विविध रस्ते व विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण
ना. अहीर, ना. मुनगंटीवार, यांनी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी
पुढाकार घ्यावा
दोन प्रभावी मंत्र्यांमुळे नागपूरप्रमाणेच चंद्रपूरचा झपाट्याने विकास
चंद्रपूर दि. ११ ऑक्टोबर : प्लास्टिक इंडस्ट्रीज शेत्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर येथे सुरू असणाऱ्या सिपेट या उपक्रमाच्या इमारतीचे भूमिपूजन तसेच ५ हजार ४४६ कोटींच्या रस्ते व विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण केंद्रीय महामार्ग निर्मिती मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी नागपूर प्रमाणेच चंद्रपूरमध्ये देखील ना मुनगंटीवार व ना. अहीर प्रभावीपणे कार्यरत आहेत.या दोन मंत्र्यांच्या इंजिनमुळे जिल्हयाची प्रगती होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
चंद्रपूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर प्लास्टिक इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ( सिपेट ) या केंद्रीय रसायन आणि पेट्रो रसायन मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या संस्थेच्या उद्घाटनासाठी तेथे आले होते. या सोबतच त्यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागातील ५ हजार ४४६ कोटीच्या विविध कामांचे देखील यावेळी ई -भूमिपूजन केले.
केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर नितीन गडकरी यांचा हा चंद्रपूर चा पहिला दौरा होता. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आ. नानाभाऊ शामकुळे, आ. कीर्तीकुमार भांगडीया,आ. राजू तोडसाम, आ. संजीव रेड्डी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, पेट्रोकेमिकल विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव, उपसचिव अर्पणा शर्मा, डॉ. एस. के. नायर, जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार, उपमहापौर अनिल फुलझेले,सभापती ब्रिजभूषण पाझारे ,माजी मंत्री अण्णासाहेब पारवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नागपूर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण स्वतः नागपूर आणि विदर्भाच्या विकासाबाबत आग्रही आहे .तसेच वातावरण चंद्रपूर जिल्ह्यात असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले .सिपेट सारखे इन्स्टिट्यूट आणण्यासाठी ना.अहिर यांनी प्रचंड प्रयत्न केले असून जिल्ह्यात एका नव्या युगाची सुरुवात त्यांनी या संस्थेच्या मार्फत केली. चंद्रपूरचा विकास करण्यात त्यांचा मोठा हात असून देशातील पहिल्या काही मोजक्या कर्तबगार खासदारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. ते अतिशय विनम्र, मितभाषी नेते असून त्यांची लोकप्रियता अफाट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे देखील लक्ष द्यावे, अशी सूचना केली.
या प्रकल्पा सोबतच त्यांनी यावेळी उपस्थित रसायने व खते मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोळसा खाणी व गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाढणाऱ्या धान्याच्या उत्पादनात माध्यमातून इथेनॉल निर्मिती प्रक्रियेला इथे मोठी संधी असल्याचे लक्षात आणून दिले. धानाच्या तनापासून इथेनॉल तयार करण्यासाठी बायो येथे नाव बायो प्लास्टिकचा प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आगामी काळात सुरू करावा लागेल. त्या करीता रसायने व खते मंत्रालयाने लक्ष वेधावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली. कोळशापासून ३५० प्रकारचे बायो पेट्रोलियम प्रॉडक्ट बनू शकतात.इथेनॉल निर्मिती करून इंधनापासून स्वयंपूर्ण भारत बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून केलेल्या कामाचा गौरव केला. चंद्रपूर व आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने वाघांची संख्या वाढण्यामध्ये वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वात प्रभावी वन मंत्री म्हणून त्यांनी काम केल्याचे सांगितले १४ कोटी वृक्ष लागवड यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गेले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जनता वन्यप्रेमी हे सुधीर मुनगंटीवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलतांना आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी या जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी ऑटोमोबाईल व स्टील उद्योग चंद्रपूर मध्ये सुरु करण्यासाठी ना. गडकरी यांनी मदत करावी असे आवIहन केले.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नितीन गडकरी यांचे कर्तुत्व आपल्यासाठी एव्हरेस्टच्या उंची सारखे मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्ह्यामध्ये आम्ही विकास करीत असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामाच्या झंझावाताने नागपूर रोज बदलत आहे. त्याच धरतीवर चंद्रपूर देखील बदलविण्याची आमची धडपड असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्हयाकडे विकास कामांसाठी आशीर्वाद असू द्यावे असे आवाहनही केले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज त्यांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात सर्वांनी केलेल्या स्वागता बद्दल सर्व प्रथम आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासावर भर दिली आहे .मेक इन इंडियाला बळकटी देण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तरुणांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे, असेआवाहन केले आहे. त्या आवाहनाला अनुसरूनच चंद्रपूरमध्ये सिपेट या प्लास्टिक इंडस्ट्री संबंधित असणाऱ्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर येथे हे कॉलेज असून दरवर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ना.गडकरी यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
आज भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आलेली कामे
१. नागिन ब्रह्मपुरी आरमोरी मार्गाचे दुपदरीकरण ( २६९ .५ कोटी )
२. मालेवाडा चीबूत मार्गाचे दुपदरीकरण( २३१.११ कोटी ) ,चिमूर वरोरा मार्गाचे दुपदरीकरण ( ३६०.३८ कोटी ) गडचिरोली मुल मार्गाचे दुपदरीकरण ( ४८४.१५ कोटी) मुल चंद्रपुर मार्गाचे दुपदरीकरण ( ११० कोटी ) बामणी नवेगाव मार्गाचे दुपदरीकरण ( १६३.६० कोटी )
( एकूण किंमत १६१८.३१ )
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील कामे
बामणी -राजुरा -देवाळा - वरुड -लक्कडकोट - तेलंगाना राज्य सीमा मार्गाचे चौपदरीकरण, तेलंगाना राज्य सीमा- कोरपना - गडचांदूर - राजुरा मार्गाचे चौपदरीकरण ,वरोरा -वनी मार्गाचे चौपदरीकरण ( एकूण रक्कम २६३१.२५ कोटी )
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात आलेली कामे
आक्सापूर -पोंभुर्णा जाणाळा मार्गाचे दुरुस्त करणे चंद्रपूर मुल गडचिरोली मार्गाचे दुरुस्ती करणे, राजुरा लक्कडकोट वडकी मार्गाचे दुरुस्तीकरण, राजुरा गडचांदूर आदिलाबाद मार्गाचे दुरुस्ती करणे, जाम वरोरा चंद्रपूर बल्लारपूर राजुरा असिफाबाद राज्य सीमा मार्गाची दुरुस्ती करणे, ताडाळी साखरवाडी ते घुगुस रस्त्याचे दुपदरीकरण कॉंक्रिटीकरण करणे, तालुका चिमूर येथील किताडी डोमा नवतला मोटेगाव रोड दुरुस्ती करणे, नेरी शिरपूर सोनापूर गोविंदपूर तलोडी मेंडकी, गांगलवाडी रोडचे दुरुस्ती करणे, तालुका राजुरा मधील चुनाला चानखा धानोरा अन्नूर अंटारगाव स्टेट बोर्डरची दुरुस्ती करणे, तालुका भद्रावती मधील कोकेवाडा चंदनखेडा भद्रावती रस्त्याचे पुलाच्या बांधकामास रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, चंदनखेडा ते भद्रावती मार्गाचे रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मूल चिंचाळा भेजगाव पिपरीदीक्षित थेरगाव मार्गावरील उमा नदीवरील पुलाचे बांधकाम, मुधोली -घटकुल मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा तेलवासा रस्त्यावरील वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम, मूल चामोर्शी रोडवरील उमा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम ( एकूण किंमत २९५.७६ कोटी )
सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कामे
चिमूर कांम्पा मार्गाचे दुपदरीकरण, हिंगणघाट - नंदुरी - कोरा -खडसंगी- चीमुर- नेरी - पेंढरी -सिंदेवाही - मूल मार्गाचे दुपदरीकरण, वणी ते घुगुस आरओबी, वणी ते वरोरा आरओबी ( एकूण किंमत ८१० कोटी )
०००००
No comments:
Post a Comment