चंद्रपूर दि.31 ऑक्टोबर : चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. तथापि, विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदला देखील दिवाळी नंतर लगेच दिल्या जाईल, अशी घोषणा जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत केली.
2002 ला मंजूर झालेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. तथापि आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना.हंसराज अहिर यांनी याप्रकरणी तोडगा काढला असून विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्व स्थितीपेक्षा अधिक क्षमतेने शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आता 57 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. पूर्वी या प्रकल्पातून केवळ 19 दलघमी पाणी देण्याचे ठरले होते. तथापि औद्योगिक वापरासाठी आता पाणीसाठा कमी करण्यात आला असून सिंचनासाठी मात्र मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.
चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या या प्रकल्पामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना नव्या धोरणानुसार मोबदला उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयीन प्रक्रियाही सुरू केली होती. त्यामुळे हा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. तथापि, राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूणच सिंचन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा वापर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
आजच्या बैठकीला या सिंचन गस्त शेतकऱ्यांची देखिल उपस्थिती होती. त्यांनी या वेळी प्रकल्पग्रस्तांना नव्या धोरणानुसार मिळत असलेल्या मोबदल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता बलवंत स्वामी, अधीक्षक अभियंता के.सु.वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment