Search This Blog

Sunday, 3 May 2020

चंद्रपुरातील कृष्ण नगर, संजय नगर, दर्गा वार्ड सील


अडीच हजार कुटुंबाची आरोग्य पथकाद्वारे तपासणी
Ø  पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन सक्त
Ø  पालकमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
Ø  40 आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू सक्रिय
Ø  रुग्णाच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी 
Ø  रुग्ण नोकरी करत असलेले अपारमेंट सील
Ø  इलाज केलेले डॉक्टर होम कॉरेन्टाइन
Ø  7 किमीच्या बफर झोनमध्येही तपासणी
चंद्रपूर दि. 3 मे : चंद्रपूर महानगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाने कृष्ण नगर संजय नगर दर्गा वार्ड सील केले आहे. रात्रपाळीतील चौकीदार म्हणून काम करत असलेल्या इमारतीतील 6 कुटुंब होम कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. कुटुंबातील अन्य 3 सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून अडीच हजार कुटुंबातील परिसरात 10 हजार लोकांची दुपारपर्यंत तपासणी करण्यात आली आहे.
       राज्याचे मदत व पुनर्वसन ,आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी देखील चार वाजता जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्ण नगर परिसरातील एक रुग्ण काल पॉझिटिव्ह आला आहे. 1 मे रोजी छातीमध्ये दुखत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निमोनिया सारखे लक्षणे असणाऱ्या या रुग्णाचे स्वॅब 2 मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 3 मे रोजी हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यानंतर रुग्ण रहात असलेल्या कृष्णनगर, संजय नगर,दर्गा वार्ड, आदी 10 हजार लोकसंख्या वस्तीतील अडीच हजार कुटुंबाची आज सकाळी 7 वाजता पासून दुपारी 2 पर्यंत 40 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चमूने तपासणी केली आहे. पुढील 14 दिवस दररोज या भागात तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक चमूच्यामागे एक डॉक्टर काम करणार आहे. या परिसरात येण्या-जाण्याचा फक्त एकच मार्ग सुरू असून ॲम्बुलन्स वगळता कोणतीही वाहने आतमध्ये जाऊ दिले जात नाही. या परिसरात कंटेनमेंट प्लन सुरू करण्यात आला आहे. यासोबतच या परिसराच्या बाहेरील 7 किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून संबोधित करण्यात आला असून या ठिकाणी देखील पुढील 14 दिवस ताप व आजाराबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे. या परिसरातील चौकशी मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाच्या कुटुंबात त्यांच्यासह 4 सदस्य असून पत्नी व दोन मुलांचे देखील नमुने घेण्यात आले आहे. उद्या सायंकाळपर्यंत त्यांच्या नमुन्याचा अहवाल येणार आहे. शिवाजीनगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये रात्रपाळीतील चौकीदार म्हणून हा रुग्ण काम करत होता. रात्री 10 ते सकाळी 6 या काळात सुरक्षारक्षक म्हणून तो कार्यरत असायचा. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सहा कुटुंबातील 28 लोकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी या 28 नागरिकांचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीला वैद्यकीय नियमानुसार पाठविण्यात येणार आहे.
23 एप्रिल पासून त्याला ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला आयसोलेशन वार्ड मध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर इलाज केलेल्या काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे . सोबतच या रुग्णाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे. तथापि, गेल्या 15 दिवसांपासून चंद्रपूर बाहेर तो गेलाच नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात एक वैद्यकीय चमू गेल्या पंधरा दिवसात हा रुग्ण कुठे कुठे गेला होता या संदर्भातली चाचपणी करत आहे.
दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक           डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, सर्वेक्षण अधिकारी सुधीर मेश्राम यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला. हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 3  मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 125 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  117  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 106 नमुने निगेटिव्ह निघाले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त  आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 900 आहे. यापैकी 2 हजार 672 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 228 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 216 आहे.
00000

Saturday, 2 May 2020

घाबरू नका ! स्थलांतरितासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन तयार होत आहे



