स्थलांतरितांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू
Ø चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्येच ; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
Ø स्थलांतरितांना आणण्याची कारवाई पुढची अनेक दिवस चालणार
Ø चंद्रपूरमध्ये पालकमंत्री समन्वयन कक्षाचे गठण
Ø स्थलांतरितांशिवाय सामान्य नागरिकांसाठी पोलिसांकडूनच परवानगी
Ø जिल्ह्यातील 60 विद्यार्थी कोटा शहरातून परतले
Ø सर्व विद्यार्थी 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाइन करण्यात आले
चंद्रपूर,दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
अन्य राज्यात अडकून पडलेल्या मजूर, श्रमिक, विद्यार्थी, प्रवासी, व्यापारी, सर्वांनाच जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्यशासनाने सांगितल्याप्रमाणे रणनीती आखत आहे. प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत केली जाईल. प्रत्येकाला जिल्ह्यामध्ये परत आणले जाईल. यासाठी जिल्हा प्रशासना सोबतच आपली यंत्रणादेखील काम करत असून पालकमंत्री समन्वय कक्षाची आजपासून स्थलांतरासाठी सुरुवात करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
बाहेर जिल्ह्यात राज्यात ओळखलेल्या नागरिकांनी ज्या जिल्ह्यात ते अडकले आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तालुका प्रशासनाची संपर्क साधणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात यात अडकून पडलेल्या आहात त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने ते चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांबाबतही अन्य राज्यांना व जिल्ह्यांना माहिती प्रशासनामार्फत दिली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्या प्रशासनाकडे आपली माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले आहे.
ज्या जिल्ह्यात या ठिकाणी अडकले आहेत. त्या प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रवास करण्याविषयी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील प्रवाशांची केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी 5 दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री समन्वयन कक्ष दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232) मुल नागभीड राजुरा कोरपना चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449) चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रीन झोनमध्ये :जिल्हाधिकारी
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील 2 नागरिक पॉझिटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही राज्य शासनाच्या काही वेबसाईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णांचा चंद्रपूर शहराच्या नावावर उल्लेख दाखविण्यात येतो मात्र हा उल्लेख चुकीचा असून चंद्रपूर जिल्हा एकही रुग्ण नसलेला जिल्हा आहे असा खुलासा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केला आहे.
53 विद्यार्थी कोटावरून परतले राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमासाठी अडकून पडलेल्या जिल्ह्यातील 53 विद्यार्थ्यांचे चंद्रपूर शहरांमध्ये आज आगमन झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेन्टाईन करण्यात आले. राज्य शासनाने कोटा येथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बीड येथून विशेष बसेस सोडल्या होत्या प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरापर्यंत सोडण्यात आले आहे. हे विद्यार्थी देखील शहरात आज पोहोचले आहे.
जिल्ह्यात 1 मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 114 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 106 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 98 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 7 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 197 आहे. यापैकी 2 हजार 258 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 939 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 220 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 306 प्रकरणात एकूण 16 लाख 33 हजार 570 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1047 वाहने जप्त केली आहेत.
00000
No comments:
Post a Comment