Search This Blog

Wednesday 17 February 2021

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

 


शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

Ø  विजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह गारपीट व हलका पाऊस पडण्याची शक्यता

चंद्रपूर दि. 17,    पुढील पाच दिवसात दिनांक १७ ते २१ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आंशिक ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी  तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह गारपीट व हलका पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उन्हाळी भुईमूंग-पेरणी –

१.उगवणीनंतर १० दिवसाच्या आत खांडया भरून घ्याव्यात.

२.तननाशकाच्या सहाय्याने तन  व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉस इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० टक्के एस.एल.१०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टरी ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा –फुल ते घाटे अवस्था

१.घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे.

२.घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली किंवा इमामेक्टीन बॅझोएट ५ टक्के एस.जी. ३ ग्रम किंवा क्लोरॉनट्रीनीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी धान –फुटवे अवस्था

१.रोवणीनंतर ३ ते ५ दिवसापर्यंत उगवणपूर्व तणनाशक पेट्रील्याकोर ५० टक्के २२ मी.ली.  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२.धान रोवणीनंतर रोपांची मुळे चांगली रूजेपर्यंत बांधीत पाण्याची पातळी २.५ सें.मी. (एक इंच) ठेवावी.

गहु- दाण्याची दुधाळ अवस्था

१.ढगाळ हवामानामूळे गव्हावरील मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी थायोमिथाक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी  १० ते १५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी ४० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२.उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पाण्याच्या उपलब्ध साठयानुसार पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे.

करडई –फुल ते बोन्डे

मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३०  टक्के प्रवाही १३ मि. ली. किंवा असिफेट ७५ टक्के भुकटी १५ ग्रम प्रती १०  लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

लाखोळी-फुल ते शेंगा

मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि. ली. किंवा असिफेट ७५ टक्के भुकटी १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

उन्हाळी तीळ- पेरणी

उन्हाळी तीळाची पेरणी राहिली असल्यास ती फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी ३ ते ४ किलो पीकेव्ही एनटी -११ जातीचे बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी कार्बेनडेंझीम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रायकेाडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे पेरणी करतांना त्यात समप्रमाणात वाळू मिसळावी. पेरणीच्या वेळेत १२.५ कि/हे.अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद २५ कि/हे.देऊन उरलेला नत्राचा दुसरा हप्तता १२.५ कि/हे. पेरणीनंतर ३० दिवसांनी दयावा. पेरणीनंतर लगेच ओलीत करावे.

भाजीपाला पिके- वाढीची अवस्था

भाजीपाला पिकावरील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एस.एल. २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारण्या दर १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी.

रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा. तसेच वरील माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment