Search This Blog

Thursday, 30 January 2020

चांदा ते बांदा योजनेतुन महिलांना मिळाला आधार : अलकाताई आत्राम


पोंभुर्णा येथे चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळावा
चंद्रपूर, दि. 30 जानेवारी :जिल्ह्यातील शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला उद्योग व्यवसाय व जोडधंदा करू इच्छिणाऱ्या युवक-युवती साठी चांदा ते बांदा योजनेच्या उपयोगिता व त्यातील मिळणाऱ्या लाभाच्या घटकांना समजून घेण्यासाठी पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा येथे 30 जानेवारी रोजी चांदा ते बांदा योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याचे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तसेच चांदा ते बांदा  जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना नाविन्यपूर्ण असून या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती अलकाताई अत्राम यांनी केले.
चांदा ते बांदा या योजनेतून महिला आर्थिक विकास महामंडळ व रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून महिलांना कारपेट सतरंजी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून आतापर्यंत पाचशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार मिळाला असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे मार्गदर्शन चांदा ते बांदा कार्पेटचे प्रशिक्षक मनीष द्विवेदी यांनी यावेळी केले.
कृषी विस्तार अधिकारी शेंडे यांनी संबोधित करताना, कृषी आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून या घटकाचा विकास करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन याठिकाणी केले.  सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी ग्रंथालय स्थापन करून यामध्ये शेती संदर्भातील सर्व माहिती पुस्तिका ठेवण्यात आलेली आहे.
बचत गटातील महिलांना चांदा ते बांदा योजना व कार्पेट, सतरंजी युनिट यामुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले, असे मार्गदर्शन सीएमआरसी व्यवस्थापक वंदना बावणे यांनी केले.
या मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अलकाताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती पंचायत समिती पोंभूर्णा ज्योतीताई बुरांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, नायब तहसीलदार जि.एच.रणदिवे     गटविकास अधिकारी धनंजय साळवे तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक पशुधन विस्तार अधिकारी पी. एस. दामले, उमेद अभियान समन्वयक राजेश दुधे, चांदा ते बांदा कार्पेट प्रशिक्षक मनीष द्विवेदी, सी.एम. आर. सी व्यवस्थापक वंदना बावणे, कृषी विस्तार अधिकारी शेंडे, टाटा ट्रस्टचे आकाश वासमवार, महिला आर्थिक महामंडळचे गट सदस्य राजश्री भांडेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे सुधीर आत्राम, नामदेव शेवाळे, सुभाष नगारे, संचालन संजय मेकर्तीवार तर आभार प्रदर्शन विजय जाधव यांनी केले.
000000

मुद्रा बँकेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी चंद्रपूर जिल्हयात करणार प्रचार, प्रसार


चंद्रपूर, दि. 30 जानेवारी : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून नावारुपास आलेली असलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाला आज सुरुवात करण्यात आली.
नियोजन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या सहभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाला सुरुवात करण्यात आली. हा चित्ररथ जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये फिरणार असून याद्वारे ग्रामिण भागात कर्जा विषयीची माहिती आणि पत्रके दिली जातील.आणि या सोबतच या कर्जाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात यश मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा या चित्रफीतीव्दारे दाखविली जाईल.
जिल्हयात एप्रिल 2019 पासून आतापर्यंत 37898 लाभार्थांनी 199.65 कोटी कर्ज घेतले आहेत. तर ही योजना सुरू झाल्यापासून किल्ल्यामध्ये आत्तापर्यंत 600 कोटी रुपयांच्या वरती कर्जाचे वाटप झाले आहे. यातून अनेकांनी हा उद्योग व्यवसाय उभारले असून भरभराटीला प्रारंभ झाला आहे. या योजनेच्या मार्फत 10 हजार ते 10 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. उद्योग व्यवसायामध्ये अभिरुचि असणाऱ्या तरुणांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी  या योजनेला प्रसिद्धीची जोड देण्यात येत आहे.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, वरिष्ठ भू वैज्ञानिक डॉ.विजयता सोळंकी तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कौशल्य विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांच्या उपस्थितीत आज या चित्ररथाला हीरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते जिल्हास्तरीय मुद्रा बँक समितीमार्फत या प्रचार प्रसिद्धीचे आयोजन करण्यात आले आहे.
0000000

Tuesday, 28 January 2020

चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी 223.60 कोटी मंजूर : अर्थमंत्री अजित पवार


Ø  चंद्रपूर जिल्ह्यासाठी 43.60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतूदीला अर्थमंत्र्यांची मंजूरी
Ø  नागपूर येथे अर्थमंत्र्यांच्या उपस्थित राज्यस्तरीय बैठक
Ø  मर्यादित नियतव्ययात आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश
Ø  घुगुस,भद्रावती व राजुरा येथे बॅरेजेस बांधण्यासाठी 19 कोटी मंजूर
Ø  विविध प्रकल्पातील थकीत वीज देयकाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

नागपूर, दि. 28 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने 2020-21 वर्षासाठी निर्धारित केलेल्या 180 कोटी या नियतव्ययामध्ये 43.60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मंजूर करीत पुढील वर्षासाठी 223.60 कोटीच्या जिल्‍हा वार्षिक योजनेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे मान्यता दिली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आणखी निधीची मागणी केली असून यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारुप आराखडा मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये गृहमंत्री अनील देशमुख, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले, खासदार  सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले याशिवाय सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती, तसेच विविध स्त्रोतातून प्राप्त होणारा निधी व प्रस्तावित जिल्हास्तरीय योजनांबाबत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली.
चंद्रपूर जिल्ह्याला 2020-21 या वर्षासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 180 कोटी नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात 425.38 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी आजच्या बैठकीमध्ये सादर केली. तथापि, जिल्हा वार्षिक समितीच्या निकषानुसारच सर्व जिल्ह्यांना यावर्षी वाढीव निधी दिला जाईल असे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या तिजोरीवर कर्जमुक्ती घोषणेमुळे अतिरिक्त ताण पडलेला आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याला गरजेपेक्षा अधिक किंवा अती आवश्यकता असल्याशिवाय निधी देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, पालकमंत्री, खासदार, आमदार व बैठकीत उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील रस्ते, अंगणवाडी इमारत, पोलीस व अन्य विभागाची वाहने खरेदी व अन्य बाबींसाठी निर्धारित 180 कोटी व्यतिरिक्त 43. 60 कोटी निधी अतिरिक्त देणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
तथापि, या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या काही महत्वाच्या अन्य मागण्यांवर मंत्रालयात मंत्री स्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेतल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या बैठकीमध्ये सीएसआर फंडाच्या संदर्भात जिल्हास्तरीय नियोजन करताना चौकट आखण्याची मागणी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. अर्थमंत्र्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी नियंत्रण ठेवावे ,असे निर्देश दिलेत.
जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामाबाबत मोठ्या प्रमाणात निधी मागण्यात आला. यासंदर्भात बोलताना अर्थमंत्र्यांनी मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणात यासंदर्भात निधी उपलब्ध असून केंद्र शासनाकडून हा निधी मिळत असताना जिल्हा नियोजन समितीमार्फत अत्यंत आवश्यक असेल त्याच ठिकाणी या निधीचा वापर करण्याची सूचना केली.
जिल्ह्यातील विविध कार्यालयाच्या संदर्भात 64 कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी मांडली. अतिशय आवश्यकता असेल त्याच ठिकाणी यासंदर्भात कार्यवाही व्हावी व त्या-त्या विभागामार्फत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष वेधावे अशा सूचना अर्थमंत्र्यांनी केल्या.
जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी अंगणवाडी दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ व अंगणवाडी आयएससो करण्याच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्याने केलेल्या वेगळ्या कामाची माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या या कामकाजाचे अभिनंदन करीत कौतुक केले.
वीज वितरण कंपनीला सौर व अन्य वीज पंप मिळण्यासाठी जिल्हा नियोजन मधून पैसे देण्याबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलतांना अर्थमंत्र्यांनी वीज वितरण कंपनीला वीज पंपासाठी निधी देण्यासाठी निर्देश देण्यात येईल असे स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती रस्त्याच्या दिवाबत्ती संदर्भातील थकित निधी देण्यास असमर्थ असल्याचे निर्देशास आणून दिले. यापूर्वी हा निधी जिल्हा परिषदेमार्फत दिला जात होता. सध्या ग्रामपंचायत हा निधी आपल्या कर वसुलीतून भरत असल्यामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्याचे लक्षात आणून दिले.तथापि, या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत सूचना अर्थमंत्र्यांनी केली
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात प्रवण स्थळांच्या दुरुस्तीसाठी तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या दिवाबत्तीसाठी नव्या नळ योजनांना वीज जोडणी देण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा ,अशी मागणी यावेळी केली.
आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी यांनी जिल्हा परिषदेमार्फत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी अतिशय अल्प निधी उपलब्ध असल्याबाबतची बाब लक्षात आणून दिली.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शेवटी दीडशे कोटी रुपये अधिक देण्यात यावे अशी, मागणी केली. मात्र जिल्ह्याचे क्षेत्रफळ व अन्य नियमानुसार जिल्ह्याचा नियतव्यय ठरलेला असून त्यामध्ये वाढ करण्याची सध्या राज्य शासनाची स्थिती नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तथापि, यावेळी खासदार सुरेश धानोरकर यांनी जिल्ह्यातील वर्धा नदीवर बॅरेजेस बांधण्याबाबत या बैठकीत मागणी केली. जिल्ह्याच्या वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, घुग्घुस, राजुरा या भागाचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे त्यांनी अर्थमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
अर्थमंत्र्यांनी ही बाब अतिशय गंभीरतेने घेत संबंधित विभागांच्या सचिवांना यासंदर्भात बैठकीतून दूरध्वनी लावत भद्रावती, घुग्घुस व राजुरा येथील तीन बॅरेजेसला तात्काळ मंजुरी दिली. यासाठी 19 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा यावेळी केली.
राजुरा येथील विमानतळाला जमीन हस्तांतराची समस्या असून हे विमानतळ भद्रावती नजीक केंद्रशासनाच्या वापरात नसलेल्या जागांवर उभारण्याची मागणी देखील या बैठकीत खासदार धानोरकर यांनी केली. यासंदर्भात अमरावती ,अकोला येथील विमानतळाच्या चर्चेच्या वेळी निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
चांदा ते बांदा या योजनेला कालावधी वाढवून देण्याबाबत मागणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन डॉ.कुणाल खेमनार यांनी केले.
0000000

Sunday, 26 January 2020

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिव भोजन योजनेला सुरुवात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते थाळी देऊन शुभारंभ



चंद्रपूर, दि.26 जानेवारी : राज्य शासनाची गरीब, गरजू व्यक्तीसाठी सवलतीच्या दरात भोजन देण्याची योजना अर्थात शिव भोजन योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाला सुरू करण्यात आली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः थाळी देऊन या योजनेचा शुभारंभ केला.
 ध्वजारोहणानंतर बस स्टॅन्ड परिसरातील या शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार सुरेश धानोरकर ,आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बस स्टँड परिसर, गंज वार्ड भाजीपाला बाजार, जिल्हा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या जिल्हास्तरावर प्रायोगिक स्तरावर ही योजना राबविण्यात येत असून पुढील काळात तालुका व ग्रामीण स्तरावर देखील ही योजना राबविली जाणार आहे.
000000

पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनाला विविध मान्यवरांना पुरस्काराचे वितरण





चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या जिल्ह्यातील सर्व स्तरातील खेळाडू प्रशासन व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाला सन्मानित करण्यात आले.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, खासदार सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात तील नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर या संस्थेचे हॅलो राधा मी रेहाना हे नाटक अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे नाटकाच्या दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे - गावंडे, अभिनेत्री सौ. नुतन धवने, प्रकाश योजनाकार हेमंत गुहे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कठीण व खरतड सेवा केल्याबद्दल पोलीस उपअधिक्षक विलास यामावार, पोलीस निरीक्षक शिवलाल भगत, सत्यजित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, संतोष अंबिके, रविंद्र नाईकवाड, अब्दूल यासिन मलीक, पोलीस उपनिरीक्षक कु. प्राजक्ता नागपूरे, संदिप हिवाळे, विठ्ठल मोरे यांचा विशेष सेवा पदकांने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
चंद्रपूर नक्षलसेलचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मडावी यांनी नक्षलग्रस्त भागात कठीण व खरतड सेवा केल्याबद्दल केंद्र शासनाकडून पोलीस आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानीत केले. दिल्ली येथे आयोजीत अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वूशु फायटींग स्पर्धेत कास्यपदक पटकविल्याबद्दल महिला पोलीस नाईल कु. प्रिती बोरकर यांचा पालकमंत्र्याच्या सत्कार करण्यात आला.
सन 2018-19 या वर्षात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल ओम अनिल ठावरी, कु. अवंती अनिल गांगरेड्डीवार, अभिषेक नरेश कोचर, भुषण संजय देशमुख, विनोद शंकर निखाडे व पोलीस विभागात कार्यरत असतांना कबड्डी स्पर्धे विशेष कामगिरी केल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सन्मान करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत हॉलीबॉल संघ व सैन्य भरती कालावधीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रदीप जानवे, रामास्वामी कापरबोयना,शाम थेरे, दीपक जेऊरकर, अरुण येरावार ,प्रकाश सुर्वे, प्रवीण गुज्जनवार, डॉक्टर किर्तीवर्धन दीक्षित, आर. एस. गौतम, विक्रम डोग्रा, एन.सी. भंडारी ,दामोदर सोरदे ,डॉ. एम गुलवाडे, एन. ढोलकिया, एम. रुंगठा, राजू सलुजा सत्कार करण्यात आला.
आदर्श स्काऊट शिक्षक आणि गाइड शिक्षिका पुरस्कार भरत नागोराव कुंडले ,सुरेखा रामचंद्र बोमनवार, प्रशांत सुधाकर खुसपुरे, अनु नामदेवराव खानझोडे, यांना देण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीचे उपलेखापाल किसन रतन गिरी, चांदा ते बांदा योजनेसाठी काम करणाऱ्या संजीवनी हरिदास दुर्योधन यांना देखील यावेळी पुरस्कृत करण्यात आले.
000000