ना.सुधीर मुनगंटीवार व ना.दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शास्त्रज्ञांची चर्चा
चंद्रपूर, दि.26 मार्च- सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहने देखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन त्यांच्यामार्फत नफ्यात चालणारी शेती करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्हयात राबविण्याची शासन तयारी करीत आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी शास्त्रज्ञानांच्या या नव्या प्रयोगाची रविवारी चंद्रपूर येथे माहिती जाणून घेतली.
चंद्रपूर येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली व वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसकर यांचे प्रमुख उपस्थितीत केरळ कृषी विद्यापीठाचे त्रिसुर संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ.जयकुमारन यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादन वाढविण्यासाठी अन्न सुरक्षा सैन्यदलाची संकल्पना समजाऊन सांगितली. केरळमध्ये या पध्दतीचा प्रयोग करण्यात आला आहे. या संकल्पनेनुसार धानाची किंवा अन्य शेती करतांना कमी वेळ, कमी खर्च आणि मोठया क्षेत्रावरील मशागतीला गती देता येते. या संकल्पनेनुसार धानाच्या प्रत्येक 400 हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी यंत्रापासून कापणीयंत्रापर्यंत विविध यंत्रांचा वापर करण्यासाठी 50उत्साही तरुणांना निवडून त्यांना सैन्यदलामध्ये देण्यात येणा-या कडक व प्रगत प्रशिक्षणाप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांची एक सुसज्ज तुकडी तयार करण्यात यावी, असे प्रस्तावित आहे. ही अन्न सुरक्षा आर्मी तयार झाल्यावर प्रत्यक्ष किमान400 हेक्टर शेतांवर जाऊन रोवणीपासून कापणी व तणीस व्यवस्थापनापर्यंत संबंधित शेतक-यांना मदत करेल. हा एक प्रशिक्षीत व्यवसाय असून या प्रशिक्षणाचा वापर ही आर्मी स्वत:च्या अर्थार्जनासोबतच अन्य शेतक-यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वापरतील. यावेळी केरळमध्ये महिला सुध्दा अनेक यंत्रांचा वापर करुन शेती करीत असल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जय जवान जय किसान या घोषणेप्रमाणे प्रशिक्षित शेतकरी जवान व प्रत्यक्ष मेहनत करणारा शेतावरील शेतकरी या दोघांची परस्पर पुरकता वाढवून अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी संकल्प करण्याचा हा प्रयत्न आहे.
सदर संकल्पना केरळ व अन्य काही ठिकाणी राबविण्यात आली आहे. या मागील अर्थकारण, व्यावसायिकता व उपयोगीता लक्षात घेऊन प्रथम काही भागात हा प्रयोग करण्याचा शास्त्राज्ञांचा सल्ला आहे. याबाबत चंद्रपूर व सिंधुदूर्ग या दोन जिल्हयामध्ये अशा पध्दतीच्या यांत्रिकीकरणाच्या शेतीला पुढाकार देता येऊ शकते काय, याबाबतची ही चाचपणी आहे. शेतीमध्ये प्रचंड मेहनतीसोबत आता कल्पकता सुध्दा महत्वाची आहे. याशिवाय श्रमाला प्रतिष्ठा आणि नफ्यातील शेती हे समीकरण प्रभावीपणे मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यात राबविता येईल का याबाबत सदर कृषि विद्यापीठासोबत सामंजस्य करार करुन नियोजन करणेबाबतची सूचना पालकमंत्री यांनी जिल्हधिकारी यांना केली आहे. त्याचप्रमाणे चांदा ते बांदा या योजनेंतर्गत ही संकल्पना चंद्रपूर व सिंधूदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवून ती यशस्वी ठरल्यास पूर्ण राज्यात राबविण्यात येईल, असे राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सूचित केले. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, विशेष कार्य अधिकारी श्री गावतुरे, कृषि विभाग, आत्माचे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, वन विभाग व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, निवडक कृषि सखी व शेतकरी मित्र उपस्थित होते.
No comments:
Post a Comment