जिल्हा ग्रीन झोनमध्येच ; राज्य शासनाकडून अधिकृत निर्देशाची वाट
Ø  जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  दाखल होणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी
Ø  तेलंगाणा सीमेवर आलेल्या नागरिकांना आपापल्या गावी पाठविणार
Ø  सुशिक्षितांनी  शक्यतो गुगल फॉर्म भरून आपली माहिती द्यावी
Ø  पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व आशा वर्कर यांना जबाबदारी
चंद्रपूर दि. 2 मे : परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व राज्य अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या चंद्रपूरच्या नागरिकांना स्वगृही परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. संपर्क क्रमांक व गुगल फॉर्मवर आपली माहिती देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यानंतर राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार प्रत्येकाला आपल्या गावी पोहोचविले जाईल. मात्र यासाठी कोणतीही गडबड करू नये. हजारो लोकांच्या स्थलांतराचा हा प्रश्न असल्याने पुढील काही दिवसात याबद्दलचे नियोजन पूर्ण होईल व त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. त्यासाठी संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 3 रहिवाशी हे इतर जिल्ह्यांमध्ये कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. 1 दिल्लीमध्ये व 2 नागपूरमध्ये. अन्य ठिकाणी या तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह होता. त्यांचा मूळ रहिवासी पत्ता हा चंद्रपूर असल्यामुळे केंद्र शासनाच्या अहवालात जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये तांत्रिकदृष्ट्या दाखविण्यात येत आहे. मात्र कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्ह्याच्या सीमेच्या आत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.  यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत दिशानिर्देश येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही संभ्रम ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
शक्य असेल तर गुगल फॉर्म भरा:
बाहेर जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या नागरिकांनी ज्या जिल्ह्यात ते अडकले आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची, तालुका प्रशासनाची संपर्क साधणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात अडकून पडलेले आहात त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने  चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे, या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांबाबतही अन्य राज्यांना व जिल्ह्यांना माहिती प्रशासनामार्फत दिली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्या प्रशासनाकडे आपली माहिती देणे गरजेचे आहे.
ज्या जिल्ह्यात,राज्यात ज्या ठिकाणी अडकले आहेत. त्या प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रवास करण्याविषयी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील प्रवाशांची केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून  24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी 5 दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावरचआपली माहिती द्यावी.
बाहेर जिल्ह्यात,राज्यात अडकलेल्या नागरिकांनी शक्यतो chanda.nic.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधित दिसणाऱ्या बॅनरला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल. या गुगल फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती भरावी किंवा chandrapurhelpdesk@gmail.com या इमेल वर सुद्धा संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान,पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232).मुल, नागभीड, राजुरा, कोरपना, चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449). चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी चेक पोस्टवर याशिवाय गावांमध्ये परत आल्यानंतर केली जाणार आहे. यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलिस पाटील, आशा वर्कर ,यांना अवगत करण्यात आले आहे. ज्यांना कोणतेही लक्षण नाही. त्यांना होम कॉरेन्टाइन करायचे आहे. होम कॉरेन्टाइन न पाळणाऱ्या व्यक्तींवर प्रसंगी फौजदारी कारवाई देखील केली जाईल. आर्थिक दंड देखील केला जाईल. प्रसंगी संस्थात्मक कॉरेन्टाइन करण्यात येईल.या नागरिकांच्या घरावर स्टिकर देखील लावले जाणार आहे. मात्र गावात येणाऱ्या या नागरिका बाबत अन्य लोकांनी देखील सामंजस्याची भूमिका घ्यावी. हे नागरिक जवळपास एक महिना लॉकडाऊनमध्ये कोणत्याही आजाराशिवाय राहिलेले आहेत.मात्र त्यांनी कोणतेही लक्षण दिसले तर प्रशासनाला कळवावे व घरी राहण्यासाठी सांगितले असल्यामुळे गावात आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासन प्रत्येक राज्याच्या संपर्कात आहे. तेलंगाना मधून काही मजूर मोठ्या प्रमाणात राज्याच्या सीमेवर चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर आलेले आहेत. या सर्व मजुरांना आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्यांना चेक पोस्टवर तपासून त्यांच्या गावापर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे.
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही:
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 2  मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 117 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  109  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 103 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 6 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 367 आहे. यापैकी 2 हजार 329 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 38 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 252 आहे.
000000

