Search This Blog

Friday, 1 May 2020

जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी संयम ठेवावा ; प्रत्येकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणार : ना. वडेट्टीवार


स्थलांतरितांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू
Ø  चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्येच ; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
Ø  स्थलांतरितांना आणण्याची कारवाई पुढची अनेक दिवस चालणार
Ø  चंद्रपूरमध्ये पालकमंत्री समन्वयन कक्षाचे गठण
Ø  स्थलांतरितांशिवाय सामान्य नागरिकांसाठी पोलिसांकडूनच परवानगी
Ø  जिल्ह्यातील 60 विद्यार्थी कोटा शहरातून परतले
Ø  सर्व विद्यार्थी 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाइन करण्यात आले
चंद्रपूर,दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
अन्य राज्यात अडकून पडलेल्या मजूर, श्रमिक, विद्यार्थी, प्रवासी, व्यापारी, सर्वांनाच जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्यशासनाने सांगितल्याप्रमाणे रणनीती आखत आहे. प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत केली जाईल.  प्रत्येकाला जिल्ह्यामध्ये परत आणले जाईल. यासाठी जिल्हा प्रशासना सोबतच आपली यंत्रणादेखील काम करत असून पालकमंत्री समन्वय कक्षाची आजपासून स्थलांतरासाठी सुरुवात करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
बाहेर जिल्ह्यात राज्यात ओळखलेल्या नागरिकांनी ज्या जिल्ह्यात ते अडकले आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तालुका प्रशासनाची संपर्क साधणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात यात अडकून पडलेल्या आहात त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने ते चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांबाबतही अन्य राज्यांना व जिल्ह्यांना माहिती प्रशासनामार्फत दिली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्या प्रशासनाकडे आपली माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले आहे.
ज्या जिल्ह्यात या ठिकाणी अडकले आहेत. त्या प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रवास करण्याविषयी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील प्रवाशांची केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून  24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी 5 दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री समन्वयन कक्ष दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232) मुल नागभीड राजुरा कोरपना चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449) चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रीन झोनमध्ये :जिल्हाधिकारी  
चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील 2 नागरिक पॉझिटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही राज्य शासनाच्या काही वेबसाईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णांचा चंद्रपूर शहराच्या नावावर उल्लेख दाखविण्यात येतो मात्र हा उल्लेख चुकीचा असून चंद्रपूर जिल्हा एकही रुग्ण नसलेला जिल्हा आहे असा खुलासा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केला आहे.
53 विद्यार्थी कोटावरून परतले राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमासाठी अडकून पडलेल्या जिल्ह्यातील 53 विद्यार्थ्यांचे चंद्रपूर शहरांमध्ये आज आगमन झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेन्टाईन करण्यात आले. राज्य शासनाने कोटा येथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बीड येथून विशेष बसेस सोडल्या होत्या प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरापर्यंत सोडण्यात आले आहे. हे विद्यार्थी देखील शहरात आज पोहोचले आहे.
            जिल्ह्यात 1‌ मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 114 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  106 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 98 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 7 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 197 आहे. यापैकी 2 हजार 258 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 939 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 220 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
            संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 306 प्रकरणात एकूण 16 लाख 33 हजार 570 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1047 वाहने जप्त केली आहेत.
00000

प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सीसीडी कट्टा मित्र परिवाराकडून मदत


आणखी मदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
चंद्रपूर, दि.1 मे: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मदत केली आहे.
स्व. सुशील महातव यांचे कर्करोगाच्या उपचारासाठी सीसीडी कट्टा मित्र परिवार जिल्हा स्टेडियम चंद्रपूर यांच्याकडून निधी जमा करण्यात आलेली होता. त्यातील शिल्लक रकमेतून प्रधानमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 54 हजार  रुपयाचा धनादेश सीसीडी कट्टा मित्रपरिवार प्रवीण गुज्जनवार, मारोती पुनवटकर, प्रकाश सुर्वे, हेमंत घिवे, मकरंद खाडे, अभय बनपूरकर, प्रवीण चवरे, सोनू गज्जलवार, सचिन भिलकर  यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना देऊन सहाय्यता निधीला मदत केली.
मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023, शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वरील दिलेल्या खात्यामध्ये मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा जेणेकरून गर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही  करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
0000

चंद्रपूर येथे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण


कोरोना विरूध्दच्या लढयात सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन

         चंद्रपूर दि 01 मे : चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र दिनाला राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोरोना विरुद्धच्या लढयात सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       कोरोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले प्रामुख्याने उपस्थित होते.
         ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील जनतेला व्हिडिओ संदेश देताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात ज्या थोर विभूतींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना अभिवादन केले. जिल्ह्यातील समस्त जनतेला त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावर कोरोना आजाराचे संकट असताना एकत्रित प्रयत्नातून या आजारावर विजय मिळविण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.
          जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे आगामी काळात देखील प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेत जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
         याकाळात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, शहरांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष असणारे पोलीस व उपाययोजना करणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
       जिल्हा बाहेर असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, प्रवाशांना मजुरांना जिल्ह्यामध्ये आणण्याचे मोठे काम आगामी काळात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून होणार आहे. या काळात शारीरिक अंतर ठेवत अतिशय बारकाईने स्थलांतरितांचा गुंता सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 0000000

Thursday, 30 April 2020

जिल्हयातील 13 हजार 739 मजुरांशी प्रशासनाकडून संपर्क साधणे सुरू


मुंबई- पुण्यातील विद्यार्थी, प्रवाशांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा
चंद्रपूर, दि.30 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये जवळपास 19 राज्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 13 हजारावर मजूर अडकले आहेत. तसेच राज्यात व राज्याबाहेर हजारो यात्रेकरू, विद्यार्थी, प्रवासी, अडकले आहेत. या सर्वांना जिल्ह्यात पोहचण्यासाठीच्या उपाय योजना जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
 यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाहेर राज्यात व राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीने जिल्ह्यात परत आणण्यासाठी संपर्क साधला जात आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक मजूर हे तेलंगाना राज्यात आहे. मजुरांची तेलंगाना मधील सध्या उपलब्ध असणारी आकडेवारी 10 हजार 558 आहे. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश मध्ये जवळपास 2643 नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत दिल्ली, गुजरात, राजस्थान, पंजाब ,उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा ,पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, दमन, तामिळनाडू, हरियाणा, गोवा,आदी राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची माहिती आहे.      याशिवाय राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राशिवाय अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी पाच दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांनी आपल्या भागात जाताना संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रवासी व नागरिकांनी ज्या राज्यात जायचे आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी व आयुक्त महानगर पालिका यांच्याकडे दयावी. त्यानंतर जिथे जायचे आहे त्या ठिकाणासाठी परवाना घेणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय दाखला घेणे आवश्यक आहे. बाहेर राज्यातून  व
महाराष्ट्रातील अन्य शहरातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने देखील हीच प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या वाहनावर परवानगी लावणे, तपासणी करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे व आपल्या शहरात आल्यानंतर प्रत्येकाने 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाईन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
00000

कोरोना आजार जनसामान्यांना कळण्यासाठी चंद्रपूरमध्ये प्रश्नमंजुषा


चंद्रपुर,दि.30 एप्रिल: जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य नागरिकांना कोरोना आजार कळावा, कोरोना आजाराची वैशिष्ट्ये, प्रतिबंधात्मक उपाय व नागरिकांच्या मनामध्ये असणारे सर्वसामान्य प्रश्न, उत्तरा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तर्फे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाबत विविध जनजागृती अभियान राबवीत आहे. सदरअभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकांना कोरोना बद्दल माहिती होणे हा आहे. याचाच एक भाग ऑनलाईन कोरोना जनजागृती-प्रश्नमंजुषा हा आहे. या प्रश्नमंजुषा मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
असे होता येणार सहभागी:
ऑनलाईन प्रश्नमंजुषा फॉर्म आपण मोबाईल, संगणक द्वारे सबमिट करू शकता. सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. प्रश्नमंजुषा मध्ये भाग घेण्याकरिता https://forms.gle/8vGMTDLmKSj8P1qV6  या लिंक वरून कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा फॉर्म सबमिट करावयाचा आहे. 60 टक्के पेक्षा जास्त गुण  प्राप्त करणाऱ्यास या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी चंद्रपूर व  मुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रपूर  यांचे स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपले ईमेल वर प्राप्त होईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच  व्हिव स्कोर मध्ये आपले गुण व आपले ईमेल मध्ये आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तरे पाहू शकता.
            प्रश्नमंजुषेची  लिंक chanda.nic.in तसेच www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि  District Corona Control Cell या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
00000