सामान्य मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.27 डिसेंबर - लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असून आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत कोणत्याही सामान्य मतदारांमध्ये शंका राहू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. चंद्रपूर येथील नियोजन भवनात आयोजित एक दिवसाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले
या प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये समाज माध्यमांचा योग्य वापर करून ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व अफवा पसरविणाऱ्या पासून सतर्क करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रात्यक्षिक कालावधीचा व्हिडिओ तयार करण्यात येऊन त्यावर वेळ टाकण्यात यावी, असे सर्वांना निर्देश देण्यात आले.
ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिकाचा गावनिहाय व मतदान केंद्र निहाय वेळापत्रक तयार करण्यात यावेत, यासाठी प्रशिक्षित टीम तयार करण्यात यावी, नागरिकांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक उघड्यावर देण्यात येऊ नये, शाळा व शासकीय कार्यालयांमध्येच देण्यात यावे, ईव्हीएम व्हिव्हीपॅट का वापरला जातो याची सविस्तर माहिती प्रत्येकाला देण्यात यावी, ज्या गावात प्रात्यक्षिक करुन दाखविल्या जाणार आहेत. त्या गावचे ग्रामसेवक, तलाठी, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, सरपंच इत्यादींनी यावेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्या.
प्रात्यक्षिकांसाठी पाठविण्यात येणारी ईव्हीएम मशीन तहसीलदार यांनी स्वतः हाताळून बघितल्यानंतरच पुढे पाठविण्यात यावी, कोणत्या व्यक्तीला ईव्हीएम देण्यात येणार आहेत याची नियुक्ती आदेश काढण्यात यावे, गावांना भेटी देण्यासाठी नोंदवही तयार करून त्यामध्ये रोजच्या रोज नोंदी करण्यात याव्यात, ईव्हीएम मशीन बाहेर कुठेही न ठेवता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात यावी.
ज्या गावात मतदान केंद्र आहे, अशा गावात जाण्यासाठी रस्ते व विद्युत नसेल त्या गावांची यादी तयार करून तसे कळविण्यात यावे. प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रशिक्षणासंबंधी पोस्टर, बॅनर लावण्यात यावे. तसेच या प्रात्यक्षिकासंबंधीची माहिती पोस्टर, बॅनर, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील, उपविभागीय कार्यालये व इतर शासकीय कार्यालयांमध्ये देखील लावण्यात यावे. प्रत्येक गावात प्रात्यक्षिक घेण्यात यावे, त्यामध्ये कोणतेही मतदान केंद्र सुटू नये याची काळजी घेण्यात यावी, अशा वेगवेगळ्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सदर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले नाही अशा प्रकारची तक्रार येवू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्यासह सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस.जी.समर्थ, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment