताब्धी या वाणाबद्दल माहिती दिली.

डॉ. स्वप्निल ठाकरे, मोहरी कृषि विद्यवेत्ता यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना मोहरी पीक लागवड तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर माहिती दिली तर जवस रोगशास्त्रज्ञ जगदीश पर्बत यांनी मोहरी पीकावरील येणारी किड व रोग, त्यांची ओळख  आणि त्यांचे व्यवस्थान यावर मार्गदर्शन केले.

ज्या शेतकऱ्याच्या शेतात मोहरी शेती दिन कार्यकम घेण्यात आला ते रमेश गोहोकर  यांनी प्रथम रेषीय मोहरी प्रात्यक्षिकाची लागवड सोयाबीन पिकाची कापणी केल्यानंतर जमिनीत असलेल्या ओलावर केली असून पीक फुलोऱ्यावर असतांनी एक ओलीत केले आणि मोहरीच्या पिकापासून एकरी 6 क्विंटल उत्पादन मिळेल या बद्दलची माहिती कार्यकमा करिता उपस्थित मान्यवर शेतक-यांना दिली. यावेळी मोहरी उत्पादक  शेतकरी रमेश गोहोकर  यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रामाचे संचालन डॉ. स्वप्निल ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तांत्रिक सहाय्यक. शरद भुरे  यांनी मानले. कार्यक्रमाला कृषि विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी, कृषि मित्र व गावातील शेतकरी उपस्थीत होते.

00000

No comments:

Post a Comment