Search This Blog

Monday, 19 November 2018

बल्लारपूर ला रोजगार निर्मितीचे केंद्र बनवणार : ना.मुनगंटीवार


डायमंड कटिंग सेंटरमधील 100 उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर

चंद्रपूर दि.19 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. बल्लारपूर येथे वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या डायमंड कटिंग सेंटरमधील पहिल्या शंभर उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर देण्याचा सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी मोबाईलवरून संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्यात.
बल्लारपूर परिसराला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम बल्लारपूर शहरांमध्ये व आसपास सुरू होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील, अशा पद्धतीचे उपक्रम, उद्योग आणि प्रकल्प या भागात उभे होत आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे  शुभेच्छा संदेशांमध्ये त्यांनी सांगितले. मुंबई येथे अधिवेशन सुरू असताना बल्लारपूर येथील डायमंड कटिंग सेंटर मधील पहिल्या बॅचला निरोप देण्यासाठी वेळात वेळ काढून त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. 
वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या उपस्थितीत बल्लारपूर मध्ये हा सोहळा पार पाडला.  त्याच्याहस्ते यावेळी विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र व अपॉइंटमेंट ऑर्डर देण्यात आल्या. या सर्व मुलांना या प्रशिक्षणानंतर हमखास नोकरी मिळेल,अशी हमी देण्यात आली होती. चंदनसिंग चंदेल यांनी यावेळी विद्यार्थांना संबोधीत केले. पालकमंत्री महोदयांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला ठरवल्याप्रमाणे न्याय देता आल्याबद्दलचे समाधान व्यक्त केले. आज पहिल्या बॅचचा हातामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सोबतच नोकरीचे आदेश देता आले. हे या जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या दिला शब्द केला पूर्ण याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. 
11 फेब्रुवारी 2018 रोजी डायमंड कटिंग सेंटर सुरू करताना त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणासोबत नोकरीची हमी देत असल्याचे स्पष्ट केले होते. राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य  व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी एक हजार तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराची हमी देण्यात आली आहे. डायमंड कटिंग प्रोजेक्ट माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिऱ्यांना पैलू पाडणारा कौशल्ययुक्त मनुष्यबळाची निर्मिती बल्लारपूर सारख्या शहरांमध्ये केली जाणार आहे.
यावेळी बोलताना चंदेल यांनी स्पष्ट केले की बल्लारपूर शहराला हिऱ्यांना पैलू पाडणारे शहर म्हणून आगामी काळात ओळखले जाणार आहे. या संदर्भातील वेगवेगळे उद्योग व्यवसाय या शहरात कसे येतील या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी प्रशिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी तुमच्या हातात कौशल्य आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी ठेवा. ज्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला न्याय मिळेल अशा ठिकाणी नोकरी करण्यासाठी सिद्ध राहा. मेहनत करणाऱ्याला निश्चितच यश मिळते, असे स्पष्ट केले. पहिल्या बॅचच्या सर्वच्या सर्व मुलांना ठरवल्याप्रमाणे   प्रशिक्षण संपल्यानंतर त्या दिवशीच हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना एमडी जेम्स या कंपनीचे संचालक निलेश गुल्हाणे यांनी डायमंड इंडस्ट्रीमध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड वानवा असून जगाच्या पाठीवर हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या व्यक्तींना रोजगाराची मोठी संधी सर्वत्र उपलब्ध असल्याचे सांगितले. मुंबई, सूरत या शहरांमध्ये लक्षावधी लोकांना या प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र हा रोजगार हळूहळू बल्लारपूर सारख्या शहरांमध्येही वृद्धिंगत राहावा, असा आमचा प्रयत्न असून भविष्यात बल्लारपूरच्या डायमंड कटिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकाला याच ठिकाणी नोकरी मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व सोबतच ज्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली आहे. त्याठिकाणी सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचीही घोषणा केली. तसेच पहिल्या बॅचला त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील या कंपनीमार्फत प्रवासाची व्यवस्था केली.
या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी या प्रशिक्षणार्थांना नोकरी दिली जात आहे. त्या कंपनीचे मालक कार्तीक जेम्सचे संदिप इंगळे सुद्धा उपस्थित होते. मुलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची निर्मिती होत असून हिऱ्याच्या पैलू पाडणाऱ्या उद्योगाला लागणार्‍या मुबलक मनुष्यबळासाठी आता बल्लारपूर ची देखील ओळख होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर बल्लारपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष मिना चौधरी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी डॉ.विजय इंगोले, सभापती अरुण वाघमारे, नगरसेवक स्वामी रायबरम, वैशाली जोशी, रेणूका दुधे,  मनीष पांडे, राजू गुणगट्टी,  आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ सिंह यांनी केले. आभार प्रदर्शन हा प्रकल्प चालवणाऱ्या एम.डी. जेम्स संचालक निलेश गुल्हाने यांनी मानले.
0000

Sunday, 18 November 2018

जिल्हा वार्षिक आराखड्याचा आमदार धोटे यांच्याकडून आढावा


चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर-  चंद्रपूर जिल्ह्याच्या विविधांगी विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्वसाधारण योजना तसेच विशेष घटक योजना याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आला
आमदार ॲड.संजय धोटे यांनी या बैठकीची अध्यक्षता केली. या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरचंद्रपूर आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरचिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीमध्ये गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या ऑक्टोबर अखेरच्या खर्चाबाबतही आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. जिल्हयासमोर आवश्यक व प्राधान्याची कामे आहेत. ती कामे तातडीने या योजनेमधून पार पाडण्यात यावी, असा आदेश आमदार ॲड.संजय धोटे यांनी दिला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.वायाळ यांनी विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. रक्कमेचा योग्य व आवश्यक ठिकाणी खर्च करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ.खेमणार यांनी केल्या.
                                         0000

महावॉकेथान स्पर्धेचे आयोजन


चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर- शालेय विद्यार्थ्याचे रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन होण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा महावॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथे सुध्दा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आज सकाळी 8 वाजता महावॉकेथान स्पर्धा वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथून ताडोबा रोड या मार्गावर दोन कि.मी.पर्यंतची काढण्यात आली होती. यामध्ये अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता  सुषमा साखरवाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे, वाहतुक पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण, कार्यकारी अभियंता मनोज जुनोनकर, श्री.जाधव, चांदा पब्लीक स्कुलच्या संचालिका श्रीमती जिवतोडे, विद्यार्थी, वाहतुक शाखेचे अधिकारी, कर्मचा-यांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने  या रॅलीमध्ये भाग घेतला होता.  
                                                          000

शेवटच्या गरजू , वंचिताला न्याय देणा-या अर्थशास्त्रावर परिषदेत चिंतन होऊ द्या : सुधीर मुनगंटीवार



42 व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधीवेशनाला चंद्रपूरमध्ये सुरुवात

