Search This Blog

Sunday, 11 November 2018

चंद्रपूर गडचिरोलीच्या विकासाचे 'व्हिजन डॉक्‍युमेंट' तयार करा : ना. गडकरी





चंद्रपूर जिल्ह्यासाठी साडेआठ हजार कोटीचे पॅकेज जाहीर

चंद्रपूर दि ११ नोव्हेंबर : चंद्रपूर व गडचिरोली या दोन्हीही जिल्हयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी स्वतः आणि ना. हंसराज अहिर, ना. सुधीर मुनगंटीवार असे चारही नेते कटिबद्ध असून केंद्र शासनाच्या सर्व योजना लागू करण्यासाठी आवश्यक असणारे व्हिजन डॉक्युमेंट तयार करा. केंद्रातील सर्व योजना या दोन जिल्ह्यांमध्ये लागू केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग व जलसंपदा मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज केली. दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये रस्ते,पूल, बॅरेजेस व वेगवेगळ्या विकास कामांसाठी त्यांनी साडेआठ हजार कोटीचे पॅकेज आज चंद्रपूरसाठी जाहीर केले.
          केंद्रात मंत्री झाल्यानंतर आज प्रथमच रस्ते वाहतूक आणि महामार्ग व जलसंपदा मंत्री नितिन गडकरी यांचे चंद्रपूर मध्ये आगमन झाले. दुपारी 12 वाजता त्यांनी चंद्रपूर जवळील ताडाळी येथे केंद्रीय रसायने व खते मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी( सिपेट ) या संस्थेच्या इमारतीचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी दुपारी बल्लारपूर येथील बामणी येथे रस्त्याच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त नागरिकांना संबोधित केले. आज दिवसभरात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूर, यवतमाळ,गडचिरोली जिल्ह्यातील आमदार यांच्या विविध प्रस्तावांना मान्यता देत सायंकाळच्या सभेमध्ये साडेआठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या पॅकेजची घोषणा त्यांनी केली. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे रस्त्यांचे डांबरीकरण, दुपदरीकरण ,चौपदरीकरण, तसेच वर्धा ,वैनगंगा व उमा नदीवरील पुलांचा समावेश आहे. तसेच या भागातून जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवरील भूमिगत रस्त्याचाही समावेश आहे.
            चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जिल्ह्याच्या पुढील आवश्यकता लक्षात घेऊन काही बॅरेजेस प्रस्तावित केले आहे. त्या बॅरेजेसला देखील आवश्यक असणारे तंत्रज्ञान अल्पदरात उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील त्यांनी आपल्या बामणी येथील सभेत केली. त्यामुळे सकाळी साडेपाच हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विकास कामाचे असणारे पॅकेज सायंकाळी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे जलसंपदा विभागाचे प्रस्ताव मान्य करत साडेआठ हजाराचे झाले. या सर्व नव्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. तर यापूर्वीच मान्यता मिळालेल्या अनेक प्रकल्पाचे काम सुरू झाले असून काहींचे प्रस्ताव मान्य करण्याचेही त्यांनी यावेळी सूतोवाच केले.
           या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नानाभाऊ शामकुळे, वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आ. अॅड. संजय धोटे,आ. कीर्तीकुमार भांगडीया,आ. देवराव होळी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार, उपमहापौर अनिल फुलझेले,सभापती ब्रिजभूषण पाझारे ,माजी आमदार जैनुदीन झव्हेरी, राहुल पावडे, प्रमोद कडू, रेणुका दुधे आदी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना त्यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी सर्व आमदार व लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर व अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी एक व्हिजन डॉक्‍युमेंट तयार करावे, अशी सूचना केली. केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ या दोन जिल्ह्यांना मिळावा,यासाठीचे सर्व प्रस्ताव या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये असावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उभय नेत्यांनी हे व्हीजन डॉक्युमेंट आपल्याकडे सादर करावे, केंद्र सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी या दोन जिल्ह्यांमध्ये केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
            यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी गोसीखुर्द प्रकल्प पुढच्या दोन वर्षात पूर्ण करणे हे आपले ध्येय असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी तरतूद आपण केली असल्याचे स्पष्ट केले. गोसीखुर्द मधून चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अडीच हजार हेक्टर जमिनीचे सिंचन सुरू झाल्यानंतर धानाच्या पिकामध्ये प्रचंड वाढ होणार असून या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपल्या जैविक इंधनाच्या पाठपुराव्यासाठी प्रसिद्ध असणारे गडकरी यांनी यावेळी धानाच्या तनापासून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये इथेनॉल बनविण्याचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात पुढील काळात सुरू करण्यात येईल असे सूतोवाच केले. यासाठी उभय नेत्यांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले. बांबू पासून तेल काढण्याच्या प्रयोगाला देखील अंतिम स्वरूप येत असून विशिष्ट जातीच्या बांबू लागवडीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी तयार राहावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
           यावेळी त्यांनी ना. अहीर व ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या भागात सुरू केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. सिपेट सारखा प्रकल्प ना. अहिर यांच्यामुळे चंद्रपूरमध्ये सुरू झाल्याबद्दल त्यांनी सांगितले. तर राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. भारतातील एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. तसेच वनमंत्री म्हणून त्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर वृक्षलागवडीच्या माध्यमातून नाव मिळवून दिले आहे. त्यांच्या मतदारसंघातील सैनिकी शाळा,बॉटनिकल गार्डन, एपीजे अब्दुल कलाम आझाद पार्क, बल्लारपूरचे पोलीस स्टेशन या शहराकडे येताना आपण बघत येत होतो. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या कल्पकतेने केलेल्या कामाचे मला मनापासून कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले. बल्लारपूर हा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक उत्तम मतदारसंघ म्हणून ओळखल्या जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
          तत्पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ना. गडकरी यांनी या परिसरातील जनतेसाठी सिंचनाचे देखील मोठे प्रोजेक्ट मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले. आमडी, धानोरा, चिचाळा आदी ठिकाणच्या बॅरेजेससाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात सुरू केलेल्या विविध प्रकल्पाची माहिती गडकरी यांना दिली. गडकरी यांनी सुरू केलेल्या विकासाच्या दृष्टिकोनाला अमलात आणूनच जिल्ह्यामध्ये विकास सुरू असल्याचे विनम्रपणे सांगितले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील संबोधित केले.गडकरींच्या नेतृत्वात या मतदारसंघामध्ये विकास कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे पाठबळ कायम पाठीशी राहोत, अशा अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तत्पूर्वी राजुरा मतदारसंघाचे आमदार अॅड.  संजय धोटे यांनी देखील संबोधित केले.
00000

No comments:

Post a Comment