फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेचे आयोजन
चंद्रपूर, दि.20 डिसेंबर – कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान करणा-या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतक-यांनी फरदड कापूस न घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवन येथे आयोजित फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत व्यक्त केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील किटकशास्त्रज्ञ प्रा.प्रवीण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक ए.व्ही.भालेराव, सांख्यिकी अधिकारी राज वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी फरदड कापूस मुक्त गाव अभियान योजनेमध्ये महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच या मोहिमेचे स्वरुप व्यापक करण्यासाठी ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांना सुध्दा अवगत करुन त्यांना या मोहिमेत सहभागी करुन अधिकाधिक या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि शेतक-यांना योग्य ते माहिती दयावी, असेही त्यांनी सांगितले.
शेंदरी बोंडअळीचा मागील वर्षी मोठया प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आला होता. त्यावर सर्व स्तरावरुन चांगले प्रयत्न करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांनी सुध्दा चांगला प्रतिसाद दिल्याने यावर्षी या अळीचा प्रादूर्भाव नगण्य दिसून आला आहे. याशिवाय पीक कापणी प्रयोगाचे महत्व, त्यातील आवश्यक काटेकोरपणा याबाबत जिल्हाधिकारी यांनी विशेष सुचना दिल्या. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 मध्ये गावस्तरावरील शेतक-यांना विमा काढण्यासाठी जाणीव जागृती करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच पीक काढणीनंतर कपाशीच्या प-हयाटया व व्यवस्थित न घडलेली क्रीडग्रस्त बोंडे व पाला पाचोडा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्थेत असलेली अळी नष्ट होईल. जिनींग, प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. डिसेंबर महिन्यानंतर शेत 5 ते 6 महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. तसेच कपाशीच्या पराठयामध्ये सुप्त अवस्थेत बोंडअळी राहत असल्याने त्यांची गंजी करुन बांधावर ठेवू नये, त्या पीकाचा चुरा करण्यासाठी श्रेडर यंत्राचा वापर करावा, असे डॉ.उदय पाटील यांनी सांगितले. शेतक-यांनी श्रेडर यंत्राच्या अनुदानासाठी 15 जानेवारी 2019 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी या कार्यशाळेत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या हस्ते फरदड कापूस मुक्त गांव अभियान विषयावरील भिंतीपत्रक व पत्रकांचे अनावरण करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment