Search This Blog

Sunday, 18 November 2018

शेवटच्या गरजू , वंचिताला न्याय देणा-या अर्थशास्त्रावर परिषदेत चिंतन होऊ द्या : सुधीर मुनगंटीवार



42 व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधीवेशनाला चंद्रपूरमध्ये सुरुवात

चंद्रपूर दि.17 नोव्हेंबर : देशातील वंचित, शोषित व गरजू नागरिकांच्या जीवनामध्ये अमूलाग्रबदल होणा-या अर्थनीतीची आजही गरज आहे. गरीबाच्या घरातील अर्थकारण सुसहय करण्याची गरज आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये देशभरातून एकत्रित आलेल्या अर्थशास्त्रज्ञांनी शेवटच्या माणसाच्या जीवनात फरक पडेल अशा बदलांवर चिंतन करावे, अशी अपेक्षा राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर मध्ये 17 ते 19 नोव्हेंबरपर्यंत चालणा-या  मराठी अर्थ परिषदेच्या 42 व्या अधिवेशनाचे त्यांनी आज उदघाटन केले.
माजी केंद्रीयमंत्री स्व. शांतारामजी पोटदुखे यांच्या सरदार पटेल महाविद्यालयात या राष्ट्रीय परिषदेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. या परिषदेला संपूर्ण देशातून 150 अर्थशास्त्रज्ञ उपस्थित झाले. वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये या ठिकाणी विचारमंथन होणार आहे. याशिवाय अर्थशास्त्र क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे विविध चर्चासत्रामध्ये विचार ऐकायला मिळणार आहे.  आज झालेल्या उद्घाटन समारंभाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, 42 व्या मराठी अर्थशास्त्र परिषद अध्यक्ष प्रा.चारुदत्त गोखलेगोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकरसर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष तथा अर्थशास्त्र परिषदेच्या स्वागत अध्यक्ष श्रीमती सुधाताई शांताराम पोटदुखेसचिव प्रशांत पोटदुखे, उपाध्यक्ष रमेश मामीडवार, प्राचार्य एस.एस.कावळे, प्राचार्य डॉ.आर.पी.इंगोले, डॉ. राजेंद्र भांडवलकर, अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.शरयू पोतनुरवार, संचालक डॉ. कैलास पाटीलअर्थसंवादचे संपादक डॉ. राहुल म्होपरे, आदिंची उपस्थिती होती.
         यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य निर्माण होईल अशा पद्धतीच्या अर्थशास्त्राची सध्याच्या परिस्थितीमध्ये गरज असल्याचे प्रतिपादन केले. अर्थशास्त्राला सामान्य माणसाच्या आयुष्यात उतरवताना प्रगत चिंतन करणे गरजेचे आहे. जगाची साधनसामुग्री काही टक्के लोकांच्या हातामध्ये का आली आहे  या पद्धतीचे जागतिक चिंतन सध्या सुरू आहे. एक अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सरप्लस अर्थसंकल्प मांडण्याचे सौभाग्य मला लाभले. मात्र या सरप्लस अर्थसंकल्पाचा लाभ शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत का पोहचत नाही ही चिंतेची बाब आहे. यावर आम्ही अर्थशास्त्राच्या सर्व तज्ञांनी विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या परिषदेत यावर चिंतन करून त्‍या माध्‍यमातुन शासनाला उपाययोजना करण्‍यास सांगीतल्‍यास त्‍यावर निश्‍चीतपणे योग्‍य कार्यवाही करता येईलअसेही ते म्‍हणाले.
         यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, चंद्रपूर हे ऊर्जा देणारे शहर आहे. देशभरातल्या अर्थशास्त्रज्ञांची तीन दिवसांची परिषद ऊर्जावान व्हावी. या ऊर्जेतून  महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाची दिशा ठरावी. या ऊर्जेतून या प्रदेशाच्या विकासाची दिशा ठरावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ना. मुनगंटीवार यांनी आज ज्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. त्याच कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे. आपल्याच कॉलेजच्या एका माजी विद्यार्थ्याला ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. माजी अर्थराज्यमंत्री स्‍व.शांतारामजी पोटदुखे यांच्या विरुद्ध निवडणूक देखील आपण लढली आहे. तरीही या कॉलेजच्या व्यवस्थापनाने अतिशय सन्मानाने या परिषदेच्या उद्घाटनाचे  निमंत्रण दिल्याबद्दलही त्यांनी आभार मानले. महाराष्ट्रातील अर्थशास्त्रज्ञांनी या मागील भावनिक अर्थशास्त्र समजून घ्यावे, हे नाते, भावबंध अन्य ठिकाणी दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थ परिषदेच्या प्रास्ताविकामध्ये अर्थमंत्री म्हणून आपल्याकडून व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
          मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक चारुदत्त गोखले यांनी यावेळी बोलताना बदलत्या मानवी गरजा आणि त्याला पूरक अर्थशास्त्र यावर अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा होता. त्यावेळी मानवाचे अर्थशास्त्र या गरजांना पूरक असे विकसित केले गेले. मात्र मानवाच्या गरजा विस्तारित होत आहे. अनेक गरजा आता जीवनावश्यक झाल्या आहेत. त्या दृष्टीचे अर्थशास्त्र तयार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
       कुलगुरू डॉक्टर कल्याणकर यांनी चंद्रपूरमध्ये या परिषदेचे आयोजन करणा-या सरदार पटेल महाविद्यालयाचे यावेळी कौतुक केले. अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अर्थशास्त्रावरील चिंतन प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाताई पोटदुखे यांनी शेतकरी बांधवांच्या जीवनात जगण्याची उर्मी निर्माण होईल, अशा पद्धतीच्या अर्थशास्त्राचा अविष्कार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांकडून केली. मोठ्या संख्येने या परिषदेला देशभरातून आलेल्या सदस्यांचे त्यांनी स्वागत केले.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.पी. इंगोले यांनी केले. यावेळी डॉक्टर राजेंद्र भांडवलकर यांनी भूमिका व्यक्त केली तर कैलास पाटील, रमेश मामीडवार यांनी यावेळी या आयोजनामागील मनोगत व्यक्त केले. विविध अर्थशास्त्रज्ञांच्या पुस्तकांचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना विघ्नेवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.शरयू पोतनुरवार यांनी केले.
                                                            00000

No comments:

Post a Comment