निरोगी जीवनासाठी स्वच्छता आवश्यक – महापौर अंजली घोटेकर
चंद्रपूर दि. 29 नोव्हेंबर 2018: निरोगी जीवनाकरिता व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्तरावर स्वच्छतेचे पालन करणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या स्वच्छता अभियानात सहभागी होवून स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविण्याकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. या अभियानात शहर आणि गावातील लोकांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती अंजलीताई घोटेकर यांनी केले. त्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत फिल्ड आउटरीच ब्यूरोच्या वतीने सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी मंचावर चंद्रपूर महानगर पालिकेचे अपर आयुक्त भालचंद्र बेहरे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, मनपा चे मानव संसाधन अधिकारी बंडुपंत हिरवे, नगरसेवक ज्योती गेडाम, फिल्ड आउटरीच ब्यूरोचे अधिकारी बी. पी. रामटेके उपस्थित होते.
या व्याख्यानात बी.एस.मिरगे यांनी स्वच्छतेचे महत्व सांगून स्वच्छता आणि आरोग्याचा जवळचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वच्छतेविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील अध्यायांचा तसेच संत गाडगे महाराज यांच्या संदेशांचा उल्लेख केला. मनपाचे अपर आयुक्त भालचंद्र बेहरे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे महत्वाचे अभियान आहे. यात सर्व सरकारी आणि इतर संस्थांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश आम जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. यावेळी बंडोपंत हिरवे यांनीही संबोधित केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन बी.पी.रामटेके यांनी केले. तर संचालन अर्चना धुर्वे यांनी केले. फिल्ड आउटरीच ब्यूरोच्या वतीने 27 व 28 रोजी स्वच्छता व आरोग्य विषयावर रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि स्वच्छता रैली काढण्यात आली होती. स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. त्याआधी मूल येथील कलापथकाने स्वच्छतेचा संदेश दिला. कार्यक्रमाला राजेश मड़ावी, राजदीप राठोड यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment