चंद्रपूर, दि 2 मे: आज 02 मे रोजी पहाटे 2 वाजता पासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात अस्वलीचा मुक्त संचार होता. सकाळी 8 वाजता चंद्रपूर वनविभागांतर्गत चंद्रपूर शहर परिसरातील अस्वलीस जेरबंद केले.
रात्री दिड ते 2 च्या सुमारास वनविभागास स्थानिक नागरिकांकडून शहरात अस्वल असल्याची माहिती मिळाली. सुरूवातीस जटपुरा गेट परिसरामध्ये अस्वल दिसून आले होते. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर अस्वल संजय गांधी मार्केट मधून जटपुरा गेट परिसरातील हनुमान मंदिर नंतर बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन लगतची वस्ती, जिल्हाधिकारी कार्यालय, बंगाली कॉलनी, आदर्श पेट्रोल पंपच्या बाजुची एमएसईबीचे केंद्र, त्यानंतर बंगाली कैम्प, शास्त्रीनगर आणि परत आदर्श पेट्रोल पंप समोरील सीएचएल हॉस्पिटलच्या लगत असलेल्या झुडूपात येऊन आश्रय घेतला.
जवळपास रात्री 2 ते 6 वाजेपर्यंत अस्वलीचा मागोवा घेत अस्वल पुढे,बचाव पथक मागे अशी स्थिती असताना, मात्र दिवस उजाडल्यावर हॉस्पिटल बाजूच्या झुडूपात दडून बसली. यानंतर वनविभागाच्या बचाव पथकाने अस्वल बेशुद्ध करून पिंजरा जेरबंद केले.
सदर रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, वनकर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे, रॅपिड रीस्पाँस यूनिटचे कर्मचारी, शूटर बेग, मिलिंद किटे, पशु वैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचेलवार, तर इको-प्रोचे वन्यजीव संरक्षक दल यी बचाव कार्यात सहभागी झाले होते. रेस्क्यू केल्यानंतर अस्वलीस वनविभागाचे तात्पुरते वन्यजीव उपचार केंद्रामध्ये हलविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment