Search This Blog

Friday, 28 December 2018

चंद्रपूरातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4.50 लक्ष रू. किंमतीत घरे उपलब्‍ध होणार



ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे
अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार
 चंद्रपूर, दि.28 डिसेंबर - चंद्रपूरातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला असून राज्‍य सरकारच्‍या गृहनिर्माण विभागाने दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी म्‍हाडा ला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्‍याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने ऑटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्‍वास आल्‍यामुळे महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनतर्फे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे.
            चंद्रपूर जिल्‍हयातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या ऑटोरिक्षा चालकांच्‍या मागणीचा अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात 20 नोव्‍हेंबर 2018 रोजी त्‍यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्‍हाडा कॉलनीतील घरे 4.50 लाखापर्यंत उपलब्‍ध करून देण्‍याचे निर्देश त्‍यांनी या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्‍या अधिका-यांना दिले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नविन चंद्रपूर येथील आरक्षण क्रमांक 79 व 80 मौजा कोसारा येथे ऑटोरिक्षा चालकांकरिता नागपूर मंडळातर्फे प्रस्‍तावित घरकुल योजनेबाबत शासनाला  सादर  केलेल्‍या प्रस्‍तावामध्‍ये सदर सदनीकांची किंमत रूपये 7,56,000/- प्रती सदनिका अशी दर्शविण्‍यात आली असून सदर किंमत रूपये 4.50 लक्ष इतकी करण्‍यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा चालकांनी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍याकडे सातत्‍याने रेटली होती. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सदर मागणी पुर्णत्‍वास आली असून आता ऑटोरिक्षा चालकांना सदर घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्‍ध होणार आहेत.
           सदर मागणी पूर्णत्‍वास आल्‍याबद्दल महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष बळीराम शिंदे, उपाध्‍यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, जहीर शेख, जाकीर शेख, रविंद्र आंबटकर,विनोद चन्‍ने, राजू मोहुर्ले, रमेश मुन, अनिल मिसाळ, हरीभाऊ नागपूरे, दिलीप कलोडे, प्रशांत वानखेडे, विलास बावणे, किरण मस्‍कावार, किशोर राजबोईनवार, मारोती दानव, महादेव करंबे, तुळशिराम वालकोंडावार, सुरेश क्षिरसागर, परमेश्‍वर सरकार, सचिन बगड, राजेश तिराणकर, सतिश गोरघाटे, रामचंद्र गुंजेकर, सुनिल पाटील, मंगेश चवरे, खुशाल आंबटकर, रमेश गोमासे, दिलीप ढवळे, विलास जुमडे, परशुराम तुराळे आदींनी अर्थमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे.   0000000

चंद्रपूरात लॉयन्स एक्सो मेळाव्याचे ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन


खरेदी, विक्री, मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रम

चंद्रपूर दि.27 डिसेंबर : चंद्रपूर महानगरातील उद्योजक, व्यवसायिक व सामान्य नागरिकांच्या आवश्यकता लक्षात घेऊन लायन्स एक्सपो मेळाव्याचे आयोजन चांदा क्लब मैदानावर करण्यात आले आहे. या  मेळाव्याचे उद्घाटन वित्त,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केले.
लघु उद्योजक, उद्योजक व व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना मिळावी, तसेच विविधांगी सामाजिक उपक्रमाचे समाज प्रबोधन व्हावे, यासाठी लायन्स क्लब मार्फत लायन्स एक्सपो मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी रात्री केले. यावेळी विविध शाळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी या ठिकाणी लावलेल्या विविध स्टॉलला भेटी दिल्या. लायन्स क्लबने एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात चंद्रपूर शहरात केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे,लायन्स क्लबचे विलास मुळे, शैलेश बागेला, अनुराधा बागेला, पल्लवी भास्करवार, प्रकाश कोटेकर, घनश्याम सिंग दरबार, आदींसह लॉयन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
                                                            000

ईव्हीएम मशीन बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर मोहीम राबविणार : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार


सामान्य मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.27 डिसेंबर - लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असून आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत कोणत्याही सामान्य मतदारांमध्ये शंका राहू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. चंद्रपूर येथील नियोजन भवनात आयोजित एक दिवसाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले
        या प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये समाज माध्यमांचा योग्य वापर करून ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व अफवा पसरविणाऱ्या पासून सतर्क करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रात्यक्षिक कालावधीचा व्हिडिओ तयार करण्यात येऊन त्यावर वेळ टाकण्यात यावी, असे सर्वांना निर्देश देण्यात आले.
         ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिकाचा गावनिहाय व मतदान केंद्र निहाय वेळापत्रक तयार करण्यात यावेत, यासाठी प्रशिक्षित टीम तयार करण्यात यावी, नागरिकांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक उघड्यावर देण्यात येऊ नये, शाळा व शासकीय कार्यालयांमध्येच देण्यात यावे, ईव्हीएम व्हिव्हीपॅट का वापरला जातो याची सविस्तर माहिती प्रत्येकाला देण्यात यावी, ज्‍या गावात प्रात्यक्षिक करुन दाखविल्या जाणार आहेत. त्या गावचे ग्रामसेवक, तलाठी, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, सरपंच  इत्यादींनी यावेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्या.
       प्रात्यक्षिकांसाठी पाठविण्यात येणारी ईव्हीएम मशीन तहसीलदार यांनी स्वतः हाताळून बघितल्यानंतरच पुढे पाठविण्यात यावी, कोणत्या व्यक्तीला ईव्हीएम देण्यात येणार आहेत याची नियुक्ती आदेश काढण्यात यावे,  गावांना भेटी देण्यासाठी नोंदवही तयार करून त्यामध्ये रोजच्या रोज नोंदी करण्यात याव्यात, ईव्हीएम मशीन बाहेर कुठेही न ठेवता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात यावी.
 ज्या गावात मतदान केंद्र आहे, अशा गावात जाण्यासाठी रस्ते व विद्युत नसेल त्या गावांची यादी तयार करून तसे कळविण्यात यावे. प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रशिक्षणासंबंधी पोस्टर, बॅनर लावण्यात यावे. तसेच या प्रात्यक्षिकासंबंधीची माहिती पोस्टर, बॅनर, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील, उपविभागीय कार्यालये व इतर शासकीय कार्यालयांमध्ये देखील लावण्यात यावे. प्रत्येक गावात प्रात्यक्षिक घेण्यात यावे, त्यामध्ये कोणतेही मतदान केंद्र सुटू नये याची काळजी घेण्यात यावी, अशा वेगवेगळ्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सदर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले नाही अशा प्रकारची तक्रार येवू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
      या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्यासह सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस.जी.समर्थ, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.
                                                          0000

Wednesday, 26 December 2018

बल्लारपूर - मूल मतदार संघातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भक्कमपणे पाठिशी : ना.सुधीर मुनगंटीवार



मतदार संघात कोट्यवधीच्या रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

चंद्रपूर, दि.26 डिसेंबर - समूह शेती,गट शेती, सिंचन क्षमता वृद्धी, दुभत्या जनावरांची उपलब्धता, आधुनिक शेतीचे प्रशिक्षण व जोडधंदा, रोजगाराच्या संधीमार्फत बल्लारपूर -मूल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची आहे. त्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, त्यासाठी शेतकरी बांधवांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्हयातील सुशी येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या अभीवचनाची पूर्तता आपल्या मतदारसंघात सर्वात आधी केल्या जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा व सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा आज सुशी येथे आयोजित जाहीर सभेत केली. केळझर-सुशी, सुशी-मानकापूर, डाबगाव-सुशी, चिचाळा-चिरोली आदी रस्ते, पुलांचे बांधकाम,रस्त्यांचे रुंदीकरण,डांबरीकरण, मुरुम अस्थरीकरण, खडीकरण, रस्ता दिशा दर्शक फलक लावणे आदी कामांचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या सर्व कामांचा भूमिपूजनाकरिता सुशी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने याठिकाणी सभेला उपस्थित होते.
          मुल परिसरामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये 125 कोटी खर्च करून 104 किलोमीटरचे रस्ते निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच या परिसरातील शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चिरोली मध्ये बंधारा होत आहे. चिचडोहमध्ये 500 कोटी खर्च केलेला प्रकल्प पूर्ण होत आहे. मूल परिसरातील 5 हजार शेतकऱ्यांना एकत्रित समूह शेतीचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. 91 गावांमध्ये मोठया प्रमाणात विकल्या जाते ते वाण पिकवायला शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. पोंभूर्णा मध्ये जोडधंदा म्हणून टूथपिकचा प्रकल्प उभा केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात जे. के. ट्रस्ट सोबत करार करण्यात आला असून या माध्यमातून मुल परिसरातील भाकड जनावरांवर उपचार करण्यात येवून दुधाचे उत्पन्न वाढविण्यात येणार आहे. या परिसरात सर्व छोटे-मोठे प्रकल्प आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील यासाठी प्रयत्न सुरू असून बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. त्या माध्यमातून सिंचन क्षमता वृद्धीला भर दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणी या मतदारसंघामध्ये होईल, याबाबत आपण जागरूक असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी बल्लारपूर मतदारसंघ धुरापासून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेतून गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात  येत असल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना 10 लक्ष किंमतीचा शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या आरो मशीनची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघातील सर्व अंगणवाडी आयएसओमार्क असतील व देशातील सर्वात सुंदर असे प्रत्येक अंगणवाडीचे स्वरूप असेल, असे सांगितले.
          माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी देखील यावेळी संबोधित केले वाघाच्या हल्ल्यापासून, संरक्षणापासून तर सिंचनाच्या उपलब्धतेपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबत अतिशय जागरूकतेने नामदार मुनगंटीवार यांचे मार्गक्रमण सुरू असून रस्ते, शाळा, आरोग्य, पेजल, सिंचन या बाबतीत प्रत्येक योजना मतदारसंघात कशी सक्षमतेने राबविली जाईल याबाबत त्यांचा आग्रह असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी केले. त्यांनी गेल्या चार वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या मतदारसंघात करण्यात आलेल्या कामाचा आढावा सादर केला.
          कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती पूजाताई डोहने, मुल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू भाऊ रणदिवे, पंचायत समिती सदस्य वर्षाताई लोनबले, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वी अवताडे,राहुल संतोषवार, सुशी गावच्या सरपंच कमलाबाई गोरंतवार, सुनील आयलनवार, विवेक बुरांडे, सिताराम भांडेकर, अजय शेंडे, कल्पना सोयाम, शोभा मांदाडे, प्रियंका कुनघाडकर, भारती राऊत , उपअभियंता श्री.वसुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद सदस्य पृथ्वी अवताडे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक बुरांडे यांनी केले.
                                                                        000

Monday, 24 December 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना स्वतःच्या हक्काची घरे देणार: ना.सुधीर मुनगंटीवार




ना. हंसराज अहिर, ना.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत
हजारो कामगारांसाठी योजनांचा लाभ वाटप सोहळा
चंद्रपूरमध्ये कामगारांसाठी वेटींग शेड उभारणार, टोल फ्री क्रमांक सुरू करणार

चंद्रपूर दि 24 डिसेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्याची घोषणा केली आहे. लोकांना आपल्या मेहनतीने हक्काची घरे बांधून देणारे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या योजनेतून मिळणारी अडीच लाखाची सबसिडी तसेच राज्य शासनाच्या योजनेतून बांधकाम कर्मचाऱ्यांना हक्काच्या घरासाठी दोन लाखाचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे  प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे स्वतःच्या हक्काचे घर साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल,अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.
        चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘ सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा ‘ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 28 विविध कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये बांधकाम कामगारांना विविध योजना अंतर्गत साहित्य वाटप, धनादेश वाटप व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
           महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, स्वागताध्यक्ष कामगार उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील,इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आ.नानाभाऊ शामकुळे, आ. संजय धोटे, कामगार आयुक्त राजीव जाधव, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चू. श्रीरंगम,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार, मंडळाचे सदस्य श्रीपाद कुटासकर, अशोक घुवाड, शशांक साठे, राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कामगार उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांच्या नेतृत्वात बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी गेल्या चार वर्षात झालेल्या नेत्रदीपक कामगिरीचा उल्लेख केला. ते म्हणाले निलंगेकर यांच्या नेतृत्वात बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या नोंदणीमध्ये चंद्रपूर जिल्हा मागे राहणार नाही.
            दुसऱ्यांसाठी घरे बांधणारे बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे 2022 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये हजारो कामगारांना स्वतःच्या हक्काचे घर मिळेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. बांधकाम कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थायी स्वरूपाची योजना तयार केली जाईल. बांधकाम कामगारांच्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यात येईल. त्यासाठी  'हॅलो कामगार ' ही पालकमंत्री - कामगार हेल्पलाइन सुद्धा सुरू करण्यात येईल. यावर फक्त एका फोनच्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांची सोडवणूक होईल. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार उभे राहतात, त्यांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देण्यासाठी ‘ वेटिंग शेड ’ सुद्धा उभारण्यात येईल ,असे त्यांनी सांगितले.
                यावेळी वाटप करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तुमच्या कुटुंबात तुमची कोणीतरी वाट बघत आहेत, ही भावना डोक्यात ठेवून कामगारांनी कामाच्या ठिकाणी काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 85 रुपयांमध्ये नोंदणी केल्यानंतर 5 हजार तुमच्या खात्यामध्ये जमा करणारे हे सरकार असून राष्ट्रभक्त कामगारांच्या आरोग्याची देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कामगारांची नोंदणी करताना आपला कोणता सहकारी नोंदणीपासून वंचित तर नाही ना याची काळजी उपस्थित कामगारांनी घ्यावी ,असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणात शेवटी केले.
          स्वागत अध्यक्ष संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याचा जो संदेश दिला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी बसलेल्या कोणत्याही बांधकाम कामगाराचा मुलगा यापुढे बांधकाम कामगार होता कामा नये, यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अनेक योजना राबविण्यात येत आहे. हक्काची घरे मिळणार आहे. त्याशिवाय आरोग्यासाठी सुद्धा नोंदणी केल्यानंतर थेट लाभ मिळणार आहे. अपघातग्रस्त कामगारांना सुद्धा मदतीचा हात दिला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या नोंदणी अभियानांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी  होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
             या योजनेसाठी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मदतीचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. बांधकाम कर्मचाऱ्यांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीबाबत ते आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोंदणीसंदर्भात मोठ्या प्रमाणात कार्य  सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी उपस्थित कामगारांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संबोधित करताना शुभेच्छा व्यक्त केल्या. 90 दिवस काम करणाऱ्या कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे, हे लक्षात घेऊन नोंदणीबाबत अतिशय जागरुकतेने काम करण्याचे त्यांनी सुचविले.  राज्य शासनाची कामगारांबाबतची  ही महत्त्वाची योजना असून या योजनेचा लाभ घेण्याबाबतही त्यांनी आवाहन केले.
              मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्ताविक करताना बांधकाम कामगारांच्या नोंदणीची आवश्यकता ती नोंदणी करण्याकरिता मंडळाने सुरू केलेली सोपी पद्धत याबाबतची माहिती दिली. कुठे नोंदणी करायची ? कोणामार्फत करायची ? याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित हजारो कामगारांना मार्गदर्शन केले.
       जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भारतीय घटनेने जगण्याचा अधिकार दिला नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. अटल सन्मान योजनेतून 28 विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील कामगारांनी घ्यावा,असे आवाहन केले. नोंदणीसाठी मदत करणाऱ्या सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा ही त्यांनी आभार व्यक्त केले. 
         मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांनी 2007 मध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये 2014 पर्यंत 2 लाख 50  असणारी संख्या 2018 मध्ये 12 लाख 50 हजार करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. आतापर्यंत 333 कोटी रुपयांचे वाटप बांधकाम कामगारांच्या योजनांवर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
       या कार्यक्रमाचे संचालन डॉ. महेश तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, निरीक्षक निरीक्षक शादीर कुरेशी यांच्यासह कामगार कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत. यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप करण्यात आले.
0000