समाज कल्याण विभाग तर्फे दिव्यांगांना वैयक्तिक साहित्याचे वाटप
चंद्रपूर, दि.5 डिसेंबर : समाजामध्ये जेही दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांची मदत ही सामाजिक भावनेतून झाली पाहिजे, या मदतीमध्ये कृतज्ञता, विनम्रता आणि मदतीची सामाजिक भावना असावी, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार अतिशय चांगल्या सोहळयाचे आयोजन केल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
बल्लारपूर येथे आयोजित दिव्यांग व्यक्तीच्या साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. 3 डिसेंबर 2018 ला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नगर परिषद, बचत भवन, बल्लारपूर येथे दिव्यागांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
त्यामध्ये 47 तीन चाकी सायकल, 2 पांढरी अंधकाठी, 15 व्हिलचेअर, 12 साधी काठी, 14 कुबड्या, 22 श्रवणयंत्र, 8 एम.आर.किट, 2 रोलेटर अशा एकुण 122 दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर करिता जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर येथील चव्हाण व बँक ऑफ इंडियाचे घरोटे यांनी दिव्यांगांकरिता प्रशिक्षण व बँक लोन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तीबद्दल बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक योजनामध्ये दिव्यांगाचा समावेश केला जात आहे. समाजातील एका घटकाबद्दल व्यक्त होणारा हा सन्मान आहे.
सदर कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीचंद्रकांत वाघमारे, नगर परिषद उपाध्यक्ष श्रीमती चौधरी, सभापती येल्लयादास सराफ, यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे संचालन गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी सुनिल जाधव यांनी केले. कार्यक्रमाकरिता इतर मान्यवर तसेच दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दिनांक 3 डिसेंबर 2018 ला दिव्यांग क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रम जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे घेण्यात आले. सदर कार्यक्रमास मान्यवर व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
याच स्वरूपाचा कार्यक्रम दिव्यांगांकरिता मार्गदर्शन शिबीर व उर्वरीत दिव्यांगांकरिता साहित्य वाटप दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता चांदा क्लब ग्राऊंन्ड, चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर, सुनिल जाधव यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment