Search This Blog

Friday, 15 September 2017

चंद्रपूर मेडिकल कॉलेजबाबत पालकमंत्र्यांनी घेतले तातडीचे निर्णय


* 5 सहयोगी प्राद्यापकांची नियुक्ती
* बांधकाम विभागाला दिला अल्टीमेटम
* डॉक्टरांचा मोबाईल लागला भिंतीवर
* चंद्रपुरात अतिरिक्त अतिदक्षता विभागाची घोषणा
* औषध खरेदीसाठी तत्काळ निधीची उपलब्धता
* आकस्मिक पाहणीत थेट कारवाईचे निर्देश
* जिल्हाधिकारीही यंत्रणेवर ठेवणार निगराणी

चंद्रपूर, दि.15 सप्टेंबर- चंद्रपूर जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या मृत्यूबाबत व येथील आरोग्य यंत्रणेबाबत राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत गंभीरतेने निर्णय घेणे सुरु केले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सांवत तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचेशी संपर्क साधून काही महत्वपूर्ण निर्णय झाले आहेत. चंद्रपूरात प्रसूती विभागात अतिरीक्त अतिदक्षता विभागाला मंजूरी मिळाली असून आज सांयकाळी 5  सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश धडकला आहे. तसेच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबीत बांधकामासाठी संबंधित विभागाला कडक आदेश देण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांनी या संदर्भात सांयकाळी माहिती देतांना पाच सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश धडकल्याचे सांगितले. चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 15 दिवसात या ठिकाणच्या रिक्तपदावर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. या बैठकीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु झाल्या होत्या. आणखी काही रिक्त जागांवर नवीन आदेश येण्याची अपेक्षा आहे. नव्या नियुक्तीमध्ये स्त्रीरोग शास्त्रविभागामध्ये दोन सहयोगी प्राध्यापक, बधीरीकरण विभागात दोन सहयोगी प्राध्यापक तर औषध वैद्यकीय शास्त्र विभागात एका सहयोगी प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सांवत यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रसूती विभागातील नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाढलेल्या रुग्ण संख्येवर योग्य इलाज करणे शक्य होणार आहे. सोबतच औषधी खरेदीसाठी राज्यस्तरावरुन निधी कमी पडणार नाही. याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि सुलभरित्या निधीचा पुरवठा होत नसल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार निधी वळता करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील अडचणीमध्ये लक्ष घालण्याची सूचना करण्यात आली असून अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्‍हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे यांना आकस्मिक भेटी देवून अतिदक्षता विभाग व अन्य विभागातील अडचणी शोधून यंत्रणा सुलभ करण्याचे सांगितले आहे. कामचुकार व रुग्णांना त्रास देणा-यावर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले आहे. सर्व विभागात संबंधित डॉक्टरांचे मोबाईल नंबर रुग्णांना उपलब्ध करण्याचे निर्देशही अधिष्ठाता यांनी दिले असून तशा पध्दतीचे भिंतीपत्रक लावण्यात आले आहे. बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना मर्यादित वेळेत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. बल्लारपूर बायपास रोडवर शंभर एकरात अतिभव्य वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार असून सद्या अस्तित्वात असणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा देखील कायापालट होणार आहे.

सुविधा वाढणार
वैद्यकीय महाविद्यालयात सद्या एमबीबीएसची तिसरी तुकडी आली असून या वैद्यकीय महाविद्यालयातील तुकडी जशी वाढत जाईल. त्यापध्दतीने सुविधा उपलब्ध करावीच लागते. त्यामुळे पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यामध्ये पुढील दोन वर्षात अमूलाग्र बदल होणार आहे. हा प्रत्येक बदल सामान्य माणसाच्या आरोग्याशी संबंधित असून त्याचा उपयोग प्रत्येक रुग्णाला होणार आहे. आदिवासी भागातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे असणार असून पूर्ण बांधकामा अंती एक अतिभव्य सुविधापूर्ण रुग्णालय सामान्य जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. कोणत्याही खाजगी दवाखान्यापेक्षा सर्व सुविधा मोफत या ठिकाणी उपलब्ध होणार असून यासाठी राज्याचे वित्त मंत्री प्रत्येक्ष लक्ष ठेवून असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.मोरे यांनी दिली आहे.

चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर,15 सप्टेंबर- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे कौशल्यम सभागृहात उद्या सकाळी  11 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगारांनी संगणीकृत सेवायोजन कार्ड, आवश्यक मुळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र चंद्रपूरच्या सहाय्यक संचालक यांनी केले आहे.
            सदर मेळाव्यात विविध कंपनीत 233 पदे रिक्त असून या कंपनीत जाण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.  नागपूर येथील हल्दीराम कंपनीत ट्रेनीचे 100 पदे असून याकरीता 10 वी  पास व 12 वी पास अथवा नापास, फ्युचर ग्रुप सप्लाईस नागपूर कंपनीत ट्रेनीकरीता फक्त महिलांसाठी 50 पदे असून पात्रता 12 वी पास, आयटीआय तसेच पदवीधर असणे आवश्यक आहे. ताल मॅन्युफॅक्चरींग युनीट नागपूर कंपनीत फिटर, टर्नर, मशिनिष्ट शिट मेटल करीता ट्रेनीचे 50 पदे तसेच चंद्रपूर येथील मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स ॲडव्हायझरची 20 पदे, चंद्रपूर सर्व्हिसेसमध्ये फिल्ड एक्झीक्युटीव्हची 5 पदे तर डीएसके ग्रुप येथे सेल्स एक्झीक्युटीव्हची 4 व सेल्स मॅनेजरची 4 पदे भरावयाची असून याकरीता पात्रता 10 वी व 12 वी पास अशी आहे. उमेदवार 18 ते 30 या वयोगटातील असावा. सदर कंपन्यांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित राहणार आहेत.
            सदर मेळाव्यात जिल्ह्यातील विविध कर्ज वितरीत करणारे महामंडळातील प्रतिनिधी, कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या ( व्हिटीपी ) संस्थाचे प्रतिनिधीही मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी  या कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा,असे कळविण्यात येत आहे.
000

चंद्रपूर जिल्हयात फुटबॉल फिव्हर ! 570 शाळा झुंजणार मैदानावर जिल्हा पोलीस मैदान व जिल्हा क्रीडा संकुलात शुभारंभ


चंद्रपूर, दि.15 सप्टेंबर- फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफामार्फत 17 वर्षाखालील वर्ल्डकप भारतात घेण्यात येणार असून त्यापूर्वी फुटबॉलमय भारत करण्याच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व शाळा 15 व 16 सप्टेंबरला फुटबॉल मॅचेस खेळणार आहे. महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन फुटबॉलचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वत: फुटबॉल खेळत जिल्हा क्रीडा संकुलात केला. यावेळी महापौर अंजली घोटेकर, मनपाच्या नगर सेविकेच्या टिमसह उपस्थित होत्या.
               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये बॉम्बे जिमखाना येथे या स्पर्धेला सुरुवात केली. अशा प्रकारच्या एखादया खेळाला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्‍य आहे. आज महाराष्ट्रात 10 लाखाहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्या जिल्हा क्रीडा स्टेडीयमवरील अंतीम सामन्याला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्हयात पालकमंत्री चषक फुटबॉल स्पर्धा आजपासून सुरु होत असून त्यातील पहिला सामना महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या संघाने जिल्हा क्रीडा स्टेडीयमवर खेळला. चंद्रपूर जिल्हयामध्ये खाजगी व जिल्हा परिषदेच्या मिळून 570 शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. याशिवाय जिल्हयातील सर्व फुटबॉल क्लब, क्रीडा संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. जिल्हाभरात 25 हजार विद्यार्थ्यासह नागरिकांचा सहभाग असणार आहे. तत्पूर्वी जिल्हा क्रीडा स्टेडीयम येथे आलेल्या अनेक चमूंचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व महापौर अंजली घोटेकर यांनी स्वागत केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी या महाराष्ट्रव्यापी स्पर्धेची माहिती दिली.
               महापौर अंजली घोटेकर यांनी या अभियानाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे कौतुक केले. एकाचवेळी जिल्हाभरात सुरु असलेल्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलतांना जिल्हाधिका-यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधला. मैदानी खेळ हे व्यक्तीगत आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरत असून नव्या पीढीने ईलेक्ट्रॉनिक्स गॅझेटच्या मोहातून बाहेर पडले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, विख्यात क्रीडा पटू राजेश नायडू, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभपाती राहूल पावडे, मनपा सभापती देवानंद वाढई, आशाताई आबुजवार उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर पोलीस मैदानावर पालकमंत्री चषक फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या वनीताताई आसुटकर, नगर सेवक रामपालसिंह, विलासबाबू टेभूर्णे, शांतारामजी चौखे, रवी गुरुनुले, भारत रायपूरे आदींच्या हस्ते करण्यात आला.
               महानगरपालिकेच्या टिममध्ये छबुताई वैरागडे, शितल गुरुनुले, सविता कांबळे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माया उईके, शितल चौहान, शितल आत्राम, आशाताई आबुजवार, चंद्रकला सोयाम, कल्पना बबुलकर, रंजना यादव, संगीता खांडेकर, सीमा रामेडवार, अनुराधा हजारे या नगर सेविकांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी  तर संचालन श्री.मोंटूसिंग यांनी केले.
                                                                    000

पुढील 2 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा वनविभागाचा निर्धार


चंद्रपूर,दि.15 सप्टेबर : महाराष्ट्रामध्ये पुढील दोन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात  आले आहे. त्यामध्ये वन विभागाकडून  2017  मध्ये 4 कोटी , 2018 मध्ये 13 कोटी,  2019 मध्ये 33 कोटी असे  एकूण  50 कोटी  वृक्ष लागवडीचे नियोजन  करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली.  
यावेळी  जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले की, सन 2018 मध्ये आपल्या जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी पुढाकार घेवून आतापासूनच नियोजन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या संकेस्थळावर चंद्रपूर जिल्हयात महसूल तसेच वन विभागाकडे असलेल्या झुडपी जंगलांची  माहिती  उपलब्ध केली जाईल. त्या झुडपी जंगलात सर्व शासकीय यंत्रणेला  वृक्ष लागवडीसाठी ते जंगल उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  
या बैठकीत मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सन 2017 मध्ये ज्या प्रमाणे सर्व शासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवडीमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी  वृक्ष लागवडीचे लक्षांक  पूर्ण करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.  या वर्षी चंद्रपूर जिल्हयाला दिलेले 74 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार करण्याचा संकल्प यावेळी या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, मुख्य व्यवस्थापक उत्तर राहुरकर, विभागीय व्यवस्थापक श्री.पाटील, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व इतर यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

     000000000

Thursday, 14 September 2017

बाल मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा- सुधीर मुनगंटीवार


राज्यातील सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयाचा लौकीक चंद्रपूरला मिळावा

चंद्रपूर, दि.14 सप्टेंबर- राज्यातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारा जिल्हा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. मात्र गरीबांच्या तक्रारी येता कामा नये, जिल्हयातला बाल मृत्यूदर शून्यापर्यंत नेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ग्रामीण भागातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था बळकट करा, अशी सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गेल्या काही दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हयातील अन्य आरोग्य यंत्रणेबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत. प्रसार माध्यमामध्येही याबाबत वृत्त उमटत आहे. त्यातील वैद्यकीय दृष्टया आकडेवारीमध्ये न जाता जिल्हयातील नवजात शिशूंचा मृत्यूदर शुन्यावर कसा येईल, यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर रात्री उशीरा जिल्हयातील आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेतली. राज्यातील अन्य जिल्हयाच्या आरोग्य सुविधा आणि  तत्सम आकडेवारीसी तुलना न करता चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि उपचाराच्या दृष्टीने राज्यातील अव्वल इस्पितळ झाले पाहीजे. औषधी, इमारती, तांत्रिक सुविधा, डॉक्टरांची भरती कोणत्याही बाबतीत अडचण असेल तर ती तातडीने दूर करण्यात येईल. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या भगीनीला पूर्ण सुविधा बहाल झालीच पाहिजे, असे आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा आदींची उपस्थिती होती.
प्रसूती विभागातील नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) मध्ये औषधांचा तुटवडा किंवा सुविधांचा अभाव असेल तर आताच त्याची मागणी करा. मात्र या ठिकाणी येणा-या जिल्हा व जिल्हाबाहेरील कोणत्याही भगीनीला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरामध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असून यामध्ये कसूर करणा-या सर्व अधिकारी, कर्मचा-यांवर थेट कारवाई केली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आदिवासी व दुर्गम भागातील गरीब लोकांचा या रुग्णालयात सतत राबता असून त्यांच्याशी नीट आणि सभ्यतेने न बोलणा-या कर्मचा-यांना अन्यत्र हलवा, त्यांच्यावर कारवाई करा. रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था व नियमित कार्यरत असणा-या पोलीस विभागाच्या कर्मचा-यांचे या ठिकाणावरुन सेवा बदलविण्यात यावी, या ठिकाणी कर्तव्यदक्ष, इमानदार कर्मचा-यांची नियुक्ती केली जावी, अशी सूचना त्यांनी केली. या परिसरात काही समाजकंटाकडून रुग्णांची दिशाभूल होत असेल तर त्यांचा शोध घेऊन कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सरकारी सेवेमध्ये पूर्णवेळ असणारे डॉक्टर सेवेचा भत्ता घेऊनही खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करीत असतील तर त्यांनाही शोधून तात्काळ कारवाई करण्यात यावी. या दवाखान्यातील प्रत्येक डॉक्टरांच्या संदर्भात अधिष्ठातांनी व्यक्तिगत नोंद ठेवावी. अतिदक्षता विभागातील रुग्णांची हेळसाड होणार नाही. यासाठी नियमित पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी अधिष्ठातांना दिले. पुढील 15 दिवसानंतर याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बैठकीतूनच त्यांनी मुंबईतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून औषधांचा तुटवडा, अत्याधुनिक सुविधा आणि कर्मचा-यांच्या नियुक्त्यांबाबत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला व सामान्य रुग्णालयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी या परिसरातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांच्या सुचनाबाबतही त्यांनी अधिष्ठातांना माहिती दिली. तसेच या दोनही पदाधिका-यांनी नियमित व आकस्मिक भेटी देवून या विभागातील प्रलंबित कामांना व मागण्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.
000