महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याण मंडळातर्फे सुरक्षा साधनांचा वाटप
कल्याण मंडळातर्फे सुरक्षा साधनांचा वाटप
चंद्रपूर, दि 26 नोव्हेंबर : आपल्या मनातली घरे बांधणारे, आपल्या निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणारे कामगार यांना शासन विविध सोयी सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे आपल्या अवतीभवती असणाऱ्या गरजू व गरीब कामगारांना राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडे आपल्या नावाची नोंदणी करायला सांगा,असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत झालेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील शेकडो कामगार उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधतांना ओमप्रकाश यादव म्हणाले, राज्य शासन कामगारांना घरे, सुरक्षा आणि आरोग्यदायी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहे. 28 प्रकारच्या विविध सामाजिक योजना कामगारांसाठी सज्ज आहेत. तथापि, त्यासाठी कामगारांची नोंद होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत विविध योजना तयार केलेल्या आहेत. मात्र नोंदणी नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित आहेत. त्यामुळे जे खरोखर बांधकाम कामगार आहेत, त्यांना या योजनेची माहिती देण्याचे आवाहन देखील यावेळी जमलेल्या कामगार बांधवांना त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, उपमहापौर अनिल फुलझेले, दिशा सदस्य खुशाल बोंडे, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे सदस्य ॲड. शैलेश मुंजे, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सदस्य अशोक भुताळ आदी उपस्थित होते.
2014 पासून कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मोठ्या प्रमाणात राज्यात नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख कामगारांची नोंद झाली आहे. त्यांच्यासाठी विविध योजना असून या योजनेचा लाभ लोकांपर्यंत जावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी यावेळी चंद्रपूरमध्ये या कामगारांची मोठी संख्या असताना देखील नोंदणी कमी आहे. त्यामुळे या नोंदणीला गती देण्याबाबत संबंधित विभागाने प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, यांनी देखील सर्व संबंधित यंत्रणांनी नोंदणीकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नोंदणीला गती दिली जाईल असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते नोंदणीकृत कामगारांना पाच हजार रुपयांचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. अन्य नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. याशिवाय या वेळी कामगारांना सुरक्षा साहित्याचे देखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ज्योती तोहगावकर यांनी केले.
चंद्रपूरमध्ये प्रशासकीय भवनात नोंदणी !
चंद्रपूर जिल्हयातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना केवळ पंचवीस रुपयांमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकतात. यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील यासंदर्भातील कामगार नोंदणी कार्यालय हे प्रशासकीय भवनामध्ये तळ माळ्यावर बस स्टँड पुढे आहे. या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कोणत्याही कामगार आपल्या नावाची नोंद करू शकतो. राज्य शासनातर्फे 28 योजना कामगारांसाठी सध्या कार्यरत असून याचा लाभ घ्यावा, असे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कामगार कार्यालयाच्या 07172-252028 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
|
No comments:
Post a Comment