Search This Blog

Wednesday, 1 March 2023

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड



पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड

            चंद्रपूर, दि.1 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपूरी, येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.         

याप्रसंगी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.पी. मेहंदळे, नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गहाणे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात इलेव्हेट रिअल इस्टेट चंद्रपूर, वैभव एंटरप्रायजेस नागपूर, परम स्किल ट्रेनिग इंडिया औरंगाबाद, जयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपूरी, उषा कन्स्लटंसी नागपूर, नवकिसान बायोप्लॅणेटिक लिमीटेड, एलअॅंडटी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिग इस्टीटयुट पनवेल मुंबई, उत्कर्ष स्मॉल फायनांस बॅक नागपूर, आक्स फर्स्ट एचआर डेस्क चंद्रपूर , स्टॉप कॅन्सर मिशन नागपूर , विविआर फायंनेशिअल सर्विसेस, चंद्रपूर आदी कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने एकुण 362 उमेदवारांनी नोंदणी केली.  त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड कंपनीमार्फत अप्रेंटिस ट्रेनी, मोटार मेकॅनिक मार्केटिग एक्झ्यिक्युटीव, टेलीकॉलर, असिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळया पदाकरीता प्राथमिक निवड करण्यात आली असून पूढील निवड प्रक्रिया कंपनीच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. रुगंठा म्हणाले, चंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी असून या जिल्हात कॉपर, गोल्ड,  ग्रॅनाइट आदी खनीजे मुबलक प्रमाणात आहे. हा जिल्हा कृषी सधन असून  सुजलाम, सुफलाम असल्याचे ते म्हणाले. श्री. मेंहेदळे यांनी उमेदवारांना एकत्रित येवून उद्योजक बनावे याबाबत मार्गदर्शन केले. तर सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले.            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  जिल्हा समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती दिली.  

प्रास्ताविक मुकेश मुंजनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सिद्धांत रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरीचे  कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी


जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी

Ø शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातील आयटीआयमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 1 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी येथे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सर्वसाधारण योजना सन 2022 23 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांकरिता विविध प्रकारचे प्रशिक्षण व कोर्सेस सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण व कोर्सकरीता वयोमर्यादा 15 ते 45 वर्षे आहे तर शैक्षणिक पात्रता 10 वी व आयटीआय पास असणे अनिवार्य आहे. कोर्सेस मध्ये इलेक्ट्रिशियन, ब्युटी थेरपीस्ट, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, एलईडी लाईट रिपेयर टेक्निशियन, फोर व्हीलर सर्विस टेक्निशियन आदी कोर्सेसचा समावेश आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण संस्थेसोबत संपर्क करावा व मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

०००००००

Tuesday, 28 February 2023

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोप





 जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोप

चंद्रपूर, दि. 28: कृषी विभागाच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सलग पाच दिवस चाललेल्या कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, माजी कृषी सहसंचालक डॉ. उदय पाटील, मूलचे तालुका कृषी अधिकारी  भास्कर गायकवाड, नामदेव डाहुले, संजय गजपुरे, नरेंद्र जीवतोडे तसेच वयाची शंभरी पार केलेले वयोवृद्ध आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, चांदा क्लब ग्राउंड येथे पाच दिवस जिल्ह्याचे कृषीप्रदर्शन झाले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यामध्ये मिशन जयकिसान ची  घोषणा केली. शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुढच्या वर्षभरात काय काय उपायोजना करावयाच्या आहे? त्याचे संपूर्ण विवेचन आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मिशन जय किसानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे तर शेतकरी या देशाचा कणा आहे. या अमृत महोत्सवीवर्षात बळीराजाला बळकट करण्याचे काम देशपातळीवर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. शेतकरी  एका दान्याचे हजार दाणे करतो व काळ्या मातीतून सोने उगवतो. या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे. त्यांना अन्नधान्य पुरविण्याचे काम हा शेतकरी करतो. पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचे व प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे कथन ऐकण्यास मिळाले. शेतकरी जसा प्रयोगशील असतो त्याचप्रमाणे अधिकारी सुद्धा प्रयोगशील असावा तरच कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकेल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या संकल्पनेतून मिशन जय किसान जिल्ह्यात सुरू केले. शेतकरी हा देशाची ताकद असून आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या जगाला अन्न पुरविण्याचे काम शेतकरी करीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. विदर्भात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृतीसाठी कृषी विभागामार्फत स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकेत प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे म्हणाले, 24 फेब्रुवारी रोजी कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ठिकाणी 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून मिलेट दौड काढण्यात आली तर पाच दिवसीय प्रदर्शनीमध्ये विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवात 18 हजार 267 लोकांनी नोंदणी करून प्रदर्शनीला भेट देत लाभ घेतला. प्रत्येक स्टॉलवर संवाद साधला असता 26 लाख 61 हजार 600 रुपयांचे साहित्य विक्री झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे सागिंतले.

तत्पूर्वी, वयाची शंभरी पार केलेल्या भीमा राठोड (110 वर्ष), परसराम राठोड(105 वर्ष), जनाबाई चव्हाण(103 वर्ष) व भोजू गायकवाड(102 वर्ष) यांचे मान्यवरांच्या हस्ते चरण धुवून सत्कार करण्यात आला. या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शंभर पार केलेल्या वयोवृद्धांनी स्वतःचे अनुभव कथन केले.

यावेळी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (फलोत्पादन)चंद्रशेखर आवारी, मोरेश्वर देरकर, स्वप्निल कोल्हटकर, किशोर ठावरी, गजानन बन्सोड आदी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

00000

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र


आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र

Ø 24 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28: वर्ग-3 व वर्ग-4 पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची, आदिवासी उमेदवारांकडून तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने साडेतीन महिन्यांचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सत्र 1 एप्रिल 2023 पासुन आयोजित करण्यात आले आहे. दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2023 या कालावधीत होणाऱ्या प्रशिक्षण सत्राकरीता अनुसूचित जमातीतील आदिवासी उमेदवारांनी 24 मार्च 2023 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 19, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देय राहील. अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी सदर अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात), तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक आदींचा उल्लेख करावा. व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याकरीता एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 24 मार्च असून 28 मार्च 2023 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसिध्द करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी : उमेदवार अनुसूचित जमाती (एस.टी.) (आदिवासी) प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 दरम्यानचे असावे. उमेदवार किमान एच.एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका (एस.एस.सी / एच.एस.एस.सी / पदवी), आधारकार्ड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे नोंदणी कार्ड.

00000

महाज्योतीमार्फत जेईई,नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण

 


महाज्योतीमार्फत जेईई,नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण

Ø आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योतीमार्फत मंजूर झालेल्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे व ज्या विद्यार्थ्याचे नाव मंजूर यादीत समाविष्ट आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपले टॅब व डाटा सिमकार्ड सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन प्राप्त करून घ्यावे. तसेच पालकांना सोबत घेऊन यावे.

विद्यार्थ्यांनी स्वतःचे व पालकांचे आधार कार्ड, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका व बोनाफाईड सर्टिफिकेट आदी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्र व कागदपत्रे सोबत ठेवावीत. वरील कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कुणालाही टॅब देण्यात येणार नाही. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

000000