Search This Blog

Saturday 29 December 2018

घुग्‍घूसच्‍या विकासासाठी सदैव वचनबध्‍द - सुधीर मुनगंटीवार



बसस्‍थानक बांधकामाचे तसेच 27 कोटी रू किंमतीच्‍या उंच पुलाच्‍या बांधकामाचे भुमीपुजन संपन्‍न

चंद्रपूर दिनांक 29 डिसेंबर : 1995 मध्‍ये मी महाराष्‍ट्र विधानसभेत प्रथमच निवडुन गेलो. माझ्या त्‍या विजयात घुग्‍घूस वासीयांच्‍या प्रेमाचा मोठा वाटा आहे. घुग्‍घूसच्‍या विकासासाठी मी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला आहे.  गेल्‍या वर्षी 2515 या लेखा शिर्षाअंतर्गत 2 कोटी रू. निधी उपलब्‍ध करून दिला असून 8 कोटी रू खर्चुन अत्‍याधुनिक बसस्‍थानक या शहरात बांधण्‍यात येत आहे. घुग्‍घूस येथील 10 ओपन स्‍पेसच्‍या विकासासाठी 5 कोटी रू. निधी आपण लवकरच मंजुर करणार असुन घुग्‍घूस येथे सर्व सोयींनी युक्‍त स्‍टेडियमचे बांधकाम सुध्‍दा करण्‍यात येणार आहे. घुग्‍घूस येथील नागरिकांनी आजवर माझ्या केलेल्‍या प्रेमाला मी कधीही उतराई होणार नाही. या शहराच्‍या विकासासाठी मी सदैव वचनबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. 28 डिसेंबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील घुग्‍घूस येथे विविध विकास कामांच्‍या भुमीपुजन सोहळयानिमित्‍त आयोजित जाहीर सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर, जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेचे समाज कल्‍याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्‍हा परिषद सदस्‍य रणजीत सोयाम, सौ. नितु चौधरी, पंचायत समितीच्‍या सभापती सौ. वंदना पिंपळशेंडे, पंचायत समिती सदस्‍य निरिक्षण तांड्रा, घुग्‍घूसचे सरपंच संतोष नुने, चंद्रपूर तालुका भाजपाचे अध्‍यक्ष नामेदव डाहुले, घुग्‍घूस भाजपाचे अध्‍यक्ष विवेक बोढे, माजी जि.प. सदस्‍य चिन्‍ना नलबोगा, चंद्रपूर मनपाचे स्‍थायी सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हयात विकासाचे अनेक प्रकल्‍प आम्‍ही आणले आहेत. चंद्रपूर येथील वनअकादमीची इमारत भारतात दुस-या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. चंद्रपूर जिल्‍हयासाठी मेडीकल कॉलेज, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, कॅन्‍सर हॉस्‍पीटल असे विविध प्रकल्‍प आपण राबवित आहोत. चिचपल्‍ली येथील बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्र नुकतेच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहे. विकासाचे विविध टप्‍पे चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिक अनुभवत आहे असेही ते म्‍हणाले.
27 कोटी रू किमतीच्‍या मोठया पुलाचे बांधकाम

चंद्रपूर वणी यवतमाळ रस्‍त्‍यावरील घुग्‍घूस गावाजवळ वर्धा नदीवर असलेला अस्तित्‍वातील पूल वाहतुकीसाठी अरूंद असल्‍यामुळे, दुसरा मोठा पूल अस्तित्‍वातील असलेल्‍या पूलाचे बाजूने बांधण्‍याचे ठरले आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता रूपये 27.00 कोटी असून पूलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. सदर पूलाची लांबी 251.00 मीटर असून रूंदी 12.00 मीटर आहे. सदर पूलाचा बांधकाम कालावधी 18 महिने असून जानेवारी 2020 मध्‍ये पूलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. चंद्रपूर वणी रस्‍ता चार पदरी आहे, परंतु अस्तित्‍वातील पूल फक्‍त दोन पदरी असल्‍यामुळे नविन पूलाचे बांधकाम केल्‍यास पूलावरूनसुध्‍दा चार पदरी वाहतुक सुरू होईल अशी माहीती त्‍यांनी यावेळी बोलतांना दिली. विकासासंबंधी आजवर नागरिकांना जी आश्‍वासने आम्‍ही दिली ती प्राधान्‍याने पुर्ण केली आहेत असेही ते यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी बोलतांना केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर म्‍हणाले, अर्थमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात हा जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर ठरला आहे. अनेक प्रकल्‍प, उपक्रम त्‍यांनी जिल्‍हयात राबविले आहेत. रस्‍ते विकास, पाणी पुरवठा सर्वच क्षेत्रात त्‍यांच्‍या नेतृत्‍वात जिल्‍हयात लक्षणीय कामगीरी सुरू आहे. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातुन सुध्‍दा विविध विकास कामे या क्षेत्रात आम्‍ही केली आहेत. असेही ते यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी बोलतांना जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे म्‍हणाले,  विकास आणि भारतीय जनता पार्टी हे एक अनोखे समिकरण या जिल्‍हयात निर्माण झाले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कधी नव्‍हे इतका निधी या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी उपलब्‍ध करून दिला आहे. जिल्‍हयातील प्रत्‍येक शहर, ग्रामीण भाग विकासाच्‍या वाटेवर  आघाडीवर आहे. विकासाचा हा झंझावात यापुढेही असाच सुरू राहणार असुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात ही विकास यात्रा अशीच पुढे जाणार असल्‍याचे ते यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी अत्‍याधुनिक बसस्‍थानकाच्‍या बांधकामाचे भुमीपुजन, 27 कोटी रू खर्चुन बांधण्‍यात येणा-या घुग्‍घूस-वणी-यवतमाळ उंच पुलाच्‍या बांधकामाचे भुमीपुजन करण्‍यात आले. जाहीर सभेला नागरिकांची मोठया संख्‍येनी उपस्थिती होती. 
000000

No comments:

Post a Comment