Search This Blog

Friday, 13 December 2024

वन अकादमीत अरुणाचल प्रदेश वनविभागातील वनपालांनी घेतले पायाभुत प्रशिक्षण

 

वन अकादमीत अरुणाचल प्रदेश वनविभागातील वनपालांनी घेतले पायाभुत प्रशिक्षण

Ø 45 पुरुष वनपाल तर चार महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश

चंद्रपूर, दि. 13 : भारतातील विविध राज्यातील वन विभाग तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर येथे सुसज्ज वन अकादमीची निर्मीती करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभी राहिली आहे. अरुणाचल प्रदेश वनविभागातील 49 वनपालांचे 6 महिने कालावधीचे पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे 03 जून 2024 पासून करण्यात आली होती. या प्रशिक्षणामध्ये अरुणाचल प्रदेश वन विभागातील 49 वनपाल प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 45 पुरुष आणि 04 महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. 

गत सहा महिने प्रबोधिनीत प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात 49 वनपालांनी पासींग आऊट परेड(Passing Out Parade) प्रदर्शित केली. यावेळी, महाराष्ट्र वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) श्रीनिवास राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी या परेडचे निरीक्षण करुन वनपाल प्रशिक्षणार्थींची मानवंदना स्विकारली.

यावेळी अरुणाचल प्रदेशचे पर्यावरण, वन आणि हवामान बदलचे सल्लागार वांगकी लोवांग, तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) अरुणाचल प्रदेश पी. सुब्रमण्यम, दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल अरुणाचल प्रदेशचे सल्लागार वांगकी लोवाँग यांनी वनपाल प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याचे प्रशिक्षण कालावधीत चंद्रपूर, वन अकादमी येथे दिल्या गेलेले प्रशिक्षण, पुरविण्यात आलेल्या सोयी-सुविधा तसेच प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्र, तेलंगना, आंध्रप्रदेशातील अभ्यास दौऱ्यात वनपाल प्रशिक्षणार्थींनी अध्ययन केलेल्या विशेष बाबींचे सादरीकरण केले. अरुणाचल प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. सुब्रमण्यम यांनी चंद्रपूर वन अकादमी येथे वनपाल प्रशिक्षणार्थींना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल वन अकादमीचे आभार व्यक्त केले. तसेच माहे फेब्रुवारी 2025 पासून पुन्हा नवीन 50 अप्रशिक्षित वनपाल तुकडीस प्रशिक्षणासाठी चंद्रपूर वन अकादमी येथे पाठविण्याचे जाहिर केले.

प्रशिक्षणार्थी वनपालांना प्रमाणपत्र वितरण : यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अशोक खडसे, अपर संचालक मनिषा डी. भिंगे, सत्र संचालक संजय एस. दहिवले यांच्या हस्ते प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 49 वनपालांना प्रमाणपत्र तसेच विशेष प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना पदक देवून सन्मानित केले. तसेच  वनपालांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित

 

तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि. 13 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक  छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 नुसार चंद्रपूर जिल्ह्याकरीता स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावयाची आहे. त्यासाठी खालील अहर्ता प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या महिलांमधून नामनिर्देशिनाने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. तर दोन सदस्य पदासाठी  महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशासकीय संघटना/ संघ किंवा लैगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेल्या व्यक्तीमधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल व त्यापैकी किमान एक महिला राहील.

परंतु, त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्याची पाश्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसुचित  जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. उपरोक्त अर्हताधारक  सामाजिक कार्यकर्त्यांनी परीपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपूर या कार्यालयात 31 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन


 तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 13 : जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी तृतीयपंथीयांची  कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे.

त्याकरीता तृतीयपंथीयासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथीय व्यक्तींने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर कार्यालयाशी  कार्यालयीन  वेळेत संपर्क साधावा.

तसेच तृतीयपंथीय असल्याबाबतची वैयक्तिक व रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरीत सादर करावी. जेणेकरून, आपले माहितीच्या आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन पोर्टलवर माहिती भरून तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

०००००

Thursday, 12 December 2024

भविष्यवेधी प्रशिक्षण कार्यक्रमात 59 शिक्षकांचा सहभाग


 भविष्यवेधी प्रशिक्षण कार्यक्रमात 59 शिक्षकांचा सहभाग

Ø विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर आणि चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत येणा-या सर्व शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिकविणा-या शिक्षकांसाठी भविष्यवेधी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे शिक्षकांचे सक्षमीकरण हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून यात 59 शिक्षकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार, श्री. धोटकर, श्री. गिरडकर, श्री. चव्हाण, श्री. श्रीरामे, श्री. कुळसंगे यांच्यासह शिक्षकांना मार्गदर्शन करणारे काकासाहेब नागरे, उमेश आडे, गोविंद पेदेवाड, विकास गेडाम उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात जिवती, देवाडा, मंगी, रुपापेठ, मरेगाव, बोर्डा, देवई, चंदनखेडा, जांभुळघाट, कोसंबी, पाटण, चिंधीचक या शाळेतील 59 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, आजच्या बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शिक्षकांची भुमिका अधिकाधिक महत्वाची आणि भविष्य घडविणारी ठरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या भविष्यवेधी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे शिक्षकांना आधुनिक शिक्षण पध्दती, नवतंत्रज्ञान, अध्यापन कौशल्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम बनविणे, हा आहे. विद्यार्थी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी शिक्षक हे एक स्तंभ आहेत. त्यामुळे अशा प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांची क्षमता वाढविणे, भविष्यात अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे, यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या विषयावर झाले प्रशिक्षण आणि चर्चासत्र : आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर, नवीन उपक्रम आणि शैक्षणिक पध्दती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरणे, खेळ आणि सृजनशील कृतींचे आयोजन, समूह चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण, नेतृत्व कौशल्य विकास व भविष्यातील शैक्षणिक गर्जांची तयारी, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन, कामाचे टप्पे आणि प्राधान्यक्रम, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पती व 21 व्या शतकातील कौशल्य, शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा उपयोग, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान, प्रशिक्षणोत्तर सहायक प्रणाली, मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरीत करणे आदी विषयांवर प्रशिक्षण आणि चर्चासत्र घेण्यात आले.

दुस-या टप्प्यातील उर्वरीत शिक्षकांचे प्रशिक्षण 11 ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

००००००

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना वस्तू ऐवजी मिळणार रक्कम

 


अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना वस्तू ऐवजी मिळणार रक्कम

Ø बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार अर्थसहाय्य

चंद्रपूर, दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपकरणे पुरविणे या योजनेत बदल करण्यात आला आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हे वस्तु स्वरुपात न देता आता मंजूर अर्थसहाय्य 3 लक्ष 15 हजार रुपये बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

योजनेच्या अटी व शर्ती : 1) स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. 2) बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत यात अध्यक्ष व सचिवांचा समावेश असावा. 3) राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे तसेच सदर खाते हे अध्यक्ष व सचिव यांच्या अधार क्रमांकाशी संलग्न असावे. 4) स्वयंसहायता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विकास तसेच सहकार्य यांनी निर्धारीत केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत. 5) पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने त्या त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. 6) योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहायता बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 7) बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे. 8) ज्या स्वयंसहायता बचत गटांनी पॉवर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, ते बचत गट या योजनेसाठी पात्र राहणार नाही.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

००००००