चंद्रपूर दि.17 नोव्हेंबर : देशातील वंचित, शोषित व गरजू नागरिकांच्या जीवनामध्ये अमूलाग्रबदल होणा-या अर्थनीतीची आजही गरज आहे. गरीबाच्या घरातील अर्थकारण सुसहय करण्याची गरज आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये देशभरातून एकत्रित आलेल्या अर्थशास्त्रज्ञांनी शेवटच्या माणसाच्या जीवनात फरक पडेल अशा बदलांवर चिंतन करावे, अशी अपेक्षा राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर मध्ये 17 ते 19 नोव्हेंबरपर्यंत चालणा-या  मराठी अर्थ परिषदेच्या 42 व्या अधिवेशनाचे त्यांनी आज उदघाटन केले.
माजी केंद्रीयमंत्री स्व. शांतारामजी पोटदुखे यांच्या सरदार पटेल महाविद्यालयात या राष्ट्रीय परिषदेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. या परिषदेला संपूर्ण देशातून 150 अर्थशास्त्रज्ञ उपस्थित झाले. वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये या ठिकाणी विचारमंथन होणार आहे. याशिवाय अर्थशास्त्र क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे विविध चर्चासत्रामध्ये विचार ऐकायला मिळणार आहे.  आज झालेल्या उद्घाटन समारंभाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, 42 व्या मराठी अर्थशास्त्र परिषद अध्यक्ष प्रा.चारुदत्त गोखलेगोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकरसर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष तथा अर्थशास्त्र परिषदेच्या स्वागत अध्यक्ष श्रीमती सुधाताई शांताराम पोटदुखेसचिव प्रशांत पोटदुखे, उपाध्यक्ष रमेश मामीडवार, प्राचार्य एस.एस.कावळे, प्राचार्य डॉ.आर.पी.इंगोले, डॉ. राजेंद्र भांडवलकर, अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.शरयू पोतनुरवार, संचालक डॉ. कैलास पाटीलअर्थसंवादचे संपादक डॉ. राहुल म्होपरे, आदिंची उपस्थिती होती.
         यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य निर्माण होईल अशा पद्धतीच्या अर्थशास्त्राची सध्याच्या परिस्थितीमध्ये गरज असल्याचे प्रतिपादन केले. अर्थशास्त्राला सामान्य माणसाच्या आयुष्यात उतरवताना प्रगत चिंतन करणे गरजेचे आहे. जगाची साधनसामुग्री काही टक्के लोकांच्या हातामध्ये का आली आहे  या पद्धतीचे जागतिक चिंतन सध्या सुरू आहे. एक अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सरप्लस अर्थसंकल्प मांडण्याचे सौभाग्य मला लाभले. मात्र या सरप्लस अर्थसंकल्पाचा लाभ शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत का पोहचत नाही ही चिंतेची बाब आहे. यावर आम्ही अर्थशास्त्राच्या सर्व तज्ञांनी विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या परिषदेत यावर चिंतन करून त्‍या माध्‍यमातुन शासनाला उपाययोजना करण्‍यास सांगीतल्‍यास त्‍यावर निश्‍चीतपणे योग्‍य कार्यवाही करता येईलअसेही ते म्‍हणाले.
         यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, चंद्रपूर हे ऊर्जा देणारे शहर आहे. देशभरातल्या अर्थशास्त्रज्ञांची तीन दिवसांची परिषद ऊर्जावान व्हावी. या ऊर्जेतून  महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाची दिशा ठरावी. या ऊर्जेतून या प्रदेशाच्या विकासाची दिशा ठरावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ना. मुनगंटीवार यांनी आज ज्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. त्याच कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे. आपल्याच कॉलेजच्या एका माजी विद्यार्थ्याला ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. माजी अर्थराज्यमंत्री स्‍व.शांतारामजी पोटदुखे यांच्या विरुद्ध निवडणूक देखील आपण लढली आहे. तरीही या कॉलेजच्या व्यवस्थापनाने अतिशय सन्मानाने या परिषदेच्या उद्घाटनाचे  निमंत्रण दिल्याबद्दलही त्यांनी आभार मानले. महाराष्ट्रातील अर्थशास्त्रज्ञांनी या मागील भावनिक अर्थशास्त्र समजून घ्यावे, हे नाते, भावबंध अन्य ठिकाणी दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थ परिषदेच्या प्रास्ताविकामध्ये अर्थमंत्री म्हणून आपल्याकडून व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
          मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक चारुदत्त गोखले यांनी यावेळी बोलताना बदलत्या मानवी गरजा आणि त्याला पूरक अर्थशास्त्र यावर अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा होता. त्यावेळी मानवाचे अर्थशास्त्र या गरजांना पूरक असे विकसित केले गेले. मात्र मानवाच्या गरजा विस्तारित होत आहे. अनेक गरजा आता जीवनावश्यक झाल्या आहेत. त्या दृष्टीचे अर्थशास्त्र तयार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
       कुलगुरू डॉक्टर कल्याणकर यांनी चंद्रपूरमध्ये या परिषदेचे आयोजन करणा-या सरदार पटेल महाविद्यालयाचे यावेळी कौतुक केले. अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अर्थशास्त्रावरील चिंतन प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाताई पोटदुखे यांनी शेतकरी बांधवांच्या जीवनात जगण्याची उर्मी निर्माण होईल, अशा पद्धतीच्या अर्थशास्त्राचा अविष्कार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांकडून केली. मोठ्या संख्येने या परिषदेला देशभरातून आलेल्या सदस्यांचे त्यांनी स्वागत केले.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.पी. इंगोले यांनी केले. यावेळी डॉक्टर राजेंद्र भांडवलकर यांनी भूमिका व्यक्त केली तर कैलास पाटील, रमेश मामीडवार यांनी यावेळी या आयोजनामागील मनोगत व्यक्त केले. विविध अर्थशास्त्रज्ञांच्या पुस्तकांचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना विघ्नेवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.शरयू पोतनुरवार यांनी केले.
                                                            00000

क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे भूमीपूजन या देशात सर्वात आधी आदिवासींचा सन्मान होईल : ना.अहिर



शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या वंशजाच्या उपस्थितीत कार्यक्रम
वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे अभिवादन

चंद्रपूर दि.17 नोव्हेंबर : आमच्या संस्कृतीचे अतिशय प्रामाणिकपणे जतन करणारेसंवर्धन करणारे आदिवासी यांनी स्वातंत्र्यलढ्यात लढलेला लढा बावनकशी होता. मात्र दुर्दैवाने हा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्याचा सन्मान करण्याचा विडा या शासनाने उचलला आहे. बिरसा मुंडा यांची जयंती पूर्ण देशभर सध्या साजरी होत असताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाची सुरुवात करीत असल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरात 1957 च्या उठावामध्ये इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणा-या वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीमध्ये स्मारक बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी बीरसा मुंडा यांच्या स्मृती अभिवादनाच्या केद्र शासनाच्या मोहीमेमध्ये बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या वंशजाच्या उपस्थितीत हजारो आदिवासींच्या साक्षिने आज हा सोहळा पार पडला. वीर बाबुराव शेडमाके यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. त्या ठिकाणी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. ना.अहीर यांच्या अध्यक्षतेत मुख्य कार्यक्रम पारपडला. या ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करुन स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तथापि, ही सुरुवात असून जेल प्रशासनाच्या अधिपत्यात असणारी या ठिकाणची गोंड राज्याच्या राजवाडयाची वास्तू मोकळी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ना.अहीर यांनी केले.
ते म्हणाले, या देशाचा खरा इतिहास हा आदिवासींचा इतिहास आहे. मात्र त्यांच्या संघर्षाला लिहीले गेले नाही. आज बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज तुमच्या पुढे आहेत. या कुटुंबाच्या बलिदानांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे या शहीदांचा सन्मान सर्वात आदी करणे या शासनाचे आध्य कर्तव्य आहे. या स्मारकासाठी खासदार निधीतून खर्च करण्यात आला आहे. पण ही सुरुवात आहे. आगामी काळामध्ये आदिवासी बांधवांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्या दृष्टीने आमची पाऊले पडत असून आदिवासींना सोडून आमची वाटचाल शक्य नाही. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी छत्तीसगड मधून आलेले बिरसा मुंडा यांचे पणतु सुखराम मुंडा, सनिका मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाके, रामचंद्र शेडमाके, गुणबाई शेडमाके यांचा सत्कार केला.  यावेळी व्यासपीठावर आ.नानाभाऊ शामकुळेआ.राजू तोडसाममहापौर अंजलीताई घोटेकरभगवान बिरसा मुंडा यांचे वंशज सुखराम मुंडाशहीद बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाकेरामचंद्र शेडमाकेगुणाबाई शेडमाकेखुशाल बोंडेविजय राऊतआतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूतअभियंता मनोज जयस्वाल, दयालाल कन्नाके, विजय राऊत यांची उपस्थिती होती. 
तत्पूर्वी बोलतांना आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी बोलताना स्पष्ट केले की, आदिवासी बांधवानी आपली संस्कृती विसरु नये, भाषा, सण उत्सव या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे स्पष्ट केले. तर महापौर अंजलीताई घोटेकर यांनी यावेळी बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले. या स्मारकासाठी ना.अहीर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरु ठेवलेल्या प्रयत्नाबद्दल माहिती दिली.   कार्यक्रमाचे संचालन नगरसेविकास सविता कांबळे यांनी केले.
00000