गोवर रुबेला लसीकरणाला जिल्हयात उत्साहात सुरुवात
चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खात्री आरोग्य यंत्रणेच्या तयारीवरुन व शिक्षण विभागाच्या पाठबळावरुन दिसून येते. प्रत्येक पालकांने आपले पाल्य निरोगी राहावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी होईल, याची मला खात्री असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज दूर्गापुर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडाम, नागपूर येथील कुटुंब कल्याण विभागाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ.मंगेश गुलवाडे, नागपूरचे डब्ल्युएचओचे डॉ.श्रीधर,डॉ.शैलेश बागला, डॉ.तरपचंद भंडारी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुर, डॉ.माधुरी मेश्राम, डॉ.अमित जयस्वाल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात आजपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या 22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43, 582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना 3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना महाराष्ट्राला गोवर रुबेला सारख्या घातक आजारापासून मुक्त्त करण्यासाठी आज राज्यभर या मोहिमेची सुरुवात होत आहे. यामध्ये चंद्रपूर मागे राहता कामा नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व यंत्रणा हातात हात घालून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक महिण्याची यंत्रणाची ही मेहनत असून यातून शंभर टक्के लसीकरण हेच उद्दिष्ट साध्य झाले पाहीजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वीस राज्यामध्ये ही मोहीम राबविली जात असून महाराष्ट्र यामध्ये शंभर टक्के लसीकरण करेल अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बालकांशी संवाद साधतांना त्यांनी तुम्ही लसीकरण केले. इंजेक्शन घेतले. ही माहिती आपल्या जवळच्या तीन मित्रांना देवून त्यांनी लसीकरण करुन घेण्याची प्रेरणा दयावी, असे आवाहन केले.
आजपासून सुरु झालेल्या या मोहिमेत संपूर्ण जिल्हयामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून शहरात महानगरपालिका तर जिल्हयामध्ये जिल्हा परिषद व ठिक ठिकाणच्या नगरपालिकांमार्फत कार्यवाही होणार आहे. यावेळी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक पापळकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन जनता विद्यालयाच्या शिक्षिका सुनीता पोटे यांनी केले. लसीकरणाला या विद्यालयातील चिमूकल्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment