Search This Blog

Saturday, 17 March 2018

ग्रामगीता चंद्रपूरच्या प्रत्येक गावाची मार्गदर्शक व्हावी : मुनगंटीवार



आदर्श ग्राम सेवकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

       चंद्रपूर, दि.17 मार्च- ज्या मातीमध्ये आदर्श  गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहीला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे. त्या वाटेवर वाटचाल करणा-या ग्रामसेवकांचा सत्कार आज करता आला, याचा आनंद असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
            जिल्हा परिषद चंद्रपूरच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्राम पुरस्कार वितरण सोहळा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्राम सेवक यांची कार्यशाळा प्रियदर्शिनी इंदीरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, गुरुदेव सेवाश्रम पाठसूळ अकोला येथील राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ.उध्दव गाडेकर महाराज, औरगांबाद जिल्हयातील पाटोदा ग्राम पंचायतचे सरपंच भास्कर थेरे पाटील, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, अर्जना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, रविंद्र मोहिते, ओमप्रकाश यादव आदींची उपस्थिती होती.
            सकाळी 10 वाजता पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये सकाळच्या सत्रात मा.हंसराज अहीर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो योजना ग्राम विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्राम विकास साध्य करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणा-या कर्मचा-यांनी ग्राम विकासाच्या प्रयोगाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
            दुस-या सत्रामध्ये बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेवत काम करण्याचे त्यांनी सांगितले. गावामध्ये सुखसुविधा आणि जिवनावश्यक मुलभूत सुविधा असणे म्हणजे गाव जिवंत असणे होय. आता गावे वाचविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावासंदर्भात निर्णय घेतांना गतीशिलपणे योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ ग्रामसेवक नव्हे तर सरपंच, सदस्य व नागरिकांचा सहभाग ग्रामविकासात आवश्यक आहे. सर्वांची साथ मिळते तेव्हा आदर्श गाव घडते. महिला आरक्षणामुळे 50 टक्के महिला सद्या कार्यरत आहेत. त्या उत्तम प्रकारे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पुरस्कार देऊन मुल तालुक्यातील बाबराळा (5 लक्ष रुपयाचा अध्यक्ष आदर्श ग्राम पुरस्कार बहाल केलाया गावाला प्रथम तर ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी गावाला व्दितीय तर वरोरा तालुक्यातील वंधली या गावाला 2 लक्ष रुपयाचा तृतीय पुरस्कार दिला.
            आदर्श ग्राम सेवक पुरस्कार चंद्रपूर पंचायत समितीमधील ग्राम सेवक निलेश डवरे, चिमूर येथील किशोर ढपकस, बल्लारपूर मधील प्रताप ढुमणे, मुल येथील किशोर ठेंगणे, सावलीमधील संदिप सबबनवार, नागभिडमधील अजय राऊत, ब्रम्हपूरी येथील प्रविण तावेडे, भद्रावतीमधील रजनी खामनकर, वरोरा येथील सुशिल शिंदे, सिंदेवाही येथील  दिवाकर येरमलवार, राजूरा मधील वर्षा भोयर, गोंडपिपरी येथील आशिष आकनुरवार, कोरपनामधील नितीन नरड, पोंभूर्णा मधील प्रकाश रामटेके व जिवती येथील पुंडलिक ठावरे या ग्राम सेवकांचा आदर्श ग्राम सेवक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
            तसेच यावेळी स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिध्दी निबंध स्पर्धेचाही पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये चंद्रपूर येथील दादाजी रामचंद्र मोरे, कोरपना तालुक्यातील भूवी गुडा गावाचे विशाल नारायण बोथाडे व्दितीय तर प्रविण पंढरीनाथ पिसे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. 18 वर्षा खालील स्पर्धेसाठी इशीता प्रदिप धकाते प्रथम, आशिष राहूल नागदेवते व्दितीय, समिक्षा शंकर बावणे तृतीय यांनाही पुरस्कार देण्यात आले. जिल्हास्तरीय लघुपट स्पर्धा बक्षिस वितरण सोहळाही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये प्रथम पुरस्कार उत्कर्ष देवानंद देव, व्दितीय अभिजीत वेंकटेश नरखेळकर, तृतीय पुरस्कार राकेश रेकचंद फुलझेले यांना देण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा परिषदेच्या शिक्षीका काशीकर यांनी केले. यावेळी ओमप्रकाश यादव यांच्या संताचे समाज प्रबोधन या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
                                                            0000

No comments:

Post a Comment