Search This Blog

Sunday, 24 September 2017

गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये वर्धा जिल्हयाचा कायापालट करणारा संकल्प से सिद्धी महामेळावा


  • एकाच दिवशी 5 हजार 74 कोटीच्या कामांचे भूमीपूजन
  • सेवाग्राम आश्रमाच्या 266 कोटीच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ
  • मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, पालकमंत्री मुनगंटीवार यांची उपस्थिती

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :  रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्हयाचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम वर्धा येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वित्त, नियोजन व वने तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एकाच दिवशी 5 हजार 74 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
         सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाचा 266.53 कोटीच्या विकास आराखडयातील कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ व वर्धा जिल्हयाच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याचा संकल्प या कार्यक्रमात केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्प से सिद्धी उपक्रमाप्रमाणे सर्वकष विकासाची रूपरेषा कार्यक्रमातून ठरणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक यांना आमंत्रित करण्यात येणार असून शहर व ग्रामविकासाचा गाडा चालविणारे सर्व कर्मचारी देखील आमंत्रित केले जाणार आहेत. याच वेळी वर्धा जिल्हयासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ड्राय पोर्ट, राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय मार्ग निधी याच्या कोट्यवधीच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे. सोबतच संपूर्ण देशाला स्वराज्याचे स्वप्न जेथून पडले होते. त्या महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाच्या कामाचाही शुभारंभ यावेळी होणार आहे.
     आज चंद्रपूर येथे वनविभागाच्या विश्रामगृहावर या कार्यक्रमाच्या  योजनाची बैठक झाली. हा कार्यक्रम केवळ भूमीपूजन सोहळा नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या संकल्प से सिद्धी उपक्रमातील एक आदर्श आयोजन असेल. या ठिकाणावरून आगामी काळात वर्धा जिल्हयाच्या संपूर्ण कायापालटचा संदेश सर्वाना जाईल, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
        यावेळी या कार्यक्रमाच्या अभिनव नियोजनाबद्दल त्यांनी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुनावार, जिल्हाधिकारी शैलेष नवल, नगराध्यक्ष अतुल तराळे, संगीता शेंडे, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेम्भूर्णे, सुनील गफाट, भुपेंद्र शहाणे आदींची चर्चा केली.
सेवाग्राम आश्रमासाठी
266.53 कोटीचा आराखडा
जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑक्‍टोंबर 2016 रोजी 266.53 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यताही  दिली होती. आता या आराखडयातील कामांचे भूमीपूजन होणार आहे.
   या विकास आराखड्यात सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे वारसा संवर्धन, धाम नदी काठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरण, नदीच्या दोन्ही बाजूस, पवनार आश्रम ते विनोबा भावे यांच्या समाधीपर्यंत चालण्यासाठी पादचारी रस्त्याची निर्मिती, नदी काठाची स्वच्छता व नूतनीकरण तसेच पर्यटकांसाठी सुविधा,  सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरी बागेजवळ 1000 व्यक्तींसाठी सभागृह, यात्री निवासाच्या परिसरातील प्रदर्शन हॉलची दुरुस्ती, गांधी चित्र प्रदर्शनी येथील दुरुस्ती व नूतनीकरण,  हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा करण्यात येणारआहेत. 
     गांधी फॉर टूमारो - महात्मा गांधी प्रशिक्षण व संसाधन केंद्र हे विकास आराखड्यातील  सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र  ठरणार आहे. 
महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान, त्यांचे साधे राहणीमान, स्वच्छतेचा आग्रह, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान,  निसर्गोपचार, कला, संस्कृती याची माहिती पुढील पिढीला अध्ययनाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात येणार आहे.  

000

चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :- दीर्घ कालावधीत पाऊस न आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. या वर्षात केवळ 42 टक्के पाऊस झाल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यासाठी तातडीने पीक परीस्थितीचे  पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले.
               चंद्रपूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने, धानाचे, कापसाचे, सोयाबीन व अन्य सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अन्यत्र पाऊस होत असतांना जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना आवश्यक आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने सर्व नुकसानाची पाहणी  करण्यासाठी यंत्रणा कामी लावावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
               आज दुपारी या संदर्भातील पत्र पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले आहेत.
000

Monday, 18 September 2017

कर्जमाफीकरीता पात्र शेतक-यांनी 22 सप्टेंबर पर्यंत सेवा सहकारी संस्थेत कागदपत्रेही जमा करणे बंधनकारक

चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर- महाकर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करणे पात्र शेतक-याला आवश्यक असून सोबतच सेवा सहकारी संस्थेत कागदपत्रे जमा करणेही बंधनकारक आहे.त्यामुळे ऑनलाईन अर्ज करणा-या शेतक-यांनी सेवा सहकारी संस्थेतही आपले कागदपत्रे जमा करावी व 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ही योजना शासनाने सुरु केलेली असून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांसाठी ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत आहे. शेतक-यांनी ऑनलाईन केंद्रावर जाऊन ( http://CSMSSY.in या संकेतस्थळावर) आपला अर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरणा केल्यानंतर संबंधित शेतक-यांने त्यांचे आधार कार्ड, असल्यास पॅनकार्ड, 7/12 चा उतारा, बँक बचत खाते क्रमांक इत्यादी कागदपत्राची झेरॉक्स प्रत (मूळ प्रत देऊ नये) ही संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या सचिवास देणे बंधनकारक आहे. जर अशी कागदपत्रे सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाकडे जमा केली नाहीतर ते शेतकरी सदर कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र ठरत असतील,  तरीही  ते या लाभापासून वंचित राहू शकतात. पात्र शेतक-यांनी  या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपली वैयक्तीक माहिती कागदपत्रासह संस्थेच्या सचिवास तात्काळ सादर करावी. आतापर्यंत ज्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्या सर्वांसाठी ही बाब बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
000

मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय सेवांबाबत पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समिती गठीत

चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर- चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडीकल कॉलेज) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय चौकशी समितीचे गठन केले आहे. ही समिती बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती आणि सुधारणांबाबतचा अहवाल लवकरचसादर करणार आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा ही राज्यातील प्रगत रुग्ण सेवा झाली पाहिजे. यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी. या ठिकाणचा मृत्यूदर शून्य आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी, तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा. यासाठी सद्यास्थितीत सूचवायच्या उपाय योजनांसाठी ही पाच सदस्यीय समिती काम करणार आहे.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व जेष्ठांचे अतिदक्षता विभागाची स्थिती. या ठिकाणी रात्री व दिवसा  काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणा-या सोयी सुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणा-या सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती. या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम व आदी विषयावर ही समिती आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.
पालकमंत्र्यांनी नुकतेच वैद्यकीय महाविद्यालयाच्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात दोन बैठकी गेल्या आठवडयात घेतल्या होत्या. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. शनिवारी व रविवारी त्यांनी चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली. जिल्हयातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटी करणासाठी पालकमंत्री प्रयत्नशिल आहेत. ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, असे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत. सर्व वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी या पाच सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यासह अन्य तीन जणांचा समावेश आहे.   
0000  

Saturday, 16 September 2017

युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन- सुनंदा बजाज




चंद्रपूर, दि.16 सप्टेंबर – शिक्षण घेत असतांना आपण फक्त पुस्तिकी ज्ञान ग्रहण करीत असतो. परंतु आपल्याला रोजगार उपलब्ध करुन घेण्यासाठी अनुभवाची आवश्यकता असते. त्यामुळे शिक्षणासह रोजगार मिळवण्यासाठी अशा रोजगार मेळाव्याचा लाभ युवक, युवतींना घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज यांनी आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे  कौशल्यम सभागृह चंद्रपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात बोलतांना केले.
यावेळी मंचावर यशस्वी गृपचे व्यवस्थापक आशिष अतकरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीटीआर विभागाचे श्री.नखाते, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  सी.बी.कोहाडे, संत रोहीदास चर्म महामंडळ व्यवस्थापक विजयालक्ष्मी भगत, इतर मागासवर्गीय महामंडळाच्या व्यवस्थापक दिपाली मांजरे, व्हीटीपीचे प्रमुख प्रवीण पोशेट्टीवार उपस्थित होते.
यावेळी श्रीमती बजाज म्हणाल्या, या ठिकाणी आलेल्या उद्योग समुहामध्ये काम करुन अनुभव घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली असल्याने या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. या अनुभवाचा आपल्याला कधी ना कधी  रोजगार मिळविण्यासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वी गृपचे व्यवस्थापक आशिष अतकरी यांनी आमच्या कंपनीतर्फे युवकांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना सक्षम करण्यात येत असते. या तीन वर्षाच्या कामाचे मुल्यमापन केल्यानंतर त्यांना याच कंपनीत किंवा इतरही कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होते. त्यामुळे युवकांनी घरी न बसता इतर ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण एकाच रोजगाराच्या मागे न लागता जेथे काम मिळेल त्यापासून सुरुवात करणे योग्य असते. त्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढून संधी उपलब्ध होत असल्याने या संधीचे सोने करावे, असेही ते म्हणाले.
तसेच यावेळी महामंडळाचे व्यवस्थापक कोहाडे, श्रीमती मांजरे, श्रीमती भगत यांनी आपल्या महामंडळातर्फे बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच अस्वीन पालीकर यांनी मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये कशा संधी उपलब्ध आहेत यासंबंधीची माहिती दिती. तर श्री.नखाते यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात सिपेट व्हीटीपी चंद्रपूर, एज्युब्रिज व्हिटीपी, युवापरिवर्तन व विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी विविध उद्योगांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच युवक, युवतीही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन राहूल गुल्हाने यांनी तर प्रास्ताविक व आभार कनिष्ठ सेवायोजन अधिकारी  विजय गराटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय राऊत, रमेश गाऊत्रे, विजय पांढव, अशोक बुरेवार, योगेश काळे, पंकज कचरे व प्रकाश चहारे यांनी सहकार्य केले.

0000