ना. हंसराज अहिर, ना.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत
हजारो कामगारांसाठी योजनांचा लाभ वाटप सोहळा
चंद्रपूरमध्ये कामगारांसाठी वेटींग शेड उभारणार, टोल फ्री क्रमांक सुरू करणार
चंद्रपूर दि 24 डिसेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्याची घोषणा केली आहे. लोकांना आपल्या मेहनतीने हक्काची घरे बांधून देणारे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या योजनेतून मिळणारी अडीच लाखाची सबसिडी तसेच राज्य शासनाच्या योजनेतून बांधकाम कर्मचाऱ्यांना हक्काच्या घरासाठी दोन लाखाचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे स्वतःच्या हक्काचे घर साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल,अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.
चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘ सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा ‘ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 28 विविध कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये बांधकाम कामगारांना विविध योजना अंतर्गत साहित्य वाटप, धनादेश वाटप व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, स्वागताध्यक्ष कामगार उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील,इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आ.नानाभाऊ शामकुळे, आ. संजय धोटे, कामगार आयुक्त राजीव जाधव, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चू. श्रीरंगम,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार, मंडळाचे सदस्य श्रीपाद कुटासकर, अशोक घुवाड, शशांक साठे, राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कामगार उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांच्या नेतृत्वात बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी गेल्या चार वर्षात झालेल्या नेत्रदीपक कामगिरीचा उल्लेख केला. ते म्हणाले निलंगेकर यांच्या नेतृत्वात बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या नोंदणीमध्ये चंद्रपूर जिल्हा मागे राहणार नाही.
दुसऱ्यांसाठी घरे बांधणारे बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे 2022 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये हजारो कामगारांना स्वतःच्या हक्काचे घर मिळेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. बांधकाम कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थायी स्वरूपाची योजना तयार केली जाईल. बांधकाम कामगारांच्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यात येईल. त्यासाठी 'हॅलो कामगार ' ही पालकमंत्री - कामगार हेल्पलाइन सुद्धा सुरू करण्यात येईल. यावर फक्त एका फोनच्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांची सोडवणूक होईल. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार उभे राहतात, त्यांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देण्यासाठी ‘ वेटिंग शेड ’ सुद्धा उभारण्यात येईल ,असे त्यांनी सांगितले.
यावेळी वाटप करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तुमच्या कुटुंबात तुमची कोणीतरी वाट बघत आहेत, ही भावना डोक्यात ठेवून कामगारांनी कामाच्या ठिकाणी काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 85 रुपयांमध्ये नोंदणी केल्यानंतर 5 हजार तुमच्या खात्यामध्ये जमा करणारे हे सरकार असून राष्ट्रभक्त कामगारांच्या आरोग्याची देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कामगारांची नोंदणी करताना आपला कोणता सहकारी नोंदणीपासून वंचित तर नाही ना याची काळजी उपस्थित कामगारांनी घ्यावी ,असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणात शेवटी केले.
स्वागत अध्यक्ष संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याचा जो संदेश दिला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी बसलेल्या कोणत्याही बांधकाम कामगाराचा मुलगा यापुढे बांधकाम कामगार होता कामा नये, यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अनेक योजना राबविण्यात येत आहे. हक्काची घरे मिळणार आहे. त्याशिवाय आरोग्यासाठी सुद्धा नोंदणी केल्यानंतर थेट लाभ मिळणार आहे. अपघातग्रस्त कामगारांना सुद्धा मदतीचा हात दिला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या नोंदणी अभियानांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या योजनेसाठी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मदतीचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. बांधकाम कर्मचाऱ्यांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीबाबत ते आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोंदणीसंदर्भात मोठ्या प्रमाणात कार्य सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी उपस्थित कामगारांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संबोधित करताना शुभेच्छा व्यक्त केल्या. 90 दिवस काम करणाऱ्या कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे, हे लक्षात घेऊन नोंदणीबाबत अतिशय जागरुकतेने काम करण्याचे त्यांनी सुचविले. राज्य शासनाची कामगारांबाबतची ही महत्त्वाची योजना असून या योजनेचा लाभ घेण्याबाबतही त्यांनी आवाहन केले.
मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्ताविक करताना बांधकाम कामगारांच्या नोंदणीची आवश्यकता ती नोंदणी करण्याकरिता मंडळाने सुरू केलेली सोपी पद्धत याबाबतची माहिती दिली. कुठे नोंदणी करायची ? कोणामार्फत करायची ? याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित हजारो कामगारांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भारतीय घटनेने जगण्याचा अधिकार दिला नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. अटल सन्मान योजनेतून 28 विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील कामगारांनी घ्यावा,असे आवाहन केले. नोंदणीसाठी मदत करणाऱ्या सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा ही त्यांनी आभार व्यक्त केले.
मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांनी 2007 मध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये 2014 पर्यंत 2 लाख 50 असणारी संख्या 2018 मध्ये 12 लाख 50 हजार करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. आतापर्यंत 333 कोटी रुपयांचे वाटप बांधकाम कामगारांच्या योजनांवर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. महेश तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, निरीक्षक निरीक्षक शादीर कुरेशी यांच्यासह कामगार कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत. यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment