Search This Blog

Friday, 2 May 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट



 चंद्रपूर जिल्हाधिकारी ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट

Ø 84.29 गुणांसह प्रथम क्रमांक

Ø 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम

चंद्रपूर, दि. 2 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक जिल्हधिकारी कार्यालय, कोल्हापूर (गुण 81.14), तृतीय जिल्हाधिकारी जळगाव (80.86), चतुर्थ जिल्हाधिकारी अकोला (78.86) आणि पाचवा क्रमांक जिल्हाधिकारी नांदेड (66.86 गुण) यांनी पटकाविला.

याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांचे यात मोठे योगदान आहे. लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा कशा देता येईल, शासन त्यांच्यापर्यंत कसे पोहचले, याबाबत योग्य नियोजन करण्यात आले. तसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, तक्रार निवारण, अभ्यागतांसाठी सोयीसुविधा, ई-ऑफिस प्रणालीचा वापर, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अधिकार व कर्मचा-यांना प्रशिक्षण, गुंतवणूकीस प्रोत्साह आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा यात समावेश होता, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, गुणवत्ता मोहिम एक सुरवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुल्यांकन पध्दत : भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत संकेतस्थळ अद्यावतीकरण व कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

००००००

जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी देणार नीट ची परीक्षा

 

जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी देणार नीट ची परीक्षा

Ø 4 मे 2025 रोजी 9 केंद्रावर परीक्षा

चंद्रपूर, दि. 2 मे : रविवार, दि. 4 मे 2025 रोजी जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर NEET (UG) ची परीक्षा होणार असून जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत.

नीट (यूजी) उमेदवारांसाठी सूचना : हे करा : प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेचा योग्य पत्ता, केंद्र  गाठले आहे की नाही, यांची पडताळणी करा. मुख्य गेटवर आपले ओळखपत्र आणि प्रवेश पत्र दाखवा. कृपया तपासणी साठी  सुरक्षा कर्मचाऱ्याला सहकार्य करा. केंद्राबाहेर दर्शविलेल्या आसन योजनेसह आपला रोल नंबर, केंद्र क्रमांक, खोली क्रमांक तपासा. ॲडमिट कार्डची हार्ड कॉपी, पोस्टकार्ड साइज फोटो प्रिंट कॉपी सोबत ठेवा. केंद्रात पारदर्शक पाण्याच्या बाटलीला परवानगी आहे. केंद्रात प्रवेशाच्या क्रमाचे अनुसरण करा (बाण  चिकटवलेले). तपासणी, नोंदणी आणि बायोमेट्रिक मधून जा आणि परीक्षा कक्षात पोहोचा. परीक्षा केंद्रात सकाळी 11 ते दुपारी  1.30 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रवेश आहे.

हे करू नका : उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात  खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. शिवाय, उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नाही.

पाठ्यपुस्तकसामग्री मुद्रित किंवा लिखित, कागदांचे तुकडे, भूमिती/ पेन्सिल बॉक्स,प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन/स्कॅनर इत्यादि कोणतीही स्टेशनरी वस्तू, मोबाइल फोन, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थबँड इत्यादि कोणतेही कम्युनिकेशन डिव्हाइस, वॉलेट,गॉगल्स, हॅडबॅग्ज, बेल्ट कॅप इत्यादि इतर वस्तु कोणतेही घडयाळ/मनगटी घडयाळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणतीही खाण्यायोग्य  वस्तू उघडलेली किंवा पॅक केलेली वगैरे. मायक्रोचिप, कॅमेरा ब्लूटूथ डिव्हाइस इत्यादि संप्रेषण साधने लपवून अनुचित सांधनासाठी वापरली जाणारी इतर कोणतीही वस्तू.

केंद्रात कोणत्याही उमेदवाराकडे प्रतिबंधित वस्तूपैकी कोणतीही वस्तू आढळल्यास ती अनुचित मार्गाचा वापर  मानली जाईल आणि संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल.

परीक्षा केंद्र व पार्किंग व्यवस्था : 1) केंद्रीय विद्यालय डब्ल्यूसीएल दुर्गापूर, चंद्रपूर (पार्किंग - शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 2) पी.एम. श्री. केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्ट्ररी चांदा, भद्रावती (समोरील मार्केट परिसर) 3) गर्व्हमेंट कॉलेज आॉफ इंजिनियरींग, चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) 4) डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स, चंद्रपूर (चांदा क्लब ग्राऊंड) 5) नारायणा विद्यालय, पडोली चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)  6) इंदिरा गांधी गार्डन स्कूल, रामनगर चंद्रपूर (संत्रा मार्केट) 7) श्री. महर्षी विद्या मंदीर, चंद्रपूर (शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 8) माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) आणि 9) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरींग रिसर्च ॲन्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर. (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)

००००००

Thursday, 1 May 2025

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


 

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

Ø वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट - 2025 (व्हेव्ज) चे पंतप्रधानांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई, दि. 1 : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी  काही वर्षांत जीडीपीमध्ये (सकल घरेलु उत्पन्न) याचा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी  व्हेव्ज परिषदेमुळे  यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपटांना केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.

मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे- नरेंद्र मोदी

आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी  संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास  व्यक्त करून  जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज जग नवीन पद्धतीने कथा,संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. व्हेव्ज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हे महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले.

आज डिजिटल आशय, संगीत, अ‍ॅनिमेशन, गेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सुमारे ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत साकारणार आयआयसीटी  -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. व्हेव्ज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले.

अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार व्हेव्ज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, व्हेव्ज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

0000000

चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री डॉ. अशोक उईके







 

चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Ø महाराष्ट्र दिनानिमित्त्‍ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 

चंद्रपूर, दि. 1 मे : संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणेच नैसर्गिक वनाच्छादन असलेला चंद्रपूर जिल्हा हा जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प, विविध उद्योग, उर्जानिर्मिती प्रकल्प, सैन्याकरीता लागणारी आयुधी निर्माणी आदीमुळे जागतिक पटलावर ओळखला जातो. जिल्ह्याची ही ओळख कायम राहावी, विकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी शासन आणि प्रशासन सैदव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सर्वप्रथम वंदन करून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतला. याच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यासाठी मोठा लढा उभा करावा लागला. हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र राज्याने सुरवातीपासूनच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भरभक्कम सरकार सत्तेत आले आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहे. तसेच पहिल्या 100 दिवसात सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने देखील पाऊले टाकली आहेत. वैशिष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदमार्फत एकाच वेळी जवळपास 35 हजाराच्यावर लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन अंतर्गत जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या औद्योगिक परिषदेत 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे. यातून 14 हजार थेट रोजगार निर्मिती होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. 

उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संदीप छिद्रावार, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, शुभांगी सुर्यवंशी, अनिलकुमार घुले, अमुल भुते, युधिष्ठिर रैच यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे चांदा पब्लिक स्कुल, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांचा, आदर्श ग्राम महसूल अधिकारी प्रविण ठोंबरे यांना तसेच ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ या ब्रीदवाक्य स्पर्धेतील हिमाशू संजय वडस्कर, समृध्दी गुप्ता, चांदणी बलराम झा यांचाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

००००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन




 पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन                                                        

चंद्रपूर, दि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, वरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजे. गरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणून, स्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे, महात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे, आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे.

००००००