चिचपल्ली वनपरिक्षेत्रात आढळले वाघीणीचे शावक


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शावकाची कोरोना तपासणी
चंद्रपूर ,दि 2 मे: चंद्रपूर वनविभाग,चंद्रपूर अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी गावालगत सकाळी 6  वाजताचे सुमारास अंदाजे 3-4 महिन्याचे वाघ (मादी) चे शावक आढळून आले. सदर घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच. विभागीयवन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांचे सोबत चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी स्थानीक एनजीओ,रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांचे मदतीने सदर शावकाला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर  चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुचे देखरेखी मध्ये उपचार सुरू असून वाघिणीचा शोध क्षेत्रीय कर्मचारी मार्फत सुरू आहे. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरु असल्याकारणाने वाघाच्या शावकाचे कोविड 19 कोरोना टेस्ट करीता स्वॅब  नमुने गोळा करुन पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.
वाघ (मादी) चा शोध  घेण्याकरीता वनविभागाव्दारे स्थानिक एनजीओचे प्रतिनिधी, वनकर्मचारी व गावकरी यांची 4 चमू तयार करण्यात आलेली असून  जंगल परिसरात एकुण 29 कॅनेरा ट्रप लावण्यातवआले आहे. त्यामध्ये एफडीसीएम वनविभाग व वन्यजीव अभ्यासक यांचा समावेश करुन वाघाचे पगमार्क घेणे तसेच संयुक्त गस्त करुन मादी वाघीणीचा शोध घेण्याचे अक्षम्य प्रयत्न करण्यात येत आहे.
या मोहिमेत चंद्रपूर वनविभाग चिचपल्ली परिक्षेत्राच्या सिमेस लागून असलेले मध्य चांदा वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वनक्षेत्रात सुध्दा वाघीणीचा मागोवा घेण्यास त्यांचे वनकर्मचारी/अधिकारी यांचेशी समन्वय साधुन संयुक्तरित्या शोध मोहिम राबबिण्यात येत आहे.
विभागीय वन अधिकारी ए.एल.सोनकुसरे,  यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस.एल.लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) चिचपल्ली व्ही. ए.राजूरकर व त्यांची चमू हे वाघ (मादी) चा पुढील शोध घेत आहे.
सदर वनक्षेत्रात एकापेक्षा अधिक वाघ वाघीणीचा वावर असल्याने या कालावधीत मोहा संकलनासाठी जंगलात प्रवेश करणारे गावकरी यांना मज्जाव करण्यास गावागावात दवंडी देण्याचे निर्देश विभागीय वन अधिकारी  ए.एल.सोनकुसरे यांनी दिले असून वनक्षेत्राच्या लगत असलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे.
00000

चंद्रपूर शहर परिसरातील अस्वलीस जेरबंद


चंद्रपूर, दि 2 मे: ‌आज 02 मे  रोजी पहाटे 2 वाजता पासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात अस्वलीचा मुक्त संचार होता. सकाळी 8 वाजता चंद्रपूर वनविभागांतर्गत चंद्रपूर शहर परिसरातील अस्वलीस जेरबंद केले.
रात्री दिड ते 2 च्या सुमारास वनविभागास स्थानिक नागरिकांकडून शहरात अस्वल असल्याची माहिती मिळाली. सुरूवातीस जटपुरा गेट परिसरामध्ये अस्वल दिसून आले होते. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर अस्वल संजय गांधी मार्केट मधून जटपुरा गेट परिसरातील हनुमान मंदिर नंतर बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन लगतची वस्ती, जिल्हाधिकारी कार्यालय, बंगाली कॉलनी, आदर्श पेट्रोल पंपच्या बाजुची एमएसईबीचे केंद्र, त्यानंतर बंगाली कैम्प, शास्त्रीनगर आणि परत आदर्श पेट्रोल पंप समोरील सीएचएल हॉस्पिटलच्या लगत असलेल्या झुडूपात येऊन आश्रय घेतला.
जवळपास रात्री 2 ते 6 वाजेपर्यंत अस्वलीचा मागोवा घेत अस्वल पुढे,बचाव पथक मागे अशी स्थिती असताना, मात्र दिवस उजाडल्यावर हॉस्पिटल बाजूच्या झुडूपात दडून बसली. यानंतर वनविभागाच्या बचाव पथकाने अस्वल बेशुद्ध करून पिंजरा जेरबंद केले.
सदर रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, वनकर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे, रॅपिड रीस्पाँस यूनिटचे कर्मचारी, शूटर बेग, मिलिंद किटे, पशु वैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचेलवार, तर इको-प्रोचे वन्यजीव संरक्षक दल यी बचाव कार्यात सहभागी झाले होते. रेस्क्यू केल्यानंतर अस्वलीस वनविभागाचे तात्पुरते वन्यजीव उपचार केंद्रामध्ये हलविण्यात आले आहे.
00000

