चंद्रपूर, दि.13 मार्च- चंद्रपूर जिल्हयामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाने खोज अर्थात शोध नाविन्याचा या अभिनव स्पर्धेला प्रारंभ केला आहे. शेती, उपजिवीका विकास, पर्यटन विकास व प्रशासन प्रक्रियेतील सुधारणा संदर्भात नागरिकांच्या भन्नाट आयडीया 31 मार्च पर्यंत जिल्हा प्रशासनाने मागितल्या आहेत. ऑफलाईन, ऑनलाईन दोन्हीही पध्दतीने या स्पर्धेत सहभागी होता येणार असून सेतू केंद्र ते ग्राम पंचायत सर्वत्र या संदर्भातील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळया क्षेत्रात काम करणा-या नागरिकांकडे अनेक कल्पकता असते. काही प्रयोग त्यांनी स्वत:च्या अनुभवातून सिध्द केले असतात. तर अनेकांना आपल्याकडे सत्ता, प्रशासकीय अधिकार असते तर, असे बदल केले असते, एका दिवसात सगळं बदलून टाकलं असतं अशी महत्वाकांक्षा असते. अशा स्वानुभवातून केलेल्या प्रयोगांना किंवा अफलातून सूचनांना थेट प्रशासनात अंमलात आणण्याचे धाडस जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दाखविले असून ‘हॅलो चांदा’ नंतर एका नव्या संकल्पाच्या उत्सवाला जिल्हयात सुरुवात झाली आहे. सर्व तहसिल कार्यालय, पंचायत समिती, जिल्हयातील सर्व प्रमुख कार्यालय या ठिकाणी या संदर्भातील माहिती उपलब्ध ठेवण्यात आली आहे. या संदर्भातील प्रचार प्रसार सर्व माध्यमातून केल्या जात असून नागरिकांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 1 लाख 2 हजार रुपयाच्या रोख पुरस्काराचे देखील नियोजन करण्यात आले असून एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडल्या जाणार आहे. यासाठीwww.maharashtra.mygov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी हॅलो चांदा टोल फ्री क्रमांक 1800-266-4401 या क्रमांकावरही माहिती घेता येणार आहे.
या स्पर्धेमध्ये 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती, समूह, संस्था अर्ज करु शकणार आहे. शेती संदर्भात आयडीया देतांना जमिनीची उत्पादकता, शेतीसोबत पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, एकापेक्षा अधिक पीक घेण्याबाबत, लागवडीचा खर्च कमी करण्याबाबत, भाज्या आणि फळ उत्पादनाच्या संदर्भात माहिती आदींचा समावेश आहे. तर जीवनमान विकास यामध्ये दुग्ध पुरक व्यवसायांना चालना, जोड धंदे, प्रक्रिया पॅकेजींग, मार्केटींग, वनक्षेत्रातील उत्पादनावर प्रक्रिया करणे आदींचा समावेश आहे. पर्यटन विकासामध्ये ईको-पर्यटन, पर्यटनामार्फत रोजगार निर्मिती, चंद्रपूरचे ब्रँडींग करणे, पर्यटकांचा अनुभव सुधारणे याचा समावेश आहे. प्रशासनातील सुधारणांसाठी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजना पोहचविण्याच्या संकल्पना, प्रशासनातील तक्रार निवारण अधिक चांगले करण्याची संकल्पना, प्रशासकीय संस्कृतीत सुधारणा, कर्मचा-यांना प्रभावीपणे काम करता येईल अशा प्रणालीची निर्मिती करणे आदींचा समावेश आहे.
शासनाने असे करायला हवे, तसे करायला हवे, याबाबीला प्राधान्य दयावयाला हवे, इकडे लक्ष वेधायला हवे अशा अनेक कितीतरी सूचना अनेकांच्या मनात असतात. अशा कल्पक लोकांनी आपल्या प्रत्येक्ष आयडीया शासनापर्यंत पोहचवाव्या, अशी या मागील भूमिका आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, वकील, सरकारी कर्मचारी, शेतकरी, कामगार, महिला सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात फिरण्यासाठी तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्हयातील अधिका-यांसह हीरवी झेंडी दाखवली. तर काल आणखी एक चित्ररथाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी अन्य अधिका-यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविली.
No comments:
Post a Comment