निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी मृदा परिक्षण काळाजी गरज : अर्चना जिवतोडे
चंद्रपूर, दि.5 डिसेंबर- गेल्या अनेक वर्षांपासून जमिनी मध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर, यामुळे जमिनीची पोत कमी होत आहे. त्याचा परिणाम पिकावर होत असून रासायनिक शेतीमुळे गंभीर आजाराला समाज पुढे जात आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जमिनीची आरोग्य तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीची पत अर्थात मृदा चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जिवतोडे यांनी आज केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कृषी विभाग यांनी एकत्रित येत जिल्हाभरातील तज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकऱ्यांचे जागतिक मृदा दिनी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, आत्मा कार्यालय व जिल्ह्यात सर्व पातळीवर कृषी विभागाच्या अन्य विभागांमार्फत एकत्रित करण्यात आले होते. आजच जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी तालुकास्तरावर व काही ठिकाणी गावांमध्ये देखील जागतिक मृदा दिन जिल्हाभर साजरा करण्यात आला.
कृषिभूषण शेतकरी श्री.गुंडावार यांच्या सन्माननीय उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषी सभापती अर्चना जिवतोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर उदय पाटील, आनंदवन कृषी महाविद्यालय वरोरा येथील प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, उपविभागीय कृषी अधिकारी दत्ताजी काळे, प्रकल्प उपसंचालक रविंद्र मनोहरे, चंद्रपूर पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यामध्ये राज्य शासनातर्फे मृदा तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणेची माहिती दिली. सभापती अर्चना जीवतोडे यांनी नापिकीच्या काळामध्ये जमिनीची पोत सुधारण्यासाठी मृदा तपासणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. सुहास पोतदार यांनी मृदा तपासणी मुळे होणारे शेतकऱ्यांना जे फायदे आहेत, त्याबद्दलची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी यासाठी का पुढाकार घ्यावा याबाबतही मार्गदर्शन केले.
उपविभागीय कृषी अधिकारी दत्ताजी काळे यांनी यावेळी संबोधित करताना सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला. मातीमध्ये हवा, पाणी यांचे कशा पद्धतीचे मिश्रण असले पाहिजे आणि मातीची पत कशा पद्धतीने वाढवली जाऊ शकते, याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य उपलब्ध असून या साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळामध्ये अतिशय जागरूकतेने शेती करणे गरजेचे असून वातावरणापासून तर जमिनीच्या पत क्षमतेबाबतचा अभ्यास असणे उत्कृष्ट उत्पादनासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी देखील यावेळी शेतकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, शेती हा विषय आता प्रयोगाचा, अभ्यासाचा झाला आहे. त्यामुळे या विषयाकडे त्याच दृष्टीने अतिशय गंभीरतेने बघणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात जागतिक मृदा दिनी आपण मृदा तपासणीसाठी पुढाकार घेऊन करावी, असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना यावेळी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड यांनी केले.
No comments:
Post a Comment