कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शावकाची कोरोना तपासणी
चंद्रपूर ,दि 2 मे: चंद्रपूर वनविभाग,चंद्रपूर अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी गावालगत सकाळी 6 वाजताचे सुमारास अंदाजे 3-4 महिन्याचे वाघ (मादी) चे शावक आढळून आले. सदर घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच. विभागीयवन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांचे सोबत चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी स्थानीक एनजीओ,रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांचे मदतीने सदर शावकाला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुचे देखरेखी मध्ये उपचार सुरू असून वाघिणीचा शोध क्षेत्रीय कर्मचारी मार्फत सुरू आहे. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरु असल्याकारणाने वाघाच्या शावकाचे कोविड 19 कोरोना टेस्ट करीता स्वॅब नमुने गोळा करुन पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.
वाघ (मादी) चा शोध घेण्याकरीता वनविभागाव्दारे स्थानिक एनजीओचे प्रतिनिधी, वनकर्मचारी व गावकरी यांची 4 चमू तयार करण्यात आलेली असून जंगल परिसरात एकुण 29 कॅनेरा ट्रप लावण्यातवआले आहे. त्यामध्ये एफडीसीएम वनविभाग व वन्यजीव अभ्यासक यांचा समावेश करुन वाघाचे पगमार्क घेणे तसेच संयुक्त गस्त करुन मादी वाघीणीचा शोध घेण्याचे अक्षम्य प्रयत्न करण्यात येत आहे.
या मोहिमेत चंद्रपूर वनविभाग चिचपल्ली परिक्षेत्राच्या सिमेस लागून असलेले मध्य चांदा वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वनक्षेत्रात सुध्दा वाघीणीचा मागोवा घेण्यास त्यांचे वनकर्मचारी/अधिकारी यांचेशी समन्वय साधुन संयुक्तरित्या शोध मोहिम राबबिण्यात येत आहे.
विभागीय वन अधिकारी ए.एल.सोनकुसरे, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस.एल.लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) चिचपल्ली व्ही. ए.राजूरकर व त्यांची चमू हे वाघ (मादी) चा पुढील शोध घेत आहे.
सदर वनक्षेत्रात एकापेक्षा अधिक वाघ वाघीणीचा वावर असल्याने या कालावधीत मोहा संकलनासाठी जंगलात प्रवेश करणारे गावकरी यांना मज्जाव करण्यास गावागावात दवंडी देण्याचे निर्देश विभागीय वन अधिकारी ए.एल.सोनकुसरे यांनी दिले असून वनक्षेत्राच्या लगत असलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment