वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटनेच्या
राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे उदघाटन
चंद्रपूर दि. 23 डिसेंबर: महाराष्ट्राच्या हरीत सेनेत 54 लाखाच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मीतीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकतेच स्कॉच या संस्थेच्या माध्यमातुन सन्मानीत करण्यात आले आहे. आसामनंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिक चे उत्पादन होणार आहे. वृक्षलागवड मोहीमेमध्ये सुध्दा महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. असे प्रत्येक आघाडयांवर महाराष्ट्राचा वनविभाग अग्रेसर ठरला असून वनमंत्री म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. वनकर्मचारी व अधिका-यांच्या परीश्रमांचे हे फलीत असल्याचे कौतुकोदगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
दिनांक 23 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी नाटयगृहात आयोजित वनकर्मचा-यांच्या 4 थ्या राज्यस्तरीय अधिवेशनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर पदमश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ. मंदाकिनी आमटे, महापौर अंजली घोटेकर, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिलजी अडगुरें, सरचिटणीस संतोष अतकरे, राजा आकाश आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या अधिवेशनाचे उदघाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनकर्मचारी संघटनेच्या वतीने प्रकाशित दिनदर्शीकेचे विमोचन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, वनांचे संवर्धन व संरक्षण तसेच वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे. हे कार्य वनकर्मचारी नेटाने व परिश्रमपूर्वक करीत आहेत. महाराष्ट्र वृक्ष लागवडीच्या क्षेत्रात अग्रणी ठरला आहे. याचे श्रेय सर्वस्वी वनकर्मचा-यांच्या परिश्रमाला जाते. वनकर्मचा-यांच्या चेह-यावर आनंद फुलावा यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. काल कराड मध्ये वनकर्मचा-यांसाठी क्वॉर्टरचे उदघाटन आपण केले. वनकर्मचा-यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तसेच डॉ. प्रकाश आमटे यांच्या संस्थेला मदत निधी देवून आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. संघटनेच्या वतीने ज्या मागण्या आज निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजार रूपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपुर्द केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी वनकर्मचारी संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे कार्य इतर शासकीय कर्मचारी संघटनांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगीतले. वन व सामाजिक वनीकरण कार्यालय कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचा-यांच्या मागण्यांचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. कार्यक्रमाला राज्यातील वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचा-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment