Search This Blog

Thursday, 12 December 2024

अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा

 अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा

चंद्रपूर, दि. 12 : अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा 2024-25 3 जानेवारी, २०२५ ते ८ जानेवारी 2025 या कालावधीत प्रितमपुरा, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड चाचणी सोमवार 23 डिसेंबर 2024 रोजी कुपरेज बास्केटबॉल ग्रांऊड, सचिवालय जिमखानाजवळ, मुंबई येथे सकाळी 8 वा. आयोजित करण्यात आली आहे.

विविध राज्य शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या इच्छूक खेळाडूंनी प्रथम आपले आवेदनपत्र सचिवालय जिमखाना येथे 20 डिसेंबर 2024 पर्यंत sachivalaygym1954@gmail.com या संकेतस्थळावर सादर करावे. आवेदन पत्र सादर करणाऱ्या खेळाडूंना सदर निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सचिवालय जिमखाना, मुंबई यांचेमार्फत कळविण्यात येईल. खेळाडूंनी आपल्या कार्यालय प्रमुखांच्या लेखी परवानगीसह आणि कार्यमुक्ती आदेशासह निवड चाचणीस उपस्थित रहावे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जिमखाना सभासद असण्याची आवश्यकता नाही.

खेळाडूंकरीता सूचना : 1) स्वतःचे शासकीय ओळखपत्र 2 झेरॉक्स प्रतिसह व कार्यमुक्ती आदेशाची मुळ प्रत निवड चाचणी अगोदर सादर करावी. 2) निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आपले स्वतःचे किट (टी-शर्ट, शॉर्टस्, शूज इ.) आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : सचिवालय जिमखाना, मुंबई दूरध्वनी क्रमांक 022- 35645356 किंवा मानत सचिव बास्केटबॉल संजय पोफळे (मो. 88503 58268), संजय कदम (मो. 90824 91675), प्रताप माडकर (मो. 97027 07088), सतीश सोनवाने (मो. 98692 36328) आणि मकरंद गयावळ (मो. 91375 41867) यांच्याशी संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

०००००

16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन

 

16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 12 : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी जिल्हा स्तरावर व चवथ्या सोमवारी तालुका स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. डिसेंबर महिन्याचा तिसरा सोमवार 16 डिसेंबर रोजी असल्यामुळे या दिवशी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना बाबी विषयक व विहित अर्जात नसलेली प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार / निवेद वैयक्तिक स्वरुपात असेल, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास प्राप्त तक्रार संबंधित विभागाला पाठवून अर्जाचा निपटारा करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

०००००

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम उत्तरसुची प्रसिध्द

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम उत्तरसुची प्रसिध्द

Ø संकेतस्थळावर आक्षेप नोंदणीची मुदत 16 डिसेंबरपर्यंत

चंद्रपूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.1 व पेपर क्र.2 ची अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र.2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परिषदेकडे 16 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पाठवता येतील, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

सदर आक्षेप किंवा त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

००००००

Wednesday, 11 December 2024

13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

 

13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

चंद्रपूर, दि. 11 : दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. आपल्या जिल्हयाचा ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे साजरा होणार आहे.

यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणा-या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचा भेट वस्तु, स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान, शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता/पिता, शोर्य चक्र प्राप्त सैनिक यांचा शॉल व श्रीफळ देवून सन्मान व माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने माजी सैनिकांनी हजर राहावे, असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे..

००००००

 

Sunday, 8 December 2024

जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात


 जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात

Ø 2 लक्ष 32 हजार 888 संशयित क्षयरुग्णांची होणार तपासणी

चंद्रपूर, दि. 8 : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात खासदर प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. वरोरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, तहसीलदार योगेश कोटकर, श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी श्रीकृष्ण किशोर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले आदी उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व  रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपचारावरील क्षय रुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच क्षयरोगाची लक्षणे दिसताच आरोग्य संस्थेमध्ये जाऊन क्षयरोग तपासणी करावी तसेच क्षयरोग झाल्यास वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन  केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी 100 दिवस मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले.  मोहीम कालावधीत 364 आयुष्यमान आरोग्य  मंदिर येथे निक्षय शिबीर व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन करून जोखीमग्रस्त गटातील 2 लक्ष 32 हजार 888 व्यक्तींची व संशयीत क्षयारुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत निक्षय मित्र श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड यांना  सन्मानीत  करण्यात आले. तसेच खासदारांच्या हस्ते उपचारावरील 10 क्षयरुग्नांना पोषण आहार किटचे  वाटप करण्यात आले. सोबतच वरोरा तालुक्यात टीबी चाम्पियन म्हणून क्षयरोगासंबंधित जनजागृती करण्याकरिता सहाय्य करणारे सचिन कामडी यांचाही सत्कार करण्यात आला. या दरम्यान सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, रुग्णालय कर्मचारी यांनी टीबी मुक्त भारत शपथ घेतली.  

100 दिवस क्षयरोग मोहिमेमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे निक्षय शिबीर आयोजित करण्यात येत असून यामध्ये जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्या व संशयीत क्षयरुग्ण यांची क्षयारोगाबाबत NAAT तपासणी व क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्येमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. 1) 60 वर्षावरील व्यक्ती, 2)  मधुमेह व्यक्ती, 3) धुम्रपान करणारे व्यक्ती, 4) मागील पाच वर्षामध्ये क्षयरोग  झालेले व्यक्ती, 5) क्षय रुग्णांच्या घरातील व्यक्ती, 6) 18 पेक्षा कमी BMI असणारे व्यक्ती, 7) HIV बाधित व्यक्ती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले यांनी केले. संचालन सोनाली रासपायले यांनी तर  आभार उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल खुजे यांनी मानले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, तालुका क्षयरोग पथक, जिल्हा क्षयरोग केंद्र कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००