Friday, 1 May 2020

जिल्ह्यातील अन्नधान्य वाटप परिमाणानुसार होणार : राजेंद्र मिस्कीन


Ø  अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड गहू 15 किलो, तांदूळ 20 किलो, साखर 1 किलो मिळणार
Ø प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती गहू 3 किलो, तांदूळ 2 किलो मिळणार
Ø  एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजने अंतर्गत सुद्धा धान्य मिळणार
Ø  अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना 1 किलो डाळ मिळणार
चंद्रपूर,दि. 1 मे: जिल्ह्यामध्ये माहे मे 2020 मध्ये योजना निहाय अन्नधान्य वाटप परिमाण ठरलेले आहे. या परिमाणानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप होणार आहे.अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड 2 रुपये प्रति किलो दराने गहू 15 किलो, 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ 20 किलो तर 20 रुपये प्रति किलो दराने साखर 1 किलो मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 2 रुपये प्रति किलो दराने गहू 3 किलो, 2 रुपये प्रति किलो दराने  तांदूळ 2 किलो मिळणार आहे.
या व्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना  या दोन्ही योजनेच्या रेशन कार्ड धारकांना प्रति मानसी 5 किलो तांदुळ मोफत म्हणजेच एका कार्डात 4 व्यक्ती असतील तर त्यांना 20 किलो तांदुळ मोफत मिळेल तसेच माहे मे -2020 महिण्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशनकार्डवर 1 किलो डाळ (चनाडाळ/तुरडाळ यापैकी जी उपलब्ध असेल ती) मोफत मिळणार आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमीत धान्य हे दर महिन्याप्रमाणे वरील दराप्रमाणे विकत घ्यावे लागेल व ते धान्य घेतल्यानंतर त्यांना 1 किलो दाळ व तांदुळ मानसी 5 किलो प्रमाणे मोफत मिळणार आहे.
उर्वरीत सर्व केशरी कार्ड धारकांना माहे मे महिन्यात प्रति मानसी 3 किलो गहु रुपये 8 प्रति किलो व 2 किलो तांदुळ रुपये 12  प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे त्याच दुकानातुन मिळेल.
केंद्र शासनाने एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजने अंतर्गत काही राज्या सोबत आंतरराज्य पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करुन दिली असुन त्यात प्रामुख्याने तेलंगना, आंध्रप्रदेश, गुजरात, राज्यस्थान, उत्तरप्रदेश व बिहार या राज्याचा समावेश असुन कोविड-19 मुळे त्या राज्यातील अडकलेल्या किंवा इकडे राहत असलेल्या रेशन कार्डधारकांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या रेशन दुकानातुन धान्य घेण्याची मुभा असल्याने अशा परराज्यातील ज्या लोकांकडे त्यांचे रेशनकार्ड असेल त्यांना चंद्रपुर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानातुन माहे मे, 2020 मध्ये धान्य वितरीत करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधीत लोकांनी तसेच सर्व रास्तभाव दुकानदारानी नोंद घ्यावी.
कोवीड-19 कोरोना विषाणुचे प्रादुर्भावामुळे जिल्हयात शासनस्तरावर व जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांनी काही निर्बंध घातले असुन त्यानुसार जिल्हयातील सर्व रास्तभाव दुकाने ही  जिल्हाधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी 8 ते  दुपारी 2 या वेळेतच उघडे ठेवून कार्डधारकांना लाभार्थ्यांना धान्य वाटप करायचे आहे. केंद्र शासनाचे सुचनेनुसार माहे मे,2020 महिन्यात धान्य वाटप करतांना ईपॉस मशिनवर प्रत्यक्ष कार्डधारकांचा लाभार्थ्याचा अंगठा लावायचा आहे. त्यानुसार ज्याचे नाव रेशनकार्डात आहे व आधार क्रमांक नोंदलेला आहे.अशाच व्यक्तीने धान्य घेण्यासाठी दुकानात जायचे आहे. दुकानदारांनी धान्य घेण्यास येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याकरीता हात धुण्याकरीता साबण व पाण्याची व्यवस्था करायची आहे.
कार्डधारकांनी दुकानात धान्य घेतेवेळी  सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असुन मास्क घालणे आवश्यक आहे. धान्याचे वितरण जरी 3 तारखेपासुन सुरु होणार असले तरी सर्व दुकांने ही दररोज उघडी राहणार असल्याने ग्राहकांनी एकाच दिवशी दुकानात गर्दी करु नये. तसेच ज्यांचेकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तीनी उगाचच चौकशी करण्याकरीता रास्तभाव दुकानात त्रास देवु नये त्यांना काही चौकशी करायची असल्यास संबंधीत तहसिल कार्यालयाकडे किंवा प्रसिध्द केलेल्या हेल्पलाईन क्रमाकांवर सपंर्क साधवा. जिल्हयातील सर्व दुकानदारांना त्यांचे दुकानात नोंदलेला कार्डधारकांचे प्रमाणातच धान्य वितरीत केल्या जाते. त्यामुळे रेशनकार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदाराना धान्याची मागणी करु नये किंवा त्यांचेवर दबाव आणु नये. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
00000