21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत पुरुष नसबंदी पंधरवडा
चंद्रपूर, दि. 25 : कुटुंब नियोजन ही निरोगी, आनंदी व स्थिर कुटुंब व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांवर न राहता पुरुषांनीही त्यामध्ये समान सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पुरुषांचा कुटुंब नियोजनातील सहभाग वाढविणे व पुरुष नसबंदी, या सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2026 या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या मोहिमेचे घोषवाक्य ‘स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार’ असे आहे.
सदर मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येतअसून 21 ते 27 नोव्हेंबर या संपर्क सप्ताहात पुरुष नसबंदीबाबत जनजागृती, पात्र लाभार्थ्यांची ओळख, समुपदेशन व जनसंपर्क उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तर 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या सेवा सप्ताहात पात्र लाभार्थ्यांना पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुरुष नसबंदी (एनएसव्ही) ही सुरक्षित, सोपी व प्रभावी शस्त्रक्रिया पद्धत आहे. ही प्रक्रिया लहान छेद किंवा टाके न घेता विशेष तंत्राने केली जाते. प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ही शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक वैद्यकीय सल्ला व अल्प विश्रांती घेऊन लाभार्थी आपल्या दैनंदिन कामकाजाकडे परत येऊ शकतो. या पद्धतीमुळे पुरुषांच्या शारीरिक क्षमतेवर, लैंगिक क्षमतेवर किंवा सामान्य वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होत नाही, याबाबत समाजातील गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.
मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये : 1) पुरुष नसबंदीची सुरक्षित, सोपी व प्रभावी पद्धत म्हणून एनएसव्हीबाबत जनजागृती, 2) पात्र लाभार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रियेची सुविधा, 3) शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर आवश्यक समुपदेशन व वैद्यकीय मार्गदर्शन, 4) कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर, 5) शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मोबदला.
नागरिकांना आवाहन : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पुरुष नसबंदीविषयी माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पती-पत्नी दोघांचीही समान जबाबदारी आहे. कुटुंबाचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रगती लक्षात घेता पती-पत्नीने परस्पर संमतीने व योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार कुटुंब नियोजनाचा निर्णय घ्यावा. पुरुषांनी पुढाकार घेऊन पुरुष नसबंदी पंधरवड्यात सहभागी व्हावे, , असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment