Search This Blog

Friday, 6 August 2021

विभागीय आयुक्तांनी केली आरोग्य व्यवस्थेची पाहणी

 






विभागीय आयुक्तांनी केली आरोग्य व्यवस्थेची पाहणी

Ø वन अकादमी कोव्हीड सेंटर, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, ऑक्सीजन प्लाँट, जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान संभाव्य तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची तयारी जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी शहरातील वन अकादमी येथील कोव्हीड केअर सेंटर, निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील लिक्विड ऑक्सीजन प्लाँट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू युनीट आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.

वन अकादमी येथील व्हेंटीलेटर कक्षाची पाहणी करतांना मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेंटीलेटर हाताळण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ, तसेच ऑक्सीजन पुरवठाचा येथे काय स्त्रोत होता, बाहेरच्या राज्यातून लिक्विड ऑक्सीजन आणण्याची गरज निर्माण झाली होती काय, दुस-या लाटेत सर्वाधित रुग्णसंख्या कितीपर्यंत पोहचली होती, याबाबत त्यांनी विचारणा केली. बांधकाम सुरू असलेल्या नवीन वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील लिक्विड ऑक्सीजन प्लाँट कधीपर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असे विचारले असता, सदर प्लाँट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होणार असल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले. तिस-या लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

यानंतर विभागीय आयुक्तांनी स्त्री रुग्णालयाची तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सीजन प्लाँटची पाहणी केली. येथे उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सीजन सिलिंडरची क्षमता किती, सदर टँक किती लिटर भरायचा, याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात पीएम केअर आणि सीएसआर अंतर्गत उपलब्ध झालेल्या व्हेंटीलेटरबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी विभागीय आयुक्तांना माहिती दिली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

00000

Thursday, 5 August 2021

जिल्हयात 1 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

 

जिल्हयात 1 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू  झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या  4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 512 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 86 हजार 902 झाली आहे. सध्या 75 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 27 हजार 224 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 37 हजार 293 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1535 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Wednesday, 4 August 2021

पुरग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हयातील धर्मादाय संस्थानी पुढे यावे - धर्मादाय आयुक्त प्र.तरारे

 पुरग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हयातील धर्मादाय संस्थानी पुढे यावे

-धर्मादाय आयुक्त प्र.तरारे

चंद्रपूर दि.4 ऑगस्ट: महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे खूप मोठी जीवितहानी व कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. याकरिता गरजुंना मदतीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.

महापुर, दरड कोसळल्याने तसेच लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार इत्यादी आवश्यक मदत करण्याची तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. करीता गरजूंना आवश्यक मदतीसाठी जिल्हयातील धर्मादाय संस्थानी पुढे यावे. असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त प्र.तरारे यांनी केले आहे.

सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व या उद्देशाने स्थापन झालेल्या सर्व धर्मादाय संस्था (ट्रस्ट)यांनी मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून गरजूंना शक्य ती मदत करता येईल. यासाठी धर्मादाय संस्थानी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गरजूंना शक्य ती मदत करावी.

 मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशील:

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट मुंबई-400001,

बचत खाते क्रमांक: 10972433751,

शाखा कोड-00300,आयएफएस कोड- SBIN0000300

आर्थिक स्वरूपात मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी या बँक खात्यामध्ये चेक किंवा डी.डी स्वरूपात शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत जमा करावी. असे कळविण्यात आले आहे.

00000


मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेतंर्गत पशुआरोग्य सेवा देण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक

 मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेतंर्गत पशुआरोग्य सेवा देण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक

Ø पशुचिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी 1962 टोल फ्री क्रंमाक कार्यान्वीत

चंद्रपूर दि. 4 ऑगस्ट: पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंधत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी ई. प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकिय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुपालकाला पशुधन आजारी पडल्यास सदर पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते. पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्याकरिता, पशुधनाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी व त्यांचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता शासनामार्फत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम टप्प्यात राजुरा, सिंदेवाही, भद्रावती व मुल असे एकूण 4 फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करण्यात आले असून याअंतर्गत पशुधनाच्या प्रसूती संबंधी सेवा, प्रथमोपचार सेवा, तातडीच्या चिकित्सक सेवा, शस्त्रकिया सेवा तसेच इतर कोणत्याही चिकित्सक आपात्कालीन परिस्थितीत पुरविण्यात येणाऱ्या सेवा पशुपालकांना देण्यात येईल.

फिरत्या पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सुसज्ज चिकित्सा प्रणाली असणारी वाहने उपलब्ध असून सदर योजना अधिक बळकट करण्याच्या हेतूने व एका फोन क्रमांकावर चिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1962 कार्यान्वित करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, सिंदेवाही, भद्रावती व मूल या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या फिरते पशुचिकित्सा पथकाची सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता  1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पशुधनाचे तात्काळ उपचार करून घ्यावेत. तरी पशुपालक तसेच शेतकरी बंधूंनी आपल्या पशुधनाच्या उपचाराकरिता जास्तीत जास्त प्रमाणात या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात बुधवारी एकही मृत्यु नाही, 6 कोरोनामुक्त

 जिल्ह्यात बुधवारी एकही मृत्यु नाही, 6 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 6  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 15 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 10, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 508 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 86 हजार 901 झाली आहे. सध्या 73 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 24 हजार 922 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 34 हजार 996 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

कोविड काळात जिल्ह्यातील बाधित नागरिकांची नोंद ही बाहेर राज्यात तसेच बाहेर जिल्ह्यात करण्यात आली. परंतु सदर नागरिकांची नोंदणी ही संबधीत राज्याने व जिल्हयाने चंद्रपूर जिल्ह्याच्याच पोर्टलवर त्यांच्या आकडेवारीसह दर्शवण्यात आल्याने 3458 कोरोना बाधीत तसेच कोरोना मुक्त रुग्णांचा समावेश पोर्टलप्रमाणे करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000