Search This Blog

Friday, 26 August 2022

पडोली चौकातील सुरक्षा उपाय, चौक सौंदर्यीकरण व संबंधित कामासाठी 5 कोटी 21 लक्ष 61 हजार रू. निधी मंजूर

 

पडोली चौकातील सुरक्षा उपाय, चौक सौंदर्यीकरण व संबंधित कामासाठी

5 कोटी 21 लक्ष 61 हजार रू. निधी मंजूर

वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत.

            चंद्रपूर, दि. 26 ऑगस्ट :  वरोरा-चंद्रपूर-बल्‍लारपूर-बामणी राष्‍ट्रीय महामार्ग ९३० वरील पडोली चौकातील सुरक्षा उपाय, चौकाचे सौंदर्यीकरणाच्‍या कामासाठी रस्‍ता सुरक्षा निधी अंतर्गत ५ कोटी २१ लक्ष ६१ हजार रू. निधीला मंजूरी देण्‍यात आली आहे. वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्‍या पाठपुरावाला यश प्राप्‍त झाले आहे. दिनांक २६ ऑगस्‍ट २०२२ रोजी मुख्‍य सचिव महाराष्‍ट्र शासन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या रस्‍ता सुरक्षा नियंत्रण समितीच्‍या बैठकीत या प्रस्‍तावाला मंजूरी देण्‍यात आली आहे.

चंद्रपूर-नागपूर मार्गावरील पडोली चौकात मोठया प्रमाणावर वाहतुक असते. प्रामुख्‍याने जड वाहनांच्‍या वाहतुकीमुळे या चौकात मोठया प्रमाणावर अपघात होत असल्‍यामुळे या रस्‍त्‍यावर सुरक्षा उपाय संबंधीची कामे करण्‍यात यावी, यासाठी माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी आमरण उपोषण पुकारले होते. हे उपोषण सोडविताना तत्‍कालीन आमदार व विद्यमान वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री.  मुनगंटीवार यांनी सदर रस्‍त्‍यावर वाहतुकीशी संबंधित सुरक्षा विषयक आवश्‍यक उपाययोजना करण्‍याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांना दिले होते. त्‍याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचा ५ कोटी २१ लक्ष ६१ हजार रू. किंमतीचा प्रस्‍ताव जिल्‍हाधिका-यांच्‍या मार्फत परिवहन आयुक्‍तांना पाठविला होता. या प्रस्‍तावाला मान्‍यता मिळावी यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला होता. दिनांक २६ ऑगस्‍ट रोजी मुख्‍य सचिव महाराष्‍ट्र शासन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली रस्‍ता सुरक्षा नियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात संपन्‍न झाली. या बैठकीत सदर ५ कोटी २१ लक्ष ६१ हजार रू. किंमतीच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता मिळाली आहे. या प्रस्‍तावाअंतर्गत रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला पेव्‍हींग ब्‍लॉक बसविणे, आरसीसी ड्रेन, डिव्‍हायडर रेलींग, ट्रॅफीक सिग्‍नल्‍स, बिल बोर्डस, बसस्‍टॉप, पोलिस चौकी, सोलार स्‍ट्रीटलाईट्स, रोड स्‍टडस, रिफ्लेटीव्‍ह बोर्ड आदी सुरक्षा विषयक उपाययोजना तसेच पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करण्‍यात येणार आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राष्‍ट्रीय महामार्ग ९३० वरील पडोली चौकातील ही महत्‍वपूर्ण समस्‍या मार्गी लागली आहे त्‍यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

00000

Thursday, 25 August 2022

जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी

 






जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट :  केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच दी रेन’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी विनीत जैन आणि तांत्रिक अधिकारी जी.सी.शाहू यांनी जिल्ह्यातील  रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 10 कामांची पाहणी केली.

      पाहणी करून वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत यंत्रणेचा आढावा घेतांना श्री. जैन म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जलसंधारणाचे काम अतिशय चांगले आहे. त्यातच अमृत सरोवराचे काम आणि दर्जा चांगला असून त्यांनी संबंधित यंत्रणेचे कौतुक केले. दैनंदिन घरगुती कामांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून पाण्याची बचत करण्यासाठी या अभियानात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. याकडे यंत्रणेने लक्ष द्यावे. तसेच केवळ काम करून उपयोग नाही तर पोर्टलवर ती कामे तातडीने अपलोड होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याची दखल वरिष्ठांना घेता येईल. त्यामुळे कामे अपलोड करण्याबाबत गांभिर्य ठेवा. जेथे नागरिकांचा राबता जास्त आहे, अशा ठिकाणी जलशक्ती केंद्राचे मॉडेल उभारावे. त्यात आकर्षकपणा असावा, अशा सुचना त्यांनी केल्या.

      जुनोना येथील तलावाची पाणी साठवणक्षमता वाढू शकते, असे तांत्रिक अधिकारी श्री. शाहू यांनी सांगितले. पोंभुर्णा येथील मच्छी बाजारातील रेन वॉटर हार्वेस्टिंगकरीता तयार करण्यात कामामध्ये केवळ दोनच पाईपचा उपयोग केला आहे. ही पाईपची संख्या वाढवावी, असेही ते म्हणाले.

      बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष आकोसकर, प्रियंका रायपुरे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके आदी उपस्थित होते.

      तत्पूर्वी केंद्रीय पथकाने चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पठाणपुरा येथील पाणी शुध्दीकरण केंद्र, जुनोना येथील तलाव, किन्ही येथील बंधारा, बल्लारपूर येथील रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि डीजीटल शाळा, पोंभुर्णा येथील नगर पंचायत इमारत व आठवडी बाजार, चकाष्टा येथे वनविभागाचे वृक्षारोपण आणि तलाव आदी कामांची पाहणी केली.

००००००००

प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधार खाते लिंक करण्याचे आवाहन

 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019

प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी शेतकऱ्यांनी

आधार खाते लिंक करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यास राज्य शासनाने 29 जुलैला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत सन 2017 – 18, सन 2018 -19 आणि 2019 -20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली असल्यास सदर शेतकरी योजनेस पात्र राहणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने व सहकार विभागाने योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे बँकेतील पीक कर्ज खाते आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले खाते आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 या योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून पात्र शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकनुसार 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व बँका या योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणार आहे. तसेच सदर याद्या 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत महाआयटीमार्फत विकसित संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत. प्रोत्साहन प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकीकरणानंतर लाभार्थ्यांच्या बचत खात्यात लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार असल्याने, ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज खाते / बचत खाते आधार लिंक नसतील, अशा शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.

००००००


चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 14 कोटींचा निधी मंजूर

   




             चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 14 कोटींचा निधी मंजूर             

Ø जुलै 2022 च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात तरतूद

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट :  चंद्रपूर जिल्‍हयातील चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी जुलै 2022 च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रू. निधीची तरतूद करण्‍यात आली आहे. वने व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे.

2014 मध्‍ये वनमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्‍यानंतर त्‍यांनी घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयांपैकी चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती हा एक निर्णय होता. चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये काही समाज पारंपरिकरित्‍या बांबुपासून वेगवेगळया रोजच्‍या वापराच्‍या वस्‍तु बनविण्‍याचा व्‍यवसाय करतात. चंद्रपूर व परिसरात बांबूचे मोठया प्रमाणात उत्‍पादन होते. मात्र काही समुदायापुरता मर्यादित झालेला उद्योग विस्‍तारीत करणे आणि यामध्‍ये नव्‍या तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे होते.

याच उद्देशाने वनमंत्री म्‍हणून श्री. मुनगंटीवार यांनी वनविभागाच्‍या अंतर्गत  येणा-या महाराष्‍ट्र बांबू विकास मंडळामार्फत चंद्रपूरमध्‍ये चिचपल्‍ली परिसरात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरूवात केली. या संशोधन केंद्रामध्‍ये दोन वर्षाच्‍या अभ्‍यासक्रमाला मान्‍यता मिळाली असून महाराष्‍ट्राच्‍या विविध भागांतील मुलांनी या अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. या ठिकाणी तयार करण्‍यात आलेला तिरंगाध्‍वज व अन्‍य भेट वस्‍तु  मोठया प्रमाणात महाराष्‍ट्रामध्‍ये लोकप्रिय झाल्‍या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा येथे तयार झालेल्‍या तिरंग्‍याचे कौतुक केले आहे. चंद्रपूर जिल्‍हयात कायमस्‍वरूपी एक मोठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र निर्माण झाले आहे. हा परिसर भारताच्‍या ईशान्‍य पूर्वेकडील राज्‍याला जोडला जात असून रोजगार व कौशल्‍य निर्मितीसाठी हे केंद्र नावलौकीकास आले आहे.

चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता मंजूर 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रू. निधीअंतर्गत या प्रकल्‍पातील बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह  इमारतीचे बांधकाम करणे व विद्युत विषयक कामे करण्‍यात येणार आहे. सदर निधी मंजूर झाल्‍याने या प्रकल्‍पाशी संबंधित कामांना गती प्राप्‍त होणार आहे.

००००००

तेंदूपत्ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार

 

तेंदूपत्ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार

Ø  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत घोषणा

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : तेंदूपत्त्यापासून वनविभागाला रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणा-या राशीमधून प्रशासकीय खर्च वजा करता उर्वरित रक्‍कम प्रोत्‍साहनार्थ मजूरी अर्थात बोनस म्‍हणून तेंदूपत्ता मजूरांना दिली जाते. मात्र 2022 पासून रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम ही पूर्णपणे बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत जाहीर केला.

दिनांक 24 ऑगस्‍ट 2022 रोजी विधान परिषदेत डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्‍या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 2020 मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळालेली रक्‍कम ही प्रशासकीय खर्चापेक्षा कमी असल्‍यामुळे बोनस दिला गेला नाही. 2021 मध्‍ये 19.87 कोटी रक्‍कम

 

बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍यात आली. 2022 मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात 72 कोटी इतकी रक्‍कम जमा झाली आहे. मात्र यापुढे या रकमेतून प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्‍कम मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देण्‍यात येणार असल्‍याचे मुनगंटीवार म्‍हणाले. त्यामुळे आता जवळपास चौपट रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना मिळणार आहे.

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्त वनक्षेत्रात राहणा-या तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणा-या तेंदूपत्ता मजूरांना आर्थिकदृष्‍टया स्‍वयंपूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने हा निर्णय घेण्‍यात येत असल्‍याचे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. 2021 चा तेंदूपत्ता बोनस येत्‍या दोन महिन्‍यात मजूरांना मिळेल अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.

००००००