Search This Blog

Monday 19 November 2018

बल्लारपूर ला रोजगार निर्मितीचे केंद्र बनवणार : ना.मुनगंटीवार


डायमंड कटिंग सेंटरमधील 100 उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर

चंद्रपूर दि.19 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. बल्लारपूर येथे वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या डायमंड कटिंग सेंटरमधील पहिल्या शंभर उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर देण्याचा सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी मोबाईलवरून संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्यात.
बल्लारपूर परिसराला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम बल्लारपूर शहरांमध्ये व आसपास सुरू होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील, अशा पद्धतीचे उपक्रम, उद्योग आणि प्रकल्प या भागात उभे होत आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे  शुभेच्छा संदेशांमध्ये त्यांनी सांगितले. मुंबई येथे अधिवेशन सुरू असताना बल्लारपूर येथील डायमंड कटिंग सेंटर मधील पहिल्या बॅचला निरोप देण्यासाठी वेळात वेळ काढून त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. 
वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या उपस्थितीत बल्लारपूर मध्ये हा सोहळा पार पाडला.  त्याच्याहस्ते यावेळी विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र व अपॉइंटमेंट ऑर्डर देण्यात आल्या. या सर्व मुलांना या प्रशिक्षणानंतर हमखास नोकरी मिळेल,अशी हमी देण्यात आली होती. चंदनसिंग चंदेल यांनी यावेळी विद्यार्थांना संबोधीत केले. पालकमंत्री महोदयांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला ठरवल्याप्रमाणे न्याय देता आल्याबद्दलचे समाधान व्यक्त केले. आज पहिल्या बॅचचा हातामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सोबतच नोकरीचे आदेश देता आले. हे या जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या दिला शब्द केला पूर्ण याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. 
11 फेब्रुवारी 2018 रोजी डायमंड कटिंग सेंटर सुरू करताना त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणासोबत नोकरीची हमी देत असल्याचे स्पष्ट केले होते. राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य  व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी एक हजार तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराची हमी देण्यात आली आहे. डायमंड कटिंग प्रोजेक्ट माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिऱ्यांना पैलू पाडणारा कौशल्ययुक्त मनुष्यबळाची निर्मिती बल्लारपूर सारख्या शहरांमध्ये केली जाणार आहे.
यावेळी बोलताना चंदेल यांनी स्पष्ट केले की बल्लारपूर शहराला हिऱ्यांना पैलू पाडणारे शहर म्हणून आगामी काळात ओळखले जाणार आहे. या संदर्भातील वेगवेगळे उद्योग व्यवसाय या शहरात कसे येतील या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी प्रशिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी तुमच्या हातात कौशल्य आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी ठेवा. ज्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला न्याय मिळेल अशा ठिकाणी नोकरी करण्यासाठी सिद्ध राहा. मेहनत करणाऱ्याला निश्चितच यश मिळते, असे स्पष्ट केले. पहिल्या बॅचच्या सर्वच्या सर्व मुलांना ठरवल्याप्रमाणे   प्रशिक्षण संपल्यानंतर त्या दिवशीच हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना एमडी जेम्स या कंपनीचे संचालक निलेश गुल्हाणे यांनी डायमंड इंडस्ट्रीमध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड वानवा असून जगाच्या पाठीवर हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या व्यक्तींना रोजगाराची मोठी संधी सर्वत्र उपलब्ध असल्याचे सांगितले. मुंबई, सूरत या शहरांमध्ये लक्षावधी लोकांना या प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र हा रोजगार हळूहळू बल्लारपूर सारख्या शहरांमध्येही वृद्धिंगत राहावा, असा आमचा प्रयत्न असून भविष्यात बल्लारपूरच्या डायमंड कटिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकाला याच ठिकाणी नोकरी मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व सोबतच ज्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली आहे. त्याठिकाणी सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचीही घोषणा केली. तसेच पहिल्या बॅचला त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील या कंपनीमार्फत प्रवासाची व्यवस्था केली.
या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी या प्रशिक्षणार्थांना नोकरी दिली जात आहे. त्या कंपनीचे मालक कार्तीक जेम्सचे संदिप इंगळे सुद्धा उपस्थित होते. मुलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची निर्मिती होत असून हिऱ्याच्या पैलू पाडणाऱ्या उद्योगाला लागणार्‍या मुबलक मनुष्यबळासाठी आता बल्लारपूर ची देखील ओळख होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर बल्लारपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष मिना चौधरी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी डॉ.विजय इंगोले, सभापती अरुण वाघमारे, नगरसेवक स्वामी रायबरम, वैशाली जोशी, रेणूका दुधे,  मनीष पांडे, राजू गुणगट्टी,  आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ सिंह यांनी केले. आभार प्रदर्शन हा प्रकल्प चालवणाऱ्या एम.डी. जेम्स संचालक निलेश गुल्हाने यांनी मानले.
0000

No comments:

Post a Comment