प्रशासकीय भवन व पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
चंद्रपूर, दि.21 डिसेंबर - विविध विकासकामांच्या माध्यमातून मुल शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण करतोय. हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता प्राप्त ठरावे हे आपले स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. मुल शहरातील नागरिकांच्या शुभेच्छांच्या आणि सहकार्याच्या बळावर हे स्वप्न निश्चीतपणे पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दिनांक 20 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हयातील मुल शहरात तहसिल तसेच उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळयानिमीत्त आयोजित जाहीर सभेत वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपा नेते प्रमोद कडू, मुल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुल शहर भाजपाध्यक्ष प्रभाकर भोयर, मुल पंचायत समितीच्या सभापती सौ.पूजा डोहणे, चंद्रकांत आष्टनकर, पंचायत समितीचे उपसभापती चंदू मारगोनवार,बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती सुषमा साखरवाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल,तहसिलदार श्री.सरोदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, या मतदार संघाने माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केला आहे. या प्रेमाच्या माध्यमातूनच जनसेवेची संधी मला लाभली आहे. त्यामुळे या मतदार संघातील उपक्रमांचे भूमीपूजन असो वा लोकार्पण मला नेहमीच विशेष आनंद लाभतो. मुल शहर व तालुक्यातील विकासकामांचा वेग हा बुलेट चा वेग आहे. यासाठी अधिकारी वर्गाचे कार्य सुध्दा निश्चीतच अभिनंदनीय आहे. मुल शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आपण संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. शहरातील रस्ते विकास, ड्रेनेज याला आपण प्राथमिकता दिली आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आठवडी बाजाराच्या बांधकामासाठी 11 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, हे काम सुध्दा प्रगतीपथावर आहे. मुल शहरात 28 कोटी रू. खर्चून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. 24 बॉय 7 अशा पध्दतीने पाणी पुरवठा करणारी ही राज्यातील प्रमुख पाणी पुरवठा योजना ठरणार आहे. शहरातील माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचे बांधकाम, आदिवासी मुला-मुलींसाठी वसतीगृहाचे बांधकाम आपण पूर्ण केले आहे. 10 कोटी रूपये खर्चून एक अत्याधुनिक असे बसस्थानक मुल शहरात बांधण्यात येत आहे. 5 कोटी रूपये खर्चुन विश्रामगृहाच्या बांधकामाला सुरूवात होत आहे. शहरात एक सुंदर इको पार्क आपण जनतेच्या सेवेत रूजु केले आहे. शहरातील मोकळया जागांचा विकास करण्याची योजना आखली आहे. 2 कोटी 50 लाख रू. निधी खर्चुन जलतरण तलावाचे बांधकाम सुरू आहे. स्मशानभूमी व कब्रस्तानच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी स्वर्गरथाची मागणी केली आपण तो उपलब्ध केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाटयगृहाचे बांधकाम व स्मारक आपण सरकारमध्ये नसताना मंजूर करविले. अभ्यासू अशी भावी पिढी घडावी, विद्यार्थी ज्ञान संपन्न व्हावे यासाठी शहरात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची इमारत आपण बांधून वाचनालय जनतेच्या सेवेत रूजु केले. नागरिकांनी विकासासंबंधी केलेली प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला आहे. या प्रक्रियेत जनतेचे लाभलेले सहकार्य मी कधिही विसरू शकणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यापुढील काळात शहरातील दिड ते दोन हजार नागरिकांना राहण्यायोग्य घरे देण्याची योजना आपण आखत आहोत. ज्या नागरिकांजवळ केशरी कार्ड अर्थात एपीएल कार्ड आहे पण त्यांना बीपीएल कार्डावरील धान्य सुविधा मिळत नाही. अश्यांना 2 रू., 3 रू. किलो धान्य मिळण्यासाठी शिक्का त्यांच्या कार्डावर मारण्याची व्यवस्था आपण विशेष बाब या सदराखाली करीत आहोत. मतदार संघात नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरो मशीन बसविण्याचा संकल्प मी केला आहे. या पुढील काळात मुल शहर व तालुक्यात हा उपक्रम आपण राबविणार आहोत. मुल शहर स्वच्छता ॲॅपमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले हा मुल शहरातील नागरिकांचा गौरव आहे. यासाठी मी नागरिकांचे अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू आदी मान्यवरांची भाषणे झालीत.
यावेळी 25 लक्ष रू. खर्चुन बांधण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कोटी रू. निधी खर्चुन बांधण्यात येणा-या विश्रामगृहाचे भूमीपूजन सुध्दा करण्यात आले. 6 कोटी 69 लाख रू. निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जाहीर सभेला शहरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment