चंद्रपूर दि.1 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आधुनिक बाग-बगीचे उभे राहावेत यासाठी प्रयत्नरत असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज चिमूर,सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्कसाठी निधी मंजूर केला आहे. चंद्रपूर, मुल, पोंभूर्णा आधी तालुक्यांच्या ठिकाणानंतर आता या तीन तालुक्यात अत्याधुनिक इको पार्क उभा राहणार आहे.
चंद्रपूर महानगर,चंद्रपूर शहर, मुल नगरपालिका, पोंभूर्णा नगरपंचायत येथे अत्याधुनिक बाग बगीचा निर्माण करण्याच्या संकल्पाला पूर्ण केल्यानंतर आता या तीन तालुक्याच्या ठिकाणी इको पार्क तयार करण्याच्या कामाला आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अन्य मोठ्या शहरांप्रमाणे अत्याधुनिक इको पार्कची सुविधा मिळावी, यासाठी त्यांनी हा निधी उपलब्ध केला आहे.
ब्रह्मपुरी व मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडून या संदर्भात मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अंतर्गतही मोठ्या प्रमाणात छोटे-छोटे इको पार्क निर्माण केले आहे. याशिवाय चंद्रपूर महानगराच्या सीमावर्ती भागात बल्लारपूर रोडवर देखील ए.पी.जे.अब्दुल कलाम पार्क मोठ्या दिमाखात उभे झाले आहे. शहरासाठी हा पार्क एक मोठी ओळख झाली आहे. मूल येथील पार्क देखील नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे. तर पोभुर्णा सारख्या छोट्या ठिकाणी देखील इको पार्कला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्व तालुक्याच्या ठिकाणी इको पार्क उभारण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहेत.
बल्लारपूर जवळ तर राष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे. आगरझरी जवळील बटरफ्लॉय गार्डन ताडोबा येथील पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. पर्यावरणाला जपतानाच नागरिकांच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा गावामध्ये शहिदांचे स्मारक बनवताना सुद्धा त्याला इको पार्कचे स्वरूप यापूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आणले गेले. मोकळ्या जागांमध्ये लहान मुले यांना खेळण्याची जागा, तरुणांना व्यायाम शाळा ( ओपन जीम ) तर ज्येष्ठ नागरिकांना सायंकाळचा वेळ घालवता यावा यासाठीची उत्तम बैठक व्यवस्था अशी प्रत्येक बगिच्याची रचना ठेवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment