Search This Blog

Tuesday 16 February 2021

अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी 15 दिवसात कृती आराखडा तयार करा



 

अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी 15 दिवसात कृती आराखडा तयार करा

रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश

 

            चंद्रपूर दि 16 फेब्रुवारी :-  जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चंद्रपूर जिल्हाअंतर्गत येणाऱ्या सर्व महामार्ग व इतर रस्त्यांवर गावाचे दिशा दर्शक फलक व अंतराची माहिती लावण्यात यावे. तसेच दुचाकी स्टंट मुळे होणारे अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी 15 दिवसात कृती आराखडा तयार करून उपाययोजना व अंमलबजावणी करणाचे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले.

जिल्ह्यात 17 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्तासुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षते खाली  जिल्हा नियोजन सभागृह, चंद्रपूर येथे आज बैठक संपन्न झाली. यावेळी  जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी तसेच व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी व वाहन वितरक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाहतुक पोलिसांनी केवळ चालान करून फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देश न ठेवता नागरीकांना वाहतुक शिस्तीचे धडे देण्याकडे विशेष लक्ष देण्याचेही खा. धानोरकर  यांनी सांगीतले.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी ग्रामीण भागात जनावारांच्या अवागमनामुळे वाहतुकीस होणारा अळथळा दुर करण्यासाठी तसेच यामुळे होणाऱ्या अपघातास आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास दिले.

थ्री व्हिलर्स व माल वाहतुकदारांचे टेल लॅम्प, रिफ्लेक्टर्स साठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात यावी. यासाठी स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जेटपूरा गेट या भागातील वाहतूक कोंडी मुळे नागरीक अतिशय त्रस्त असून रस्ते लगत असलेल्या दुकानांसमोरील आडवी पार्कींग वाहने यामुळे रस्त्याचा 60 टक्के भाग व्यापला जातो. तसेच चंद्रपूर शहरातील सपना टॉकीज परिसरातून जड वाहतूकीद्वारे रेल्वेच्या मालाची वाहतूक करण्यात येते त्यामुळे वाहतूक कोडी निर्मान होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष लक्ष देऊन वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यात यावी. असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी शहरातील विविध होर्डीग वर फ्लेक्स लावणे, पत्रके वाटप करणे सोबतच शाळा तसेच महाविद्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करुन जनजागृती  करण्यात आल्याचे सांगीतले.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अपघात झालेल्या व्यक्तींना त्वरीत उपचार मिळण्याकरीता राज्य शासना मार्फत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजने  बाबत  यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन विभाग,  वाहतूक शाखेचे तसेच पोलिस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 00000

No comments:

Post a Comment