Search This Blog

Sunday 2 December 2018

गाव असो वा शहर बोगस डॉक्टरांची माहिती प्रशासनाला पोहचवा : जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार


आरोग्य यंत्रणेने तपास मोहिम राबवण्याचे निर्देश

      चंद्रपूर, दि.1 डिसेंबर  जिल्हयातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे. मात्र लोकांच्या जीवीत्वाशी खेळणा-या बोगस डॉक्टरांना उघड करण्याचे काम जागरुक नागरीक करु शकतात. त्यांनी स्थानिक स्तरावरील यंत्रणांकडे याबाबतची माहिती दयावी. या जिल्हयामध्ये एकही बोगस डॉक्टर लोकांच्या जिवीत्वाशी खेळता कामा नये, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे. 
            काल शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर शोध व कार्यवाही समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली आंबटकर, तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणात बोगस डॉक्टरांच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत.  या डॉक्टरामुळे  नागरिकांचे जीवत्व धोक्यात येत आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामीण भागातील नागरिक, पोलीस पाटील, ग्राम सेवक, सरपंच, तलाठी यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेवून बोगस डॉक्टरांवर धाडी टाकण्यात येवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना संबंधीत यंत्रणेला त्यांनी दिल्या.
            त्याचप्रमाणे जिल्हयात विना परवानगीने चालविण्यात येणा-या नर्सिग होमची माहिती घेण्यात यावी आणि अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस देवून त्यांच्या नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.  कोणतीही तक्रार आल्यास त्याची चौकशी पूर्ण झालीच पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.    
                                                         000

No comments:

Post a Comment