चंद्रपूर, दि.31 आक्टोबर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संबोधित करताना गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देशभक्तीसाठी कठोर निर्णय घेण्याची प्रेरणा या देशाला सरदार पटेल यांच्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी सकाळी झालेल्या एकता दौड स्पर्धेतील विजेत्यांना गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले. यावेळी गृहराज्यमंत्री ना.अहिर यांनी उपस्थितांना संबोधित केले. मानवंदना देण्यासाठी आज त्यांच्या जन्मदिवसाला गुजरातमध्ये भव्य कार्यक्रम होत असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे त्यांनी स्वागत केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या पूर्ण जीवन काळामध्ये भारत निर्मितीसाठी पूर्ण जीवन व्यतीत केले. महात्मा गांधी यांनी देखील या कामासाठी त्यांचा गौरव केला होता. आजचा भारत हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे. देशाच्या फाळणीनंतर अनेक देश तटस्थपणे रहाण्याचा किंवा पाकिस्तान सोबत जाण्याचा निर्णय घेणार होते. मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी योग्य ती मुत्सद्देगिरी दाखवत सर्व प्रदेश भारतामध्ये विलीन केले.
हैद्राबादच्या निजामाची भारतात विलीन होण्याची तयारी नव्हती. या ठिकाणी बळाचा वापर करण्यात आला. कदाचित कश्मीर प्रकरणात त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांचा हस्तक्षेप असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित सर्वांना त्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात अव्वल आलेल्या धावपटूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. ज्युबली हायस्कूलच्या शाळकरी मुलीने यावेळेस आपल्या वक्तृत्व कला सादर केले.
No comments:
Post a Comment