Search This Blog

Monday, 24 November 2025

जिल्ह्यातील 33 केंद्रावर धान खरेदी सुरू

 जिल्ह्यातील 33 केंद्रावर धान खरेदी सुरू

चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक, प्रादेशिक कार्यालय चंद्रपुर अंतर्गत शासनाच्या निर्देशनानुसार खरीप पणन हंगाम 2025-26 साठी 3 नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू झाली आहे. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा व पोंभुर्णा या 8 तालुक्यातील एकूण 33 खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे.

      यात नवखळा,  मोहाडी मो., सावरगांव, चिंधीचक,  बाळापूर, कोजबी, गिरगांव, जिवनापूर, गोविंदपूर , वाढोणा, तांबेगडीमेंढा, लाढबोरी,  मुरमाडी, कळमगांव गन्ना, शिवणी, गडबोरी,  नाचनभट्टी, पेठगांव, चारगांव बु., वडधा तु. भटाळा, डोमा, खांबाडा, बोडधा,  आंबेनेरी,  अडेगाव देश, मासाळ, टेकेपार, मोटेगाव,  चंदनखेडा, पोंभुर्णा टिडीसी, करंजी, चिंचोली  या केंद्रांचा समावेश आहे. 

खरीप  पणन हंगाम 2025-26 मध्ये ऑनलाईन नोंदणी व धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच आ.वि.क. सह. संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून ई-पिक पेरा केलेला सातबारा, नमूना 8 अ. आधारकार्ड ई – केवायसी केलेले बँक पासबुक,  संमतीपत्र व इतर आवश्यक दस्तावेज घेवून स्वतः हजर राहावे व ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच धान विक्री करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक व्यवस्थापक म.रा. सह. आदि. विकास महामंडळ यांनी कळविले आहे.

००००००

कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचा सीईओंकडून आढावा


कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचा सीईओंकडून आढावा

चंद्रपूर, दि. 24 :  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान 17 नोव्हेंबर  ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली व आतापर्यंत झालेल्या मोहिमेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीत पटले, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे व इतर अधिकारी उपस्थित होते.

            सदर मोहिमेत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाविषयी  यावेळी माहिती देण्यात आली. यात मोहिमेचा उद्देश, समाजात लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढणे, त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे.  कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे.

कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/लालसर बधीर च‌ट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गांठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे,

हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे इत्यादी

               जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तद्नंतर संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत निदान करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत 6 लक्ष 12 हजार 63 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.           

सदर कार्यक्रम हा जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचा-यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. करीता सर्व जनतेने येणा-या कर्मचा-यांमार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह सर, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ, महादेव चिंचोळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम यांनी केले आहे.

००००००

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर वन अकादमी अव्वल


अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर वन अकादमी अव्वल

               चंद्रपूर, दि. 24 :  देहराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या 28 व्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्र वनविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत देशात 4 था क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राने एकूण 77 पदके यात 31 सुवर्ण, 26 रौप्य, 20 कांस्य पदके जिंकत 286 गुण मिळवले.         

या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्रातील सहा वनप्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा वाटा असून त्यांनी एकट्याने 27 पदके जिंकली. यात 9 सुवर्ण, 10 रौप्य व 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. धावण्याच्या विविध स्पर्धा, रिले, मेरेथॉन, लॉग जंप, रेस वॉकिंग, जॅव्हलिन भो, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यावरून राज्यातील वनप्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणाची उच्च गुणवत्ता सिद्ध होते,

            चंद्रपूर वनअकादमीने सर्वाधिक 10 पदके जिंकत (6) सुवर्ण) आघाडी घेतली. अजय पठारे (100मी. व 200मी. दुहेरी सुवर्ण), जगदीश बरेला (लॉग जंप) आणि साक्षी पवार (महिला 21 किमी रेस) यांनी चमकदार कामगिरी करत चंद्रपूर वन  अकादमीला गौरव मिळवून दिला. शहापूर वन अकादमीने 6 पदके (4सुवर्ण, 2 रौप्य) जिंकत दुसरा क्रमांक मिळवला. अखिल जाधव 25 किमी मॅरेथॉन सुवर्ण) आणि हिमानी धनारे (वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग दोन्ही सुवर्ण) हे प्रमुख विजेते ठरले. चिखलदरा वन अकादमीने सातत्यपूर्ण कामगिरी करत 7 पदके (3 रौप्य, 4 कांस्य) पटकावली. यामध्ये सोमिका मंचेकर, नेहा पिंगडे आणि संकेत मसाने यांनी मध्यम अंतर स्पर्धामध्ये चमक दाखवली. जालना अकादमीने रोहिणी पाटील यांच्या उत्कृष्ट धावण्याच्या कामगिरीच्या बळावर 3 रौप्य पदकांचे योगदान दिले.

महाराष्ट्र वनविभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व क्रीडापटू, प्रशिक्षक व प्रशिक्षण  अकामींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची शिस्त, टीमवर्क आणि समर्पण हीच खऱ्या अर्थाने वनसेवेची ओळख आहे, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.

००००००

Sunday, 23 November 2025

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

 ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला 'झिरोधा'चा प्रतिसाद

Ø ‘रीवाइल्डिंग’ उपक्रमासाठी झिरोधाचा १०० कोटींचा निधी

Ø वन विभाग, फार्मर्स फॉर फॉरेस्ट व झिरोधा यांच्यात होणार करार

मुंबई. दि. 23 : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी व रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत.

रिवाईल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय. या संकल्पनेनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकर क्षेत्राचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबविण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्याने झिरोधा व रेनमॅटर फाऊंडेशन ही संस्था काम करणार आहे. यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या झिरोधा रिवाइल्डिंग फंड हा विशेष निधी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.

झिरोधा आणि ‘रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात. यासाठी झिरोधा ही कंपनी आपल्या नफ्यातील १० टक्के निधी सामाजिक उत्तरदायित्व व पर्यावरणीय कामांसाठी राखीव ठेवते. या राखीव निधीतून झिरोझाने संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त १०० कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यामध्ये देशात विविध ठिकाणी मोनोकल्चर वृक्षलागवडी ऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकरच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाइल्डिंग सारखे प्रकल्प उपयुक्त आहे. अशा कामांमध्ये झिरोधासारख्या कार्पोरेट कंपन्या सहभागी होत असून हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही एक आदर्श ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल अत्यंत उत्साही आहोत. महाराष्ट्र शासन आणि वन विभागासोबतचे हे सहकार्य फलदायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

०००००००

Friday, 21 November 2025

वरोरा उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविरोधी कारवाई

 वरोरा उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविरोधी कारवाई

चंद्रपूर, दि. 21 :  राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोरा निरीक्षक पथकाने येनसा ते सोसायटी (मजरा) जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करून चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेला परराज्यातील व बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला. जप्त मद्य आणि वाहनाची एकूण किंमत अंदाजे 6 लक्ष 40 हजार इतकी असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,  बुधवारी सायं. 5 वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर हायवेवर वरोरा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. शॉवरलेट कंपनीच्या ग्रे रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH49-AS-0647 ची तपासणी करण्यात आली असता वाहनाच्या डिक्कीत रॉयल स्टॅग ब्रँडच्या 180 मिलीच्या 480 बॉटली, रॉयल चॅलेंज ब्रँडच्या मध्यप्रदेश निर्मित 750 मिलीच्या 24 बॉटली (प्रथमदर्शनी बनावट) असा परराज्यातील व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा आढळून आला.

या प्रकरणी मनीष नंदकीशोर जयस्वाल (वय 48, नागपूर),  विशाल शंभू मंडळ (वय 28, सावनेर, जि. नागपूर),  सतीश नामदेव देवकर (वय 31, वरोरा, जि. चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे, सागर दिडसे, जवान विलास महाकुलकर (वाहनचालक), तसेच जवान जगदीश मस्के, जितेंद्र आनंद, मंगेश कुयटे आणि अमोल भोयर यांचा सहभाग होता.

सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा  हे करीत आहेत.

00000