Search This Blog

Friday 4 June 2021

पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण



पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

चंद्रपूर दि. 4 जून:-  कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता अद्ययावत अशा 7 रुग्णवाहिका आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूजन व हिरवी झेंडी दाखवून जिल्हा पोलिस ग्राऊंड येथे पार पडले.

कार्यक्रमाला खासदार बाळु धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत उपस्थित होते.

यापूर्वी जिल्हा खनिज विकास निधी मधून अद्ययावत अशा वीस मोठ्या रुग्णवाहिका पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या होत्या. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पंधरा रुग्णवाहिका प्रस्तावित आहेत. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल.

कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

No comments:

Post